पॉलिस्टर तंतूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये बहुवारिकीकरण ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. याचे कारण म्हणजे, बहुवारिकाची लांबी, जी बहुवारिकीकरणाची कोटी (डिग्री ऑफ पॉलिमराझेशन) किंवा बहुवारिकाचा अणुभार (मोलेक्युलर वेट) या प्रमाणांमध्ये मोजली जाते, ती निर्माण होणाऱ्या तंतूंच्या गुणधर्माच्या दृष्टीने, मुख्यत: तंतूच्या ताकदीच्या दृष्टीने, अत्यंत महत्त्वाची असते.
बहुवारिकाची लांबी जितकी अधिक तितकी त्यापासून तयार होणाऱ्या तंतूची ताकद जास्त असा सर्वसाधारण नियम आहे. पॉलिस्टरचे तंतू त्याच्या ताकदीच्या बाबतीत तीन प्रकारचे बनविले जातात. पहिला सामान्य ताकदीचा, दुसरा उच्च ताकदीचा आणि तिसरा अतिउच्च ताकदीचा. या तीनही प्रकारांसाठी लागणारी बहुवारिकाची लांबी वेगवेगळी असते. सामान्य ताकदीच्या पॉलिस्टर तंतूसाठी बहुवारिकाची लांबी तुलनेने कमी लागते. यासाठी बहुवारिकाचा अणुभार हा साधारणपणे २२००० ते २५००० इतका ठेवला जातो. उच्च ताकदीच्या तंतूमध्ये तो ३५००० ते ४०००० इतका असतो आणि अतिउच्च ताकदीच्या तंतूसाठी हा अणुभार ४०००० पेक्षा बराच अधिक असतो. त्यामुळे पॉलिस्टर तंतूसाठी बहुवारिकीकरण करताना ज्या प्रकारचा तंतू बनवायचा आहे त्याप्रमाणे बहुवारिकाची लांबी नियंत्रित करावी लागते.
बहुवारिक तयार झाल्यावर त्यामध्ये गरजेनुसार इतर रसायने मिसळली जातात. उदा. तंतूची चकाकी कमी करण्यासाठी टायटॅनियम डायऑक्साइड मिसळतात, तर तंतूला आकर्षक बनविण्यासाठी किंवा तंतूची रंगाई सहज व्हावी म्हणूनसुद्धा काही रसायने वितळलेल्या बहुवारिकामध्ये मिसळली जातात.
पॉलिस्टर तंतूच्या उत्पादन प्रक्रियेमधील दुसरी पायरी म्हणजे बहुवारिक वाळविण्याची प्रक्रिया. बहुवारिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर बहुवारिकाच्या वितळलेल्या स्थितीतील लांब फिती तयार होतात. या फितींना थंड होऊ दिले जाते. थंड झाल्यावर त्या ठिसूळ होतात. नंतर त्यांचे लहान तुकडे केले जातात, त्यांना इंग्रजीमध्ये ‘चिप’ असे म्हणतात. या चिप्स त्यानंतर एका भट्टीमध्ये पूर्णपणे वाळविल्या जातात.

संस्थानांची बखर: शोमॅन भुपिंदरसिंग!
पतियाळाच्या महाराजा भूिपदरसिंग यांनी स्वत:चा पतियाळा इलेव्हन हा क्रिकेटचा संघ उभा केला होता. संघाला क्रिकेट शिकविण्यासाठी इंग्लंडहून दोन क्रिकेट शिक्षक आणले होते.  ब्रॅडमनसाठी ‘बॉडीलाइन’ गोलंदाजीचा प्रयोग करणारा व टीकेचे मोहोळ उठविणारा जॉर्डिन याच्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. अर्थातच महाराजांनी पतियाळात आपल्या क्रिकेट संघाचा सामना पाहुण्या संघाबरोबर आयोजित केला. सामन्याच्या पूर्वरात्री महाराजांनी दोन्ही संघांना शाही मेजवानी दिली. महाराजांच्या या आदरातिथ्याने भारावलेल्या जॉर्डिन आणि इतर खेळाडूंना वाटू लागले की, उद्याच्या सामन्यात यजमान संघाला हरविणे योग्य नाही. महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि आदरातिथ्याचा अपेक्षित परिणाम होऊन पाहुणा संघ ढेपाळला व सामना हरला! ‘जॉर्डिनच्या मातब्बर इंग्लिश संघाला पतियाळाच्या संघाने हरविले’- ही बातमी इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या मोठय़ा वर्तमानपत्रांत झळकली. अर्थात ही बातमी देण्याची व्यवस्थाही महाराजाांचीच!
भूिपदरसिंग हे जबर महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व होते. िहदुस्थानचा बादशाह होण्याचे त्यांचे स्वप्न होते. एका युरोपदौऱ्यात इटालीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलीनीशी त्यांच्या तीन गुप्त बठका झाल्या. आपल्या पाठीशी तीन लाख शिखांचे पाठबळ आहे आणि मुसोलिनीने मदत केल्यास ब्रिटिशराज भारतातून संपविणे शक्य आहे असे महाराजांनी त्याला पटवून दिले. परंतु थोडय़ाच दिवसांत महायुद्ध सुरू होऊन मुसोलिनीचा अस्त झाल्यामुळे महाराजांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले!
 साहित्यिक, कवी, कलावंत यांच्या कार्यातही त्यांना स्वारस्य होते. विशेषत: उर्दू व पंजाबी कवींच्या ते परिषदा भरवीत, त्यांना तनखा देत असत. बनारस विश्वविद्यालयास त्यांनी पन्नास हजार रुपयांची देणगी दिली होती. विविध गुण- अवगुणांचे अजब रसायन असलेले पतियाळा नरेश अखेरीपर्यंत चन, विलास, मस्तीत जीवन जगले पण त्यांच्या प्रजेचेही त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्यांच्या अंत्ययात्रेस एक लाखांचा जनसमुदाय जमला होता.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com