डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. लाखेपासून बांगडय़ा आणि अन्य दागिने बनवले जात. लाखेचा थर फर्निचरवर देत. त्यामुळे फर्निचर देखणे दिसे आणि त्यावर हवेचा परिणाम होत नसे. अंबर नावाच्या झाडापासून मिळणारे एक पॉलिमर रेझिन ग्रीक लोकांना माहीत होते. पिवळ्या रंगाचे हे पॉलिमर असते. वर वर्णन केलेली प्लास्टिक ही नैसर्गिक होत. पण सध्या जी प्लास्टिक म्हणून आपण वापरत आहोत ती सर्व कारखान्यात बनवलेली आहेत. म्हणून ती कृत्रिम अथवा सिंथेटिक म्हणायची. खरे म्हणजे पॉलिथिलीन आणि पीव्हीसी ही प्लास्टिक बनवण्यासाठी नाफ्था हे द्रव्य वापरतात. नाफ्था हे कच्च्या (क्रूड ऑइल) तेल आणि नॅचरल गॅसपासून मिळवतात. कच्चे तेल जमिनीखाली मिळते आणि नॅचरल गॅस या तेलाबरोबर मिळतो. ते नैसर्गिक स्वरूपातच. पण ते प्लास्टिक म्हणून जसेच्या तसे वापरता येत नाही आणि त्यावर कारखान्यात बऱ्याच प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. मात्र या सिंथेटिक प्लास्टिकमध्ये नैसर्गिक प्लास्टिकपेक्षा खूपच चांगले गुणधर्म असतात. नॅचरल गॅसपासून मेथानोल बनवतात आणि पुढे फॉर्मल्डिहाइड नावाचे प्लास्टिक बनवतात. नाफ्थापासून इथिलीन मिळते तसेच प्रॉपिलीनही मिळते. या प्रॉपिलीनपासून पुढे पॉलिप्रॉपिलीन, अ‍ॅक्रिलिक प्लास्टिक, फिनोल, पॉलियुरेथीन आणि नायलॉन मिळवता येते. तर ब्युटीलीनपासून कृत्रिम रबर मिळते. कृत्रिम रबर आणि नैसर्गिक रबर यांच्या रेणूच्या रचनेमध्ये सारखेपणा असतो; पण एकरूपता नसते. इ.स. १९३०च्या सुमारास ब्युटाडीन व अ‍ॅक्रिलोनायट्राइल यांचे सहबहुवारिकीकरण करण्यात आले. त्यापासून ब्युना-एन हा एक रबरी प्रकार मिळाला. रबरामध्ये कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये आहेत. रबराच्या रेणूमध्ये पाच कार्बन अणूबरोबर आठ हायड्रोजन अणू या हिशेबाने ती संयोग पावलेली असतात.

प्रबोधन पर्व: पक्षभेद आणि पक्षद्वेष यांच्या सीमारेषा
‘‘आजकाल िहदुस्थानात व विशेषत: महाराष्ट्रात जी दुफळी दृष्टोत्पत्तीस येते तिच्या मुळाशी व्यक्तिविशिष्ट मनोविकार थोडेबहुत नसतील असे नाही; तथापि व्यक्तिद्वेषादी कारणांपेक्षा यांत अधिक खोल व सबळ असे काहीतरी आहे, असे या लेखकास तरी वाटते. ही दुफळी राजकीय बाबतीतच नव्हे; तर सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, वगैरे सर्व सार्वजनिक प्रयत्नक्षेत्रांत दृष्टोत्पत्तीस येते. राजकारणाला ऊत येण्यापूर्वीही महाराष्ट्रात पक्षभेद होतेच, तेव्हा राजकारणाच्या वावटळीत मनोविकारांना वगैरे जो पूर आला, त्या पुरामुळेच हे तट दुतर्फा उत्पन्न झाले असे म्हणता येणार नाही. हे तट नैसर्गिक म्हणजे भिन्न विचारप्रवाहांमुळे स्वभावत:च उत्पन्न झालेले आहेत. राजकारणामुळे त्यांमधील अंतर अधिक वाढले आहे, असे फारतर म्हणता येईल.’’ १९१५ साली लिहिलेल्या लेखात वामन मल्हार जोशी पक्षभेद आणि पक्षद्वेषाच्या सीमारेषाही अधोरेखित करतात –
‘‘दुसरा पक्ष सदोष आहे, असे समजणे स्वाभाविकच नव्हे तर इष्टही असेल, – ‘आहे’ असेही एकवेळ म्हणण्यास हा लेखक तयार होईल; परंतु ‘सदोष’ पक्ष ‘द्वेषार्ह’ असलाच पाहिजे असा काही कोठे न्याय नाही. तो तो मनुष्य स्वत:ला शहाणाच समजतो; पण शहाणपणाचा सर्व मक्ता आपल्याकडेच आहे, स्वार्थत्याग आपल्याच घरी पिकतो, देशाभिमान आपल्या हृदयातच स्फुरतो, राष्ट्राच्या प्रगतीची मख्खी आपल्यालाच ठाऊक आहे, इतर सर्वानी माझ्या मार्गानेच चालावे, नाहीतर ते स्वत: खड्डय़ात पडतील व देशाला रसातळाला नेतील, अशा प्रकारची भावना अस्वाभाविक व अनिष्ट आहे. आपली मुले आणि आपली मते जशी आपणाला प्रिय तशी लोकांनाही आपापली मुले आणि मते प्रिय असतात. आपणाला जसा स्वाभिमान आहे तसा लोकांनाही असतो, इत्यादी इत्यादी साध्या गोष्टी देखील महाराष्ट्र विसरला आहे.. विरोध करावा, प्रतिबंध करावा, वेळप्रसंगी झगडा, झुंज, युद्ध करण्यासही हरकत नाही. पण हे युद्ध धम्र्य असावे, ‘सद्धर्म’ न सोडता ते करावे. ही गोष्ट चुकीची किंवा अशक्य कोटीतली आहे काय?’’

