निसर्गातील विविध पदार्थाचा पाण्याशी संपर्क आल्याने त्या पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलतात. विशेषत: लाकूड, धातू आणि इमारतीतील अनेक पदार्थाच्या बाबतीत असे होत असते. लाकूड हे सच्छिद्र असल्याने त्यामधील छिद्रांमध्ये पाण्याचा शिरकाव होऊन लाकडाची कुजण्याची प्रक्रिया चालू होते आणि त्यास कीड लागते. धातूचा पाण्याशी संपर्क आल्याने तो गंजू लागतो. त्यात पाण्यातील आणि हवेतील ऑक्सिजनचा धातूशी संपर्क आल्याने ऑक्सिडेशन (गंजणे) सुरू होते. खारट आणि आम्ल पाण्याशी धातूचा संपर्क आल्यास धातूचे ऑक्सिडेशन अधिक वेगाने होते. परिणामी धातू गंजू लागतात. इमारतीत छत, टेरेस आणि बाल्कनी यांची पावसात गळण्याची सुरुवात होते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पाण्याशी कमीत कमी संपर्क असणे आवश्यक असते. पाण्याशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी जलरोधक पदार्थ वापरतात.
जलरोधक पदार्थ गरजेनुसार निवडले जातात. लाकूड, काँक्रिट आणि विटा या सर्व वस्तूंना जलरोधक बनवावे लागते. त्यांच्या पृष्ठभागावर योग्य रसायन वापरले असता ते जलरोधक बनतात. उदा. विटांच्या व इतर बांधकामात (विशेषत: जमिनीच्या वरील बांधकामात) सिलिकॉन संयुगांच्या पातळ थराचा जलरोधक म्हणून उपयोग करतात. बांधकामाच्या पृष्ठभागात शोषल्या गेलेल्या पाण्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा रंग उडून जातो. सिलिकॉन संयुगांमुळे पाण्याचे शोषण कमी होऊन रंग टिकण्यास मदत होते.
जलरोधकाचा प्रकार आणि पद्धत ही त्याच्या उपयोगानुसार ठरते. सर्वसामान्यपणे बऱ्याच पदार्थावर जलरोधक आवरण दिले असता ते जलरोधक बनतात. तसेच काही वेळेस ते त्या पदार्थाच्या तयार करण्याच्या प्रक्रियेत मिसळले असता तो पदार्थ जलरोधक बनतो. जलरोधक म्हणून वापरले गेलेले रसायन असे हवे की त्यामुळे वनस्पती, प्राणी यांना त्रास होणार नाही. तसेच घरातील वस्तू जलरोधक बनवायच्या असतील तर त्यातील रसायने ही मुलांना, पाळीव प्राण्यांना आणि वनस्पतीला सुरक्षित असून ती आपल्या बजेटमध्ये बसणारी असावी. तरच त्याचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होऊ शकतो.

प्रबोधन पर्व: प्रबोधनकार ठाकरे:  निर्भीड समाजसुधारक
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा ही विशुद्ध विचारांची आणि पूर्णपणे बौद्धिक उदारमतवादाची होती. अन्यायाविषयीची आत्यंतिक चीड, त्वेष आणि कालबाह्य़ रूढी यांविषयी परखडपणे बोलले, लिहिले जात असे. या द्रष्टय़ा परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे.
समाजसुधारक आणि संयुक्त  महाराष्ट्र चळवळीचे पुढारी ही प्रबोधनकरांची दोन मुख्य योगदाने. अन्याय्य रूढी, जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडा प्रथेचा प्रश्न असो; प्रबोधनकार या प्रश्नांवर अखेपर्यंत त्वेषाने लढत, लिहीत राहिले. महात्मा फुले हे प्रबोधनकार यांचे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या प्रबोधनकारांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. त्यांच्या या निर्भीड आणि परखडपणामुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कत्रे होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय; पण शाहू महाराजांच्या ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्याविषयी प्रबोधनकारांनी त्यांनाही दोन शब्द सुनवायला कमी केले नाही.  प्रबोधनकार यांनी ‘सारथी’, ‘लोकहितवादी’ व ‘प्रबोधन’ या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘देवांचा धर्म की धर्माची देवळे’, ‘ग्रामण्याचा इतिहास’, ‘कुमारिकांचे शाप’, ‘वक्तृत्वशास्त्र’ इत्यादी ग्रंथांसह ‘समर्थ रामदास’, ‘संत गाडगे महाराज’, ‘रंगो बापूजी’, ‘पंडिता रमाबाई’, ‘माझी जीवनगाथा’ (आत्मचरित्र) या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.  
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा प्रबोधनकार यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.

