News Flash

कुतूहल: पॉलिहाऊसमधील फुलशेती

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असा विचार सर्वसामान्यांत रुजलेला आहे. या विचाराला चुकीचा ठरवत जळगावच्या ज्योती नंदर्षी यांनी

| July 8, 2013 12:09 pm

भारत हा कृषीप्रधान देश असला तरी उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती असा विचार सर्वसामान्यांत रुजलेला आहे. या विचाराला चुकीचा ठरवत जळगावच्या ज्योती नंदर्षी यांनी बँकेतील नोकरी सोडून फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. खरंतर बँकेतील नोकरी सोडून शेती व्यवसाय स्वीकारणं, म्हणजे एक धाडसच म्हणता येईल. पॉलिहाऊस (हरितगृह) तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी जरबेरा फुलांची शेती केली. आधुनिक शेती करण्यापूर्वी ज्योती नंदर्षीचे पती पारंपरिक पद्धतीने तीन एकर जमिनीत शेती करत होते. त्यात फारसा फायदा होत नव्हता. ज्योती नंदर्षी बँकेत कर्ज विभागात काम करत असताना त्यांना पॉलिहाऊसमधील फुलशेतीची माहिती मिळाली. त्यांनी ही फुलांची हायटेक शेती करण्याचा विचार केला. २००८मध्ये पॉलिहाऊस या तंत्रज्ञानाचा वापर करून जरबेरा फुलांची शेती केली.
शेती करण्यापूर्वी त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून आणि कृषी विभागाकडून जरबेराच्या लागवडीविषयी माहिती मिळवली. सरकारी अनुदान आणि कर्ज काढून फुलशेती करण्याची तयारी केली. सुरुवातीला १० गुठय़ांवर जरबेरा फुलांची लागवड त्यांनी केली. जळगावच्या उष्ण हवामानात पॉलिहाऊसमध्ये जरबेराची लागवड कशी करावी, यासाठी पुण्याच्या सल्लागारांकडून मार्गदर्शन व रोपे घेतली. लागवड केल्यानंतर तीन महिन्यांतच फुलांचं उत्पादन सुरू झालं. वर्षभरांतच ६-७ लाख रुपयांचे उत्पादन मिळालं. जळगाव, मुंबई, पुणे आणि मध्यप्रदेशातून जरबेराच्या फुलांची मागणी वाढली. फुलशेतीत यश मिळाल्याने ज्योती नंदर्षीचा आत्मविश्वास वाढला. एक वर्षांने त्यांनी आणखी १० गुंठय़ांवर फुलांची लागवड केली. दोन वर्षांतच २०१० मध्ये एक एकरवर फुलांची लागवड केली. दिवसाला साधारण ५००० फुलांचं उत्पादन त्यांना मिळतं. नोकरी करत असताना त्यांना वर्षांला जेवढं उत्पन्न मिळतं तेवढंच उत्पन्न त्यांना शेतीत दर महिन्याला मिळू लागलं. उन्हाळ्यात लग्न समारंभ बरेच असतात. त्यामुळे फुलांसाठी मागणीही भरपूर असते. उन्हाळ्यात फुलांचं उत्पादनही वाढतं. ज्योती नंदर्षीच्या पॉलिहाऊस मधीलफुलशेतीमुळे ८ ते १० मजुरांना कायमचा रोजगार मिळाला आहे.

