शरीरातलं रक्त वाया जाऊ नये म्हणून रक्ताची गुठळी होण्याची रासायनिक प्रक्रिया शरीरात पार पडते. जखम अगदी छोटी असेल तर काही क्षणातच रक्त वाहायचं थांबतं. मग असं असेल तर आपल्याला जेव्हा डास चावतो तेव्हा त्याने आपल्या त्वचेला केलेल्या सूक्ष्म अशा जखमेच्या ठिकाणी रक्ताची गुठळी होऊन डासाला आपलं रक्त शोषण्यापासून आपोआपच प्रतिबंध का नाही होत?
मुळात आधी डास एखाद्या व्यक्तीकडेच जास्त आकर्षति का होतात? माणसाच्या शरीरातून घामावाटे कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो. त्याचबरोबर ओक्टेनॉल हेही एक रसायन बाहेर पडतं. या दोन रसायनांच्या ठरावीक प्रमाणातला गंध डासाला आकर्षति करतो. डासाच्या मिशांवर ७२ प्रकारची गंध संवेदनाक्षम केंद्रे असतात. त्यांपकी २७ केंद्रांना माणसाच्या घामावाटे बाहेर पडणाऱ्या विविध रसायनांचा दर्प जाणवतो. त्या दर्पावरून कोणत्या व्यक्तीचं रक्त आपल्या सर्वात जास्त उपयोगाचं आहे ते डास ठरवतो आणि त्या माणसाला चावण्याच्या मोहिमेवर निघतो. जेव्हा डास आपली सुईसारखी अणकुचीदार सोंड माणसाच्या किंवा अन्य प्राण्याच्या शरीरात खुपसतो, तेव्हा तो आपली लाळ त्या प्राण्याच्या शरीरात सोडतो. त्या लाळेमध्ये रक्त गोठू न देणारं एक रसायन असतं. त्यामुळे डासाला अलगदपणे पाहिजे तेवढं रक्त शोषून घेता येतं. आणि आपल्याला लवकर त्याची जाणीव होत नाही.
डासाच्या लाळेमध्ये ज्या प्रकारचं रसायन असतं, त्याच प्रकारचं ‘थ्रोम्बोलायटिक्स’ नावाचं एक रसायन असतं. या रसायनामुळे नुकतीच तयार झालेली रक्ताची गुठळी सल होऊ शकते किंवा कधी विरघळूही शकते. शरीरात रक्तप्रवाह वाहता असताना कधी त्यात रक्ताची गुठळी तयार होऊन अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका किंवा अर्धागवायूचा झटका येऊ शकतो. त्या वेळी ‘थ्रोम्बोलायटिक्स’ प्रकारचं रसायन असलेलं औषध रोग्याला देतात. त्यामुळे रक्तातली गुठळी विरघळते आणि रक्तप्रवाहातला अडथळा दूर होतो.
रक्तपेढय़ांमधून रक्त साठवलं जातं. ते तिथे न गोठता दीर्घकाळ टिकावं म्हणूनही त्यात काही प्रमाणात ‘थ्रोम्बोलायटिक्स’ प्रकारची रसायनं घालावी लागतात.

मनमोराचा पिसारा: विश्वास गुणांकाचा त्या देशाच्या समृद्धीशी संबंध असतो
प्लेटो, अॅरिस्टॉटलपासून ते बुद्ध, शंकराचार्य आणि जे. कृष्णमूर्तीपर्यंत अनेक विचारवंतांनी सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवला. ही थोर मंडळी केवळ विचारी नव्हती तर, समाजमानस आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालण्याचे विविध प्रकार आणि उपाय त्यांनी सांगितले.
