30 November 2020

News Flash

कुतूहल – नायट्रोजन वायू (N2)

वातावरणातील ७८% एवढी मुबलक जागा व्यापणारा नायट्रोजन हा एक उदासीन वायू आहे. सजीवांना या असेन्द्रिय वायूचा प्रत्यक्ष वापर फारसा होत नाही. नायट्रोजनचा रेणू (N2) हा

| June 17, 2014 01:01 am

वातावरणातील ७८% एवढी मुबलक जागा व्यापणारा नायट्रोजन हा एक उदासीन वायू आहे. सजीवांना या असेन्द्रिय वायूचा प्रत्यक्ष वापर फारसा होत नाही. नायट्रोजनचा रेणू (N2) हा तीन इलेक्ट्रॉनिक बंधांनी घट्ट जखडलेला असतो. त्यामुळे त्याचे बंध तोडण्यासाठी बऱ्यापकी ऊर्जा खर्च करावी लागते. वनस्पती व प्राण्यांमध्ये हा नायट्रोजन त्याच्या संयुगरूपाने ‘स्थिर’ केला जातो व तो हवेतील वायूप्रमाणे निष्क्रिय ठरत नसून क्रियाशील बनतो. या क्रियाशील नायट्रोजनची  (Nr) कमतरता असेल तर, वनस्पतीची वाढ  खुंटते आणि पिकांपासून पुरेसे उत्पादन मिळत नाही. तेव्हा, नायट्रोजन वातावरणात निष्क्रिय असला तरी तो जीवसृष्टीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे, हे निश्चित!  
आपल्या शरीराचा ३ % भाग नायट्रोजनचा बनलेला असतो. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन यानंतर ते शरीरातले चौथ्या क्रमांकाचे मूलद्रव्य होय. शरीरपेशीतील केंद्रकात असलेली केंद्रीय आम्ले व प्रथिने तयार करणारी अमिनो आम्ले नायट्रोजनची बनलेली असतात. अन्नधान्याचे उत्पादन तर नायट्रोजनवरच अवलंबून असते.  
वीज चमकणे, वणवे पेटणे यांसारख्या नसíगक घटनांमुळे उच्च तापमान निर्माण होते व त्यामुळे वातावरणातील नायट्रोजनचे बंध तुटतात. त्याचे क्रियाशील स्वरूपात रूपांतर होते. वनस्पतीच्या मुळांच्या गाठीत वास्तव्य करणारे काही सूक्ष्म जीवाणूदेखील वातावरणातील निष्क्रिय नायट्रोजन वायूचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. समुद्रात वाढणारी हिरवे निळे शैवाल (खरे तर जीवाणू – सायनोबॅक्टेरिया) हेही नायट्रोजन स्थिरीकरण करण्यात अग्रेसर असतात.
अमोनिया (NH3) हा वायू नायट्रोजनचे अत्याधिक क्रियाशील संयुग असून, औद्योगिक क्षेत्रात व खते तयार करण्यासाठी त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. अमोनिया सोबतच नायट्रिक आम्ल, नायट्रेट्स (स्फोटक व गतिदायक पदार्थ), सायनाइड्स यातदेखील नायट्रोजन असतो. केवलरसारख्या मजबूत धाग्यात आणि सायनोअक्रिलेटसारख्या सुपर गोंदातही नायट्रोजन असतो.  
हरितगृह वायूमध्ये कार्बनडायोक्साईड (CO2) असला तरी नायट्रस ऑक्साईड (N2O) वायूचा वाटादेखील नाकारता येणार नाही. पृथ्वीला तापविण्याची त्याची क्षमता  कार्बन-वायूच्या २९८ पटीने जास्त आहे. या नायट्रस ऑक्साइडचे आयुर्मान साधारण १२० वर्षांचे असते व हा वायू अन्य हरितगृह वायूंपेक्षा जास्त टिकाऊ आहे.  दरवर्षी ०.३ टक्क्यांनी वाढणारा हा वायू अत्यंत धोक्याचा आहे,
सेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – दालीचे खडक
साल्वादोर दाली या सर्रिअ‍ॅलिस्ट चित्रकारावर सिग्मण्ड फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषण सिद्धान्तांचं गारूड होतं. वरवर शांत अथवा स्थिर दिसणाऱ्या मनाच्या नेणिवेच्या पातळीमध्ये अनेक दृश्य-अदृश्य प्रतिमा, अद्भुत प्रतीकं सामावलेली असतात. जणू काही प्रत्येक मानवी मनामध्ये स्मृतींचे अनेक स्तर असतात. स्तर असले तरी ते सपाट नसतात. परस्परांत मिसळलेल्या आठवणींमधली प्रतीकं आणि प्रतिमा धूसरपणे एकमेकांत गुंफलेली असतात. अंतर्मनातल्या या विविधपूर्ण स्मृतींची मनाच्या जाणिवेच्या पृष्ठभागावर रेखाटनं दिसतात. ती कधी ढोबळ तर कधी सूचक असतात. फ्रॉइडच्या या सिद्धान्तानं झापटलेल्या साल्वादोरला दृश्यमान जगाकडे पाहण्याची अलौकिक दृष्टी सापडली. त्यानं दृश्य वस्तुमात्रां (जिवंत-निर्जीव)च्या आकार, रंग आणि बाह्यरेषांची विलक्षण चित्रं रंगविली.
मनाच्या अशा स्वरूपाचा आकार दालीला स्पेनच्या भूमीतील विशाल भूभागावर सापडला. किनारे, खडक, वालुकामय प्रदेश, प्रकाशाच्या बदलत्या छटा आणि कोन, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सावल्या दालीनं जिवंत केल्या. दालीच्या या अद्भुत चित्रांमधल्या खडक, किनारे आणि पाणी याची मानस अभ्यासक म्हणून भुरळ पडली. स्पेनमधल्या विस्तीर्ण मैदानात विचित्र आकाराचे खडक दिसले. कॅडेसच्या जलसाठय़ाजवळच निळं पाणी दिसलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दालीचे लाडके खडक सापडले. मन ते खडक असा दालीने प्रवास केला तर मन ते चित्र (खडक) हा प्रवास मी केला.
द ग्रेट मास्टरबेटर म्हणून प्रसिद्ध पावलेल्या नाकावर पडलेल्या त्या खडकाचं रहस्य उलगडलं. दालीने खडकांमधला खडबडीतपणा चित्रात घासून नष्ट केला. दालीच्या खडकांचा पृष्ठभाग नितळ पापुद्रय़ासारखा भासतो; परंतु आकारामधल्या लवचिकतेवर ‘मास्टरी’ असलेल्या दालीनं त्या दगडांमधून चेहरे आणि लैंगिकता चित्रित केली. पापुद्रा असला तरी त्यात खाचाखोचा असतात. अशा खडकरूपी मनात कधी कोमल तर कधी राक्षसी वृत्ती दगड फोडून बाहेर पडतात.
द ग्रेट मास्टरबेटरमधल्या खडकामध्ये आत्ममैथुनातली मुग्धता दिसते. ती निष्फळ खरीच, पण माणसामधल्या सर्जनशीलतेचं वांझोटे प्रतीक ठरते. पुन्हा हा खडकरूपी माणूस (अथवा मन) एकटा नाही. दालीच्या चित्रातल्या विशाल अवकाशात माणूस एकटा नसतो. इथे तर माणसांचे (त्याचे आई-वडील तर दूरवर असलेले, मनाने दुरावलेले वडील) आकार दिसतात. ती त्यांची चित्रं असतील किंवा नसतीलही. दालीला नाकतोडय़ाची भीती वाटत असे तो नाकतोडा इथे त्याला डसलेला दिसतो तर कुठे माश्यांचं मोहोळ दिसतं. त्यातून अतृप्त निर्मितीक्षमता दिसते. प्रणयोत्सुक युगुल दिसतं. (अर्थात खजुराहोसारख्या प्रणयचेष्टा न करणारं, पण करू लागेल किंवा नाहीदेखील!)