जे देखे रवी..      लढा-६ (अंतुले)
भूखंडाचा लढा झाला तेव्हा स्वत: श्रीचंद हिंदुजा माझ्या घरी आले. Ambassador च्या जमान्यात हे  Silver Mercedes मधे बसून आले. रविवार सकाळी होती. साधा नेहरू सदरा आणि पायजम्यात मी त्यांचे स्वागत केले. घरात कोण इस्त्रीचे कपडे घालतो? आमच्यातला दुवा म्हणजे माझे कवडी मोल उत्पन्न आणि त्यांचे अब्जावधी रुपये याचा आयकर भरण्यासाठीचा गोळे नावाचा व्यावसायिक एकच होता. माझ्या अवताराकडे बघून हे बिचकलेच. हिने चहापाणी केले. त्यांनी त्यांच्या मानवीय महाकाय रुग्णालयाचे उद्दिष्ट मला जमजवून सांगितले. ‘ह्य़ा भूखंडाबद्दलचा लढा मागे घेता येईल का?’ अशी विचारणा केली. ‘तू होतकरू डॉक्टर आहेस तुला काय पाहिजे ते माग’ असे सुचवले. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझे आई वडील आणि इतर अनेक प्रामाणिक नातेवाईकांच्या मूर्ती दिसू लागल्या. ती बैठक विफळ ठरली. शपथ घेऊन सांगतो मला त्यांचे वाईट वाटले. आमचा लढा आणि हिंदुजाचे प्रयत्न असा लढा चालूच राहिला. रुग्णालय उभे राहत होते पण भूखंड शाबूत होता आणि प्रकरण महानगरपालिका आणि ते सरकार असे घुटमळत होते. एके दिवशी एक जोडपे मला भेटायला आले आणि म्हणाले ह्य़ा भानगडीबाबत आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री अंतुल्यांकडे घेऊन जातो. भेट तातडीने ठरली. का कोणास ठाऊक ती भेट ताजमहाल हॉटेलच्या एका प्रशस्त दालनात झाली. मी कागदपत्रे आणि त्या भयानक प्रस्तावाचे लाकडी टीि’ घेऊन गेलो होतो. मी दोन मिनिटेच बोललो असेन तेव्हा अंतुल्यांनी मराठीत ‘डॉक्टर गप्प बसा मी काय ते बघतो’ असे म्हणत फोन उचलला आणि आयुक्तांना फोन लावला आणि त्यांना सांगितले मी या क्षणी हिंदुजा रुग्णालयाला त्यांच्या इमारतीसाठी दिलेला पाच चटई निर्देशांक (ारक) दीडवर आणत आहे. तसे परिपत्रकही तुम्ही रुग्णालयाच्या नुकत्याच सुरू झालेल्या  भिंतीवर चोवीस तासात लावा. मग दुसरा फोन लावला तो पोलीस आयुक्तांना. अंतुले पो. आयुक्तांना म्हणाले ‘एक परिपत्रक हिंदुजा रुग्णालयावर लागणार आहे. एखादवेळेला गडबड होईल तेव्हा फौजफाटा लावलेला बरा’. मी आणि माझे सहकारी सुन्न झालो. मला म्हणाले ‘डॉक्टर आता निघा आणि निश्चित रहा आपण आता लवकरच भेटणार आहोत’. माझ्या प्रतिस्पध्र्याच्या किल्ल्याच्या बाहेरच्या पाण्याच्या पोटेवरून उडी मारून ह्य़ांनी बालेकिल्ल्यावरच हल्ला केला होता. अंतुले हे व्यक्तिमत्त्व पुढे गाजले ते अनेक कारणांमुळे. कारणे काहीही असोत या माणसाने एका घावात दोन तुकडे करून आमचा भूखंड आम्हाला परत दिला याचे हायसे वाटले. पण हे प्रकरण अर्थात एवढय़ावरच मिटायचे नव्हते. कारण लवकरच मला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे त्यांच्या एका दूताकरवी (अप्रत्यक्ष) निमंत्रण आले त्याबद्दल पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com
                  