अगदी अलीकडच्या काळात म. गांधींनी ‘चरखा चला चला के’ आपण स्वराज्य मिळवू शकतो असा आत्मविश्वास लोकांच्या मनात निर्माण केला. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याच्या मंत्राचे समाजात सहज अभिसरण व्हावे यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याची योजना राबविली, तर आचार्य विनोबा भावे यांनी ‘भूदान’ चळवळ पसरवली. या सर्व समाजसुधारकांचं प्रमुख वैशिष्टय़ असं की, त्यांनी काय करायला हवं, याच्या उत्तरादाखल ते ‘कसं’ करता येईल याचा ढाचा समाजासमोर मांडला. तो व्यावहारिक पातळीवर आणता आला. या सर्व लोकांच्या प्रभावीपणामागे त्यांनी ‘हे ध्येय कसं साध्य करता येईल’ याची कल्पना सुस्पष्टपणे मांडली आणि राबविली.
सैद्धान्तिक पातळीवर पटलेल्या उद्दिष्टांना प्रत्यक्षात उतरविण्याकरता, तात्त्विक चर्चेबरोबर प्रत्यक्ष कार्यक्रम मांडला तर ते कार्य यशस्वी होतं.
आजच्या समाजापुढे समाज कसा असावा, हा प्रश्न नसून तो तसा कशा प्रकारे निर्माण करता येईल, असा आहे. नेमका हाच विचार ‘हाऊ?’ या डोव्ह सिडमन यानं लिहिलेल्या पुस्तकात मांडलेला आहे. ‘हाऊ’ या पुस्तकाच्या शीर्षकासोबतची टॅगलाइन हा विचार अधिक स्पष्ट करते.
आपण कोणतीही गोष्ट कशी (साध्य) करतो याला का महत्त्व आहे, उद्योगधंद्यात आणि रोजच्या जीवनात ही?
 गेली दोन दशकं अमेरिका आणि युरोपामधील व्यापारउदीम, वैद्यकशास्त्र, व्यवस्थापन या विषयांमधील संशोधनांनी कात टाकली आहे. आतापर्यंत या विषयातील संशोधनाचा रोख हार्ड स्किल्स (आर्थिक व्यवहारामधील उलाढाल, कच्चा माल पुरवठा आणि पक्क्य़ा मालाचे पणन)वर होता. त्यामुळे लोकांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट, टीक्यूएम, बीपीआर, स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस अशा प्रत्यक्ष गोष्टींवर (टँजिबल) आधारित उद्योगाची प्रारूपे बांधली. ती यशस्वी झाली, पण त्यामुळे मनुष्यबळाचे समाधान व विकास झाला का?
माणसामाणसांमध्ये सांघिकतेची जोडभावना निर्माण झाली का, असे प्रश्न अनुत्तरित राहिले. म्हणून गेल्या पाचदहा वर्षांत उद्योगधंद्यातील संशोधन आणि प्रत्यक्ष भर ‘सॉफ्ट स्किल्स’वर (मानवी नातेसंबंध, परस्पर विश्वासाची जोपासना, सर्जनशीलता, मूल्याधारित व्यवस्थापन) दिला जातोय. भरीसभर म्हणून डोव्ह यांच्या मते सर्व जग इच्छा असो वा नसो हायपर कनेक्टेड आहे. माहितीची मक्तेदारी संपुष्टात आली. अशा परिस्थितीमध्ये व्यापारउदीम आणि मोठय़ा कंपन्यांचे व्यवस्थापन कसं करायचं, हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामध्ये भांडवल कुठून आणावं, ते कसं वापरावं, या जुन्या प्रश्नापेक्षा, मनुष्यबळ कसं सांभाळायचं, आपल्या अधिकारी वर्गाची निष्ठा कशी जोपासावी, विविध प्रकारच्या संस्कृतीमधून येणाऱ्या कार्यतत्पर इंजिनीअरना कार्यकुशल कसं बनवायचं, हा नेतृत्त्वापुढील मोठा प्रश्न आहे. उदा. उद्योगधंद्यातील नियम, कायदेकानू विविध देशांत कसे आहेत, हे शिकवणं सोपं आहे, पण कायदे व नियमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरनिराळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळा असतो. त्याचं आकलन झालं तर त्या त्या देशातील लोकांशी व्यवहार करता येतो.