मनमोराचा पिसारा: जुने अकाउण्ट बंद
हॅलो मित्रा, तुझ्याशी गप्पा मारायला लागल्यापासून मनाला खूप हलकं वाटतंय ना रे! म्हंजे आडपडदा न ठेवता स्वत:शी संवाद सुरू झाला की, मनाला डाचणारे अनेक विकल्प, शंका आपोआप कशा काय विरून जातात?! याचं नवल वाटतं. म्हणजे मनात उगाच जपून ठेवलेले हे विचार निर्थक होते, हे जाणवायचं, समजायचं, पण ते कागदावर मांडल्यावर नाहीसे होतात, हे उमगलं नव्हतं. अगदी पूर्णपणे नष्ट होत नाहीत, पण त्यांचा डंख कमी होतो.
गंमत माझ्या मनाची मला वाटते. केवळ आपलं मानलं म्हणून दु:ख नाहीसं होत नाही, पण ते आपल्यापाशी अभिव्यक्त केलं तर त्याची तीव्रता मात्र कमी होते, हे स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगावंसं वाटतं रे.

एखाद्या व्यक्तीबद्दल मनात अढी बसते, त्या व्यक्तीच्या संयुक्तिक तर कधी क्षुल्लक गोष्टीवरून राग येतो आणि तो मनात तसाच शिल्लक राहतो. त्या व्यक्तीला गोंदासारखा चिकटून राहतो. नेहमीच्या भेटीगाठीतली व्यक्ती असली तरी त्या नकारात्मक भावना बोलून व्यक्त कराव्याशा वाटत नाही. अगदी नैमित्तिक कारणांनी भेटणारी असेल तर तो राग मनात कायमचाच चिकटून राहतो.
अशा वेळी त्या व्यक्तीचा किंवा प्रसंगाचा राग मनात रेंगाळत तर राहतोच, पण आपण तो राग विसरत नाही, विसरू शकत नाही याबद्दल स्वत:चाच राग येतो.
दुसऱ्या व्यक्तीला माफ करण्याआधी स्वत:ला माफ करता यावं लागतं. तुझ्याशी बोलल्यावर मात्र स्वत:ला माफ करण्याचं महत्त्व कळलं आणि जमायला लागलं. खरं म्हणजे, स्वत:ला माफ करणं अजिबात कठीण नसतं.
आपण स्वत:ला माफ करण्यात काय एवढं? आपण माणूसच असतो शेवटी! शेवटी कशाला, अगदी पहिल्यापास्नं. अगदी दुसरी व्यक्ती तशीच माणूस असते.
खूप सोपी वाटणारी गोष्ट पचवायला आणि आचरणात आणायला कठीण वाटतं. स्वत:शी असा छानदार संवाद झाला की, मनाला धीर येतो. आपण आपल्या मनाला टाकून देत नाही. असं वाटतं आपल्याला कोण स्वीकारणार? आपल्याला कोण आहे? पूर्वी असे विचार आल्यावर खूप हळवं वाटायचं रे, पण आता नाही वाटत. आपण आहोत आपल्यासाठी. अगदी जोवर श्वासात श्वास असल्याची जाणीव आहे, तोवर आपण असतोच आपल्यासाठी. हे कळलंय आता. नाही विसरायची ही गोष्ट. मित्रा, स्वत:शी बोलल्यामुळे हे अनुभवता आलं.
आता ठरवलंय, मनातल्या जुन्या नकारात्मक विचार आणि जळमटांची अकाउंट बंद करून टाकली आहेत. त्यांचं ओझं आता बाळगायचं नाही.
मुख्य म्हणजे नकारात्मक विचार आणि आठवणींची नवी अकाउंट उघडायची नाहीत. नवी अकाउंट उघडली नाहीत की ती साफ करायचा प्रश्नच येणार नाही.
मित्रा, इतकं फ्रेश वाटलं. अगदी मस्त!! भेटत राहू अधूनमधून असेच. याच कट्टय़ावर. नक्की
तुझा. मी.

डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com