वॉर अँड पीस    हृद्रोग-१
हृद्रोगावरील उपचार म्हणजे गंमत नव्हे, याचा अनुभव दोन हृद्रोगी रुग्णांनी मला दिला. मुंबईत हृदयाच्या झडपेचे महागडे शस्त्रकर्म परवडणार नाही. म्हणून पालकांनी माझे आयुर्वेदीय उपचार सुरू केले. सातत्याने उपचार असेपर्यंत मुलगी ‘शुक्लेंदुवत’ सुधारत गेली. काही काळाने रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. नातेवाईकांच्या डोक्याने, मुलीचे शस्त्रकर्म करावे असे घेतले. दुर्दैवाने शस्त्रकर्म फेल होऊन दहा वर्षे आयुर्वेदीय औषधांनी जगलेली मुलगी परलोकी गेली. बऱ्याच वेळा शस्त्रकर्मात जीव, पैसा, अक्कल या तीनही गोष्ट जातात त्याचा प्रत्यय आला.
आमच्या रुग्णालयात एक तरुण हृद्रोगाकरिता प्रवेशित झाला. केलेल्या उपचारांनी दीड-दोन महिन्यांत बरे वाटले. अधिक काळ राहणे शक्य नसल्यामुळे घरी राहण्याचा सल्ला आम्ही दिला. नातेवाईकांनी गावाकडून यावयास विलंब लावला, ‘नातेवाईक आपणास का नेत नाहीत’ या चिंतेने एक दिवस सकाळी जोराची धाप सुरू झाली; त्यातच त्याचा अंत होऊन हृद्रोगातील दिसणारे यश किती फसवे असते याचा अनुभव आला.
‘सदर्न कमांड’ पुणे येथील एक सैन्यातील जवान ‘माझ्या हृदयाच्या झडपांचे ऑपरेशन करणे आवश्यक आहे, असे आमचे डॉक्टर सांगतात, पण मला ते करावयाचे नाही. बैदजी, आपके पास ऐसी कोई जालीम दवा है क्या की जिससे मै झुटकारा पाँऊ?, असे मोठय़ा आशेने विचारता झाला. मी स्वत: माजी सैनिक असल्यामुळे या जवानाकरिता आयुर्वेदातील उत्तम उपचार कसोशीने करावयाचे ठरविले. अर्जुनसालसिद्ध दूध प्रथम दोन आठवडे दिले. त्याने हुशारी वाढली. मग पुढचे पाऊल म्हणून अर्जुनसिद्धघृत तयार करून दिले. महिनाभराच्या उपचाराने सर्जनांनीच शस्त्रक्रियेचा विचार पुढे ढकलला. हेच उपचार आणखी तीन महिन्याने पुढे चालू ठेवल्याने जवान सक्षम झाला. हृदयाच्या झडपेतील दोष बरेच कमी झाल्याचे पुढील तपासणीत आढळून आले. हे आयुर्वेदावरील नितांत श्रद्धेचे, तसेच नेमक्या औषधी योजनेचे, खास करून अर्जुनाचे फल मी समजतो. अर्जुनवृक्षाला शतश: प्रणाम!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   ८ जुलै
१८६९ > इतिहास संशोधक बाबासाहेब देशपांडे यांचा जन्म. मराठय़ांच्या इतिहासासह शिवराम आणि रामदास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. ‘श्री सज्जनगड’ हे त्यांनी लिहिलेले मराठी पुस्तक.
१९१६ >  कादंबरीकार, दुर्ग साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचा जन्म. गोनीदा यांच्या नावावर २२ कादंबऱ्या, ६ प्रवासवर्णने, ११ धार्मिक व पौराणिक ग्रंथ, नाटके आणि बालसाहित्य आहे. ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘आनंदभुवन’ या सामाजिक विषयांवर कादंबऱ्या लिहिल्या.
१९८४ >  ‘आनंदयात्री’ कवी, कथा, कादंबरीकार, ललित लेखक बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षीच ‘प्रतिभा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. ‘तेथे कर माझे जुळती’ या कवितेच्या गायनाने महाराष्ट्रभर नावलौकिक. ‘जीवनसंगीत, दूधसाखर’, मिळून १४ काव्यसंग्रह प्रकाशित. ‘कागदी होडय़ा’, ‘पावसापुरता प्रकाश’ हे ललित लेखसंग्रह तर ‘मावळता चंद्र’, ‘भावीण’, ‘प्रियदर्शिनी’ ही त्यांच्या ललित साहित्यावरील पुस्तके. रवींद्रनाथांवर काही पुस्तके लिहिली, तसेच म. गांधीजींच्या पुस्तकांच्या आणि स्टीफन स्वाइंगच्या कादंबऱ्यांचे अनुवाद केले. भारतीय जीवनात अनुस्यूत असलेली विचारधारा आणि सांस्कृतिक परंपरा यातून बोरकरांच्या सर्वच लेखनाचे जीवनरस घेतलेला आहे.
संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 12:09 pm

Web Title: curiosity polyhouse floriculture budding
टॅग : Farming
Next Stories
1 कुतूहल: सेंद्रिय उत्पादने व ग्राहक -२
2 कुतूहल: सेंद्रिय उत्पादने व ग्राहक -१
3 कुतूहल: आसवे आणि अरिष्टे
Just Now!
X