‘विश्वासार्हता’ हा कोणत्याही दोन जिवंत (माणसं, कंपन्या, देश) गोष्टींच्या नातेसंबंधातला कळीचा मुद्दा असतो. ‘विश्वास संपादन करा’ असा ढोबळ सल्ला देऊन भागत नाही. ते तर सर्वाना ठाऊक असतं. परंतु, विश्वास कसा निर्माण करावा, त्याचा पडताळा कसा घ्यावा, तो तपासून केव्हा पाहावा हे मुद्दे ‘हाऊ’ या पुस्तकातून उलगडलेले आहेत. केवळ आगंतुकावरचा विश्वासच नव्हे तर कोणत्याही देशातले लोक आपल्याच देशवासीयांवर कितपत विश्वास टाकतात? प्रत्येक देशाचा सुखी-आनंदी असण्याचा गुणांक (कोशंट) असतो तर ट्रस्ट कोशंट कसा ठरवावा, या विश्वास गुणांकाचा त्या देशाच्या समृद्धीशी कसा डायरेक्ट संबंध असतो याची माहिती रंजक आहे.
डॉ.राजेंद्र बर्वे
        
प्रबोधन पर्व: सुधारणा – बाहेरच्या आणि आतल्या
‘‘तुमच्या सर्व सुधारणा आम्हाला करावयाच्या आहेत. याप्रमाणे पुष्कळजण पुष्कळ प्रकारे बोलले परंतु त्यांना खालच्या लोकांची सुधारणा करण्याचे स्मरण झाले नाही. आणि अजूनही ब्राह्मण मंडळी म्हणत आहेत की, खालच्या लोकांस समतेने आणि ममतेने वागविण्यासाठी परिस्थिती प्राप्त होण्याला ‘थोडा काळ’ लोटला पाहिजे. तेव्हा हा तुमचा ‘थोडा काळ’ किती हजार वर्षांचा असावा, याचे आम्हास अनुमान करवत नाही. तरी मागील अनुभवावरून तुमचा ‘थोडा काळ’ तुमच्या हयातीपर्यंत असावा असे गृहीत धरण्यास काही चिंता नाही.. खालच्या लोकांच्या सुधारणा करण्यासाठी तुम्ही जोपर्यंत कृतीसह प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत तुमच्या गोडबोल्या सुधारकांचे प्रयत्न शुद्ध नाटकी आहेत असे आम्ही समजू. इंग्रज लोकांच्या सहवासाने ब्राह्मण लोकांस विषमतेचे दुष्परिणाम व समतेचे सुपरिणाम यांचे उत्तम ज्ञान होऊन जरी कित्येक तपे होऊन गेली तरी, त्यांनी खालच्या लोकांस समतेने वागविण्यासाठी एखादी संस्था काढली आहे काय? मग तुमचा हा थोडा काळ संपणार तरी कधी? आणि तुम्ही खालच्या लोकांची सुधारणा करण्यास लागणार तरी कधी?’’
 ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील छोटय़ा वर्गावर सामाजिक सुधारणेची मोठी जबाबदारी असते हे सांगताना म्हणतात-
‘‘कोणत्याही गोष्टीत सुधारणा होणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. परंतु ही सुधारणा मनुष्याच्या बाह्य़ोपचारात अगोदर न होता, ती मनुष्याच्या बुद्धीत प्रथम झाली पाहिजे. सुधारलेल्या धर्तीवर बांधलेल्या सुंदर घरात, अडाणपणात वाढलेली माणसे वाढली तर, यांच्या जिवितापेक्षा, सुधारणेचा आस्वाद घेतलेली माणसे जुन्याधर्तीच्या घरात राहिली तरी, त्यांचे जिवित अधिक सुखात जाणार हे खास. यावरून बाहेरच्या सुधारणांशी आणि आतल्या सुधारणांशी मनुष्याच्या खऱ्या सुखासमाधानाचा कसा संबंध आहे, हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.. देवाचे दोस्त बनलेले असे जे आम्ही, त्या आम्ही बुद्धिवान लोकांनी मात्र समाजात धर्माच्या नावाची भयंकर भांडणे अगदी सैतानाप्रमाणे चालविली आहेत.’’