29 September 2020

News Flash

कुतूहल: ‘माउथवॉश’

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दरुगधी येते.

| February 8, 2014 03:39 am

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दरुगधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या समस्या, हिरडय़ांचा जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दरुगधी येऊ शकते. अशा व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यत: तोंडाची दरुगधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये असणारी रसायने वेगवेगळी असतात. काही रसायने दोन्ही उत्पादनांत आढळतात. माउथवॉश चूळ भरण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे तोंडातील जिवाणू नाहीसे होतात. तोंडातील जिवाणूंमुळे तोंडाला दरुगधी येते. श्वासाला उत्साहवर्धक ताजेपणा येण्यासाठी िमटसारखे फ्लेवर(स्वाद) माउथवॉशमध्ये वापरले जातात.
माउथवॉशमध्ये अल्कोहोल, क्लोरहेक्झाडाईन ग्लुकोनेट, थायमॉल, सिटाईलपायरीडिनियम क्लोराईड, हेक्झेटिडीन, ट्रायक्लोसन यांतील काही जिवाणूनाशक रसायने वापरलेली असतात. काही माउथवॉशमध्ये फ्लोराईड वापरलेले असते. जिवाणूरोधक रसायनांव्यतिरिक्त स्वाद आणि सुगंधासाठी युकॅलेप्टल, मेंथॉल, मिथाईल सॅलिसिलेट यांचा वापर केला जातो आणि माउथवॉशमधील गोडवा सोडिअम सॅकरीन या रसायनामुळे येतो. माउथवॉशमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रिझरव्हेटिव्हचा वापर केला जातो. सोडियम बेंझोएट हे रसायन प्रिझव्‍‌र्हेटिव्ह म्हणून वापरतात.  
तोंडाची स्वच्छता आणि हिरडय़ांच्या आरोग्यासाठी गुळणी करून स्वच्छता करणे ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. हिरडय़ा फुटण्यावर, हिरडय़ा आकुंचन करण्यासाठी तुरटीच्या गुळण्या करीत असत. तुरटी म्हणजे पोटॅश अ‍ॅल्युमिनियम सल्फेट. माउथवॉशमधील रसायने जंतूनाशकाचे कार्य करतात, हिरडय़ांना सूज येणे, हिरडय़ांमध्ये वेदना होणे यासाठी उपाय म्हणून माउथवॉशचा वापर उपयोगी ठरतो. माउथवॉशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण काही प्रमाणात निघू शकतात, पण टूथपेस्टच्या साहाय्याने टूथब्रशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण चांगल्या प्रकारे निघतात.
ताज्या श्वासासाठी माउथवॉश वापरायला काहीच हरकत नाही. मौखिक आरोग्य चांगले राहिले तर दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत. माउथवॉश वापरलात तरी टूथब्रश वापरून टूथपेस्टने दातांची चांगली स्वच्छता करणे आवश्यकच आहे.
प्रबोधन पर्व: बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां?
जननीच्या उदरांतून अवतरलेल्या सहोदरांत देखील जर भांडण किंवा मतभेद झाल्याशिवाय राहत नाहीं, तर ज्यांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा कुलसंबंध नाहीं, व ज्यांनीं राजसेवेचा सामान्य मार्ग सोडून देऊन आपापल्या मनास प्रशस्त त्या रीतीनें आपल्या हयातींत आपल्या हातून होईल तेवढें देशकार्य करण्याचा निश्चय केला आहे, त्यांचे विचार सर्वाशीं न जुळले व ज्याला त्याला प्रसंगविशेषीं आपापल्या विचारांचा पराकाष्ठेचा अभिमान उत्पन्न होऊन, एकदां उभयतांनीं आरंभिलेल्या सामान्य गोष्टींस आमरण चिकटून राहणें स्वतस किंवा इतरांस सुखास्पद व कल्याणप्रद होणारें नाहीं, अशी खात्री झाल्यामुळें ज्याच्या मनास जी दिशा अत्यंत आक्रमणीय वाटेल त्यानें ती धरणें, यांत नवल वाटण्यासारखें काय आहे, हें आम्हांस समजत नाहीं! बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां? दुष्ट आचाराचें निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणार्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहींत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधींच न माजल्यामुळें, व बहुधा आमचे लोक ‘गतकानुगतिक’ च असल्यामुळें हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडलें आहे! हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊं न देण्याविषयीं मात्र खबरदारी ठेविली पाहिजे.’’ अशा प्रकारे वाद-संवादाची महती सांगून आगरकर त्याची विषयकक्षा स्पष्ट करताना म्हणतात, ‘‘आतां किती झालें तरी कलह तो कलह! तो कशाही प्रकारचा आणि कितीही सौम्य असला तरी त्यांत अप्रिय असें कांहींच नाहीं, असें कोठून होणार?