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

मनमोराचा पिसारा: अबोल अबोली
ती शांतपणे, प्रसन्नपणे फुलत असते. आपली लहानशी फुलं अंगावर मिरवत असते, वर्षभर कमीअधिक प्रमाणात, पण उन्हाच्या तलखीने भूमी दग्ध झाली, तहानेनं पाखरं कासावीस झाली, की ती फुलून येते.
हिरव्यागार, किंचित काटेरी झुडपावर आपला ‘अबोली रंग’ घेऊन गपचूप बहरून येते. जेमतेम दोन-अडीच फुटांपर्यंत वाढणारं हिचं झुडूप बागेत अक्षरश: कुठे तरी लावलेलं असतं. फुलांची फळं झाली की उन्हानं त्या इवल्याशा शेंगा टचकन फुटतात आणि आसपास अबोलीच्या बिया सांडतात.
निसर्गानं नेमून दिलेलं विहित कार्य पूर्ण करून अबोली तशीच फुलारून येते. तिच्या जीवनाची कहाणी दक्षिणेकडे अधिक सफळ होते. (तिथे तिचं नाव कनकरलाम आहे.) मनापासून सांगायचं तर अबोली म्हटलं की, गोव्याची सुपीक भूमी आठवते.
अबोलीचा रंग असा काही विशेष की, त्या रंगालाच ‘अबोली’ हे नाव मिळालं. केसरीपणाकडे झुकणारा पण फिक्या छटेतला हा रंग नितळ पारदर्शी. हाच अबोली रंग कमीअधिक पातळ होऊन चारदोन छटा घेऊन अबोली फुलते. फूल नीट पाहिलं की कळतं, या फुलाची उलटय़ा शंकूसारखी एकच पाकळी असते. या पाकळीचेच पाच-सहा भाग पडतात. वाटोळ्या आकाराचे हे भाग सहज एकमेकांना धरून राहतात.
अबोलीचा रंग मोहक खरा, पण पांढऱ्या मोगरीच्या फुलांच्या वेणीत नाही तर वळेसरात गोवला तर त्या दोन रंगांची जोडी खुलून दिसते. कधीकधी या अबोलीच्या फुलांबरोबर चिमुकली हिरवी पानंही खुलून दिसतात. घट्ट पेडीच्या वेणीतले हे तीन रंग, शुभ्र मोगरीचा, तजेलदार हिरव्या पानांचा आणि अबोलीचा अबोली रंग पाहिले की वाटतं, आपण माणूस म्हणून सौंदर्याचे आस्वादक, पूजक आणि निर्मिक आहोत.
आजही अशा वेण्या, गजरे बाजारातल्या टोपल्यांत दिसतात, त्या माळणाऱ्या स्त्रिया अभावाने आढळतात.
अबोलीशी खूप बोलावंसं वाटतं, तिचं म्हणणं ऐकावंसं वाटतं, तिनं खुळेपणानं आपल्या नाजूक रंगाचं रहस्य सांगून टाकावंसं वाटतं, पण ती अबोल राहाणंच पसंत करीत असावी. सौंदर्याचं ते खरंखुरं लक्षण आहे.
‘मी आहे ही अशी आहे. आणखी काय सांगू, आहे खरी अबोल!’ मग कधी तरी अबोलीचं फूल माझ्या कानात हळूच कुजबुजतं, मी तुझ्यासारखीच, आत्ममग्न आणि शांत. मी बोलत नाही म्हणून दु:खी आहे असं समजू नकोस.. मी फक्त अबोल आहे. असतात काही जीव अबोल!!
अबोलीचं एक नाव प्रियदर्शी आहे, हे पटलं.. गम्मत आहे ना!
डॉ.राजेंद्र बर्वे