दालीचे स्पेनमधले खडक हे टुरिस्टांचं आकर्षण नाही असं नाही. चार-दोन रसिकांच्या बरोबर दालीची शोध आणि अभिव्यक्त भूमी पाहिली आणि मित्रा, तुझ्यासाठी ही आठवण ताजी केली.
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – क्रांती वा राजकीय सत्ता हाच एकमेव उपाय नाही
‘‘असहकारितेच्या चळवळीत असंख्य लोक कृती करतात. क्रांती हा असहकारितेचा प्राण आहे व धावपळ वा दाणादाण ही तिची रीत आहे. अशी धावपळ वा दाणादाण मोठय़ा प्रमाणावर केली तर तिचा शेवट बंडात होणे क्रमप्राप्तच असते. शिवाय क्रांती रक्तलांच्छित वा रक्तहीन असो, परिणाम एकच. क्रांती म्हणजे स्थित्यंतर. क्रांती सुरू झाली म्हणजे तिच्या निर्णयाविषयी सारीच अनिश्चितता असते. तिच्या ओघात गोंधळ व धोका ह्यापासून जास्त भय असते. क्रांती पुष्कळदा अटळ असते. तरीसुद्धा क्रांती व खरेखुरे सामाजिक स्थित्यंतर यांतील फरक विसरता कामा नये. क्रांती एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाच्या वा एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राच्या स्वाधीन राजकीय सत्ता करते. अस्पृस्यवर्गीयांनी नुसत्या राजकीय स्थित्यंतरावरच कोरडे समाधान मानून राहू नये. राजकीय सत्तेची अशा तऱ्हेची विभागणी झाली पाहिजे की, त्यामुळे समाजात खरा पालट होऊन समाजात वावरणाऱ्या परस्पर बळाअबळाच्या शक्तीत फरक पडेल.’’
डॉ. आंबेडकर दलितवर्गाला क्रांती साठी उद्युक्त करतानाच त्यांना सज्जड इशारा देताना म्हणतात –
 ‘‘तुम्हांला एक गोष्ट उघडपणे सांगण्याची संधी मी घेत आहे. ती म्हणजे अस्पृश्यांच्या सर्व दु:खांवर राजकीय सत्ता हाच एकमेव उपाय नाही. त्यांनी आपली सामाजिक जीवनाची पातळी उंचावण्यातच त्यांचा उद्धार आहे. त्यांनी आपली राहणी सुधारली पाहिजे. त्यांच्या राहणीत व वागणुकीत असा फरक पडला पाहिजे की, त्यामुळे त्यांच्याविषयी आदर व मत्री वृिद्धगत होईल. त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. निव्वळ लिहिणे, वाचणे, अंकगणित यांची ओळख असणे याने काही व्हायचे नाही. त्यांच्यापकी अनेकांची पातळी उंचावणार नाही. मग सर्व अस्पृश्य वर्गाविषयी लोकांच्या मनात आदर कसा वाढेल? त्यांच्या केविलवाण्या आत्मसंतुष्ट वृत्तीतून त्यांना धक्के देऊन जागे करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या ठायी ज्याच्यापासून मनुष्याची उन्नती होते तो दैविक असंतोष निर्माण केला पाहिजे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2014 1:01 am

Web Title: curiosity nitrogen gas n2
टॅग Curiosity,Navneet
Next Stories
1 कुतूहल – ऑक्सिजन वायू (O2)
2 कुतूहल – सल्फर डायॉक्सॉइड वायू (SO2)
3 कुतूहल: मिथेन वायू – ‘जळता बर्फ’
Just Now!
X