पण जोंपर्यंत आंपण आपल्या विचाराच्या विजयासाठीं व प्रसारासाठीं भांडत आहों, असें प्रत्येकाच्या मनांत वागत राहील तोंपर्यंत न्यायसभेंत पक्षकाराचें भांडण भांडणार्या वकिलांच्या दिखाऊ वैराच्या फर पलीकडे अशा दोन व्यक्तींचें वैर जाईल असें आम्हांस वाटत नाहीं.’
मनमोराचा पिसारा: ‘वाइल्ड’ कोटय़धीश
ऑस्कर वाइल्ड फक्त ४६ र्वष जगला. पण ज्या हिमतीनं, हिकमतीनं, धुंदीनं, विद्वत्तेनं जगला त्याबद्दल त्याचंच वचन उद्धृत करावं लागेल. ‘काही माणसं जगतात, बाकीचे फक्त अस्तित्वात राहतात.’
ऑस्कर वाइल्डचे ‘कोट’ म्हणजे अ थिंग ऑफ ब्यूटी इज जॉय फॉर एव्हर (-जॉन कीटस्) इतकी र्वष वाचतो, वाचताना कधी स्मित करतो, कधी खळखळून हसतो (अपवादात्मक), कधी न राहवून पुस्तक मिटून विचारमग्न होतो. मग दिवसभर दुसरं, तिसरं काही वाचतच नाही. वाइल्डची नाटकं वाचणं हा अनुभव विशेष वाटतो. कारण त्याची पात्रं बोलतात. त्या प्रत्येक वाक्यात मला तोच दिसतो. अतिशय सुंदर, भाषा, नेमकी शब्दरचना, पात्रांमधले तणाव आणि रेखीव व्यक्तिचित्र. संपूर्ण नाटक (लहानसं असलं तरी) खूप वेळ लागतो. कारण भाषेवर प्रेम करू की नाटय़ावर? असा प्रश्न पडतो.
कोणीतरी लहानपणी त्याची ‘राजपुत्रा’ची गोष्ट वाचायला दिली होती. पुतळ्यात  अडकलेलं त्याचं कारुण्य, पक्ष्यांशी होणारा संवाद, अंगावरच्या हिऱ्यांची केलेली वाटणी वाचून डोळे भिजून जायचे. इतकं कोमल, इतकं नेमकं आणि बोलकं! मला वाइल्डच्या आयुष्याची गोष्ट सांगायची नाहीये. त्यानं शेकडो भाषणं करून इग्लंड-अमेरिकेतल्या विद्वज्जनांवर, रसिकांवर आणि सामान्य वाचकांवर अधिराज्य गाजवलं. दुर्दैवानं त्याच्यावर झालेल्या समलिंगी आकर्षणाच्या खटल्यामुळे आणि त्यासाठी भोगलेल्या शिक्षेमुळे त्याची आठवण काढली जाते. पण खराखुरा ऑस्कर वाइल्ड भेटतो तो त्याच्या हजरजबाबी, चुरचुरीत, खुसखुशीत (सु?) तिरकस वचनांमधून.
जगातल्या सर्वाधिक ‘कोटेड’ लेखकांमध्ये वाइल्डचा नंबर दुसरा-तिसरा असावा.
वाइल्डच्या वचनांची गम्मत अशीच की नेमक्या आणि मोजक्या शब्दांत असलेली वचनं फक्त ‘शाब्दिक कोटय़ा’ राहात नाहीत. शब्दांच्या करामती ऐकून फार तर करमणूक होते. लेखकाच्या हजरजबाबीपणाचं आणि विनोदबुद्धीचं कौतुक वाटतं. त्या वचनामधील आशय त्या भाषकांच्या विचार नि आचार संस्कृतीमध्ये अडकून राहतो. शाब्दिक कोटय़ांमध्ये जीवनावर भाष्य करण्याची पुरेशी ताकद नसते. ऑस्कर वाइल्डची वचनं भाषा, संस्कृती, आचार-विचार आणि समजुतींना भेदून आपल्या जगण्यावर कधी भेदक तर कधी करुण भाष्य करतात.
जीवनातली ट्रॅजेडी कोणती? हवं ते न मिळणं आणि हवं ते मिळणं (हेदेखील.) हवं ते न मिळाल्यामुळे दु:ख होतं, पण हवं ते मिळाल्यावर आता पुढे काय? या विचारानं माणूस बेजार होतो. दु:खी होतो. हा आशय कालातीत, प्रदेशातीत आहे. त्याच्या वचनांवर बोट दाखवून तो सिनिक होता (पराभूत मनोवृत्ती) असं कोणाला वाटल्यावर वाइल्ड म्हणतो, सिनिक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीची किंमत (प्राइस) ठाऊक असते. पण तिचं मूल्य (व्हॅल्यू) मात्र ठाऊक नसतं.
सदैव गोल्डमेडल, शिष्यवृत्ती आणि फर्स्ट क्लास मिळवणारा ऑस्कर शिक्षणाबद्दल म्हणतो- ‘शिक्षण देणं (एज्युकेशन) हा स्तुत्य उपक्रम आहे, पण हेही लक्षात राहायला हवं की खरं शिकण्याच्या लायकीचं असतं, ते कधीच शिकवता येत नाही.’ पालक-मुलांच्या संदर्भात तो म्हणतो, ‘मुलं आई-वडिलांवर प्रेम करू लागतात. पुढे त्यांच्या चुकांचा निवाडा करतात (जज् देम) पण त्यांना माफ मात्र अपवादाने करतात.’
आणखी काही..
– अनुभव म्हणजे आपल्या चुकांना दिलेलं सभ्य नाव.
– स्त्री-पुरुष यांच्यामध्ये मैत्री शक्य नाही. प्रेमाचे आवेग, भक्ती, बांधीलकी, शत्रुत्व असेल, पण मैत्री नसते.
– माणूस स्वत:बद्दल खरं बोलत नाही, त्याला मुखवटा दिलात तर तो सत्य सांगेल!
आणि माझा सर्वात आवडता.
‘सगळी सरसकट विधानं अर्धसत्य असतात, हे वचनदेखील त्याला अपवाद नाही!’
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:39 am

Web Title: curiosity mouthwash
टॅग Curiosity
Next Stories
1 कुतूहल – हर्बल टूथपेस्ट आणि वनौषधी
2 कुतूहल: दंतमंजन किंवा मशेरी
3 कुतूहल : सफरचंदातले पॉलिफिनॉल ऑक्सिडेज
Just Now!
X