पर्यावरण संवर्धन व संरक्षण या क्षेत्रात बारामती येथील ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ ही संस्था कार्यरत आहे. फोरमच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी प्रचार व प्रसार, वृक्षारोपण, वसुंधरा फेस्टिवल, वन्यजीव बचाव असे विविध कार्यक्रम राबविले जातात.
बारामती व आसपासच्या परिसरात ३०० पेक्षा जास्त लहानमोठे पाझर तलाव आहेत. यांपकी काही तलाव ब्रिटिशकालीन आहेत. या तलावांमधील गाळ काढण्याचे काम वर्षांनुवष्रे झाले नव्हते. ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तलावांमध्ये अनेकदा घातक जलपर्णी, गारवेल अशा वनस्पतींची वाढ होते. यामुळे पुरेसा पाणीसाठा होण्यात अडचणी येतात. शिवाय पाण्यात विषारी द्रव्ये मिसळतात. पाणीसाठा वाढविण्याबरोबरच त्यात विषारी द्रव्ये मिसळू नयेत, यासाठी फोरमने ‘प्रकल्प मेघदूत’ची योजना आखली.
 वर्षांनुवष्रे मातीची धूप होऊन ही माती पावसाच्या पाण्याबरोबर तलावांमध्ये वाहून येते. माती साचल्यामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता कमी होते. तलावांशेजारील बहुतांश जमिनींमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने पाणी साठवण क्षेत्रातील जागेचा उपयोग शेतीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश तलावांचे भराव व सांडवे फोडले जातात. अनेक पाझर तलावांचे भराव फोडल्याने पाणी साठवण क्षेत्रात पाणी साठून न राहाता वाहून गेल्याचे निदर्शनास आले. पावसाच्या पाण्याबरोबर मोठय़ा प्रमाणात वाहून येणारा गाळ न उपसल्यामुळे तलावांमध्ये ५ ते १५ फुटांपर्यंत मातीचे थर साठलेले आढळले. गारवेलसारख्या वनस्पतींनी तलावाचा जवळजवळ ७० ते ९० टक्के भाग व्यापलेला आहे. तलावाच्या सांडव्यावरती असलेल्या साधी बाभूळ या उपयुक्त वनस्पतीची मोठय़ा प्रमाणात तोड होते. गाळाच्या उपस्याबरोबर अनेक दशके तलावाच्या डागडुगीची कामेसुद्धा झाली नव्हती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मेघदूत प्रकल्पाची योजना आखण्यात आली.
तलाव संवर्धनासाठी काम सुरू करण्यापूर्वी गावातील लोकांमध्ये त्याबाबत जाणीवजागृती निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी  ग्रामपंचायतीमध्ये चर्चासत्राचे आयोजन करून गावातील लोकांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.

वॉर अँड पीस     पाडादायक वातविकार : उरुस्तंभ-आढय़वात : भाग-८
माझा वैद्यकीय व्यवसाय खासकरून पुणे-मुंबईत आहे. दर आठवडय़ाला माझ्याकडे दोनपाच ‘दणदणादण’, खूप वजन वाढलेले, मांडय़ा व नितंबाचे भरपूर पोषण झालेले; जास्त करून महिला रुग्ण येतात. त्यांच्या पुढीलप्रमाणे कथा मी ऐकतो. ‘काही अन्न जिरले व काही न जिरले अशी स्थिती असता थंड, उष्ण, पातळ, कोरडे, जड व स्निग्ध पदार्थ फार सेवन केल्याने तसेच श्रमाने, शरीराचा क्षोभ करणाऱ्या क्रियेने, पार निजल्यामुळे व जागल्यामुळे कफ, मेद व वायू यासह संचित झालेला आम पित्ताचा पराभव करून मांडय़ात आला असता मांडीतील हाडे आतून ओलसर व घट्ट कफाने भरून टाकतो, त्यामुळे मांडय़ा ताठतात, स्थिर होतात, गार होतात व त्यांची क्रिया बंद होते. त्यात कळा फार लागतात व जड झाल्यामुळे आपल्या नव्हे तशा वाटतात. तसेच चिंता, अंग मोडणे, अंगास ओलसरपणाचा भास, वांती, झापड, अरुची व ज्वर हे विकार होतात. तसेच पाय गळतात, उचलण्यास कष्ट पडतात व मेहेरी येते.’ या रोगास कोणी ऊरुस्तंभ, कोणी आढय़वात असे म्हणतात.
आयुर्वेदीयशास्त्रात रोगी कसा असावा याचे वर्णन पुढील एका ओळीत केले आहे. ‘आढय़ो रोगी भिषग्वश्यो ज्ञापक: सत्त्ववानपि।’
रोगी श्रीमान म्हणजे वैद्यांनी सुचविलेले विविध उपचार करून घेण्याकरिता समर्थ असला पाहिजे असा ‘आढय़’ शब्दाचा अर्थ आहे. इथे जग उलटे चालले आहे. खूप खायचे-प्यायचे, दुपारी झोपायचे, फ्रीज आणि एसीचा बेबंद वापर करायचा, डॉक्टर वैद्यांची बिले भरायची असा सर्रास प्रवास चालला आहे.
आपल्या शरीरात स्तन, मांडय़ा व नितंब हे तीन अवयव सर्वस्वी मेदाचे आश्रयस्थान म्हणून गणले जातात. उपचार साधे, सोपे. फाजील मेद, चरबी कमी करणारे याकरिता आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, लाक्षादि, सिंहनाद, संधिवातारी, गणेश, त्रिफळागुग्गुळ प्र. ३ दोन वेळा गरमगरम पाण्याबरोबर घेणे. ज्वारी-बाजरीची भाकरी, उकडलेल्या बिनमिठाच्या भाज्या, सकाळ-सायंकाळ भरपूर फिरणे व रोगमुक्त होणे. इति. अलम्।
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  १ जुलै
१८८७ : कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.  रेंदाळकरांची कविता खंड १, २ यामध्ये सर्व कविता समाविष्ट
१९०६- ललित व वैचारिक लेखन करणाऱ्या गांधीवादी लेखिका प्रभा श्यामराव कंटक यांचा जन्म. ‘काम आणि कामिनी’, ‘अग्नियान’ या कादंबऱ्या, ‘भ्रांतजीवन’ हा नाटिकांचा संग्रह, हिंदी स्त्रियांचे जीवन, ‘महाभारत- एक मुक्त चिंतन’ या पुस्तकांसह ‘सत्याग्रही महाराष्ट्र’ या ग्रंथातून म. गांधीजींच्या चळवळींचा इतिहास चितारलाय.
१९४७- कादंबरीकार, नाटककार, चरित्रकार, अनुवादक, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, आरोग्य, पाकशास्त्र, भारतीय राजकारण अशा वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथकर्ते लक्ष्मण नारायण जोशी यांचे निधन. ‘शिवछत्रपतींचा अस्त व संभाजीचे राज्यारोहण’, मराठेशाहीची ढाल, ‘विजयी तलवार’ मिळून १२ ऐतिहासिक कादंबऱ्या, तसेच नटसम्राट गणपतराव जोशी, संत तुकाराम, महाराणा प्रताप यांची चरित्र याशिवाय संगीत दामाजी, पाटीलबोवा अर्थात महादजी शिंदे या ऐतिहासिक व काही अनुवादित नाटके त्यांच्या नावावर जमा आहेत.
१९८९- कवी, कथाकार गणेश हरी पाटील यांचे निधन. ‘पाखरांची शाळा’ यात त्यांच्या बालकविता तर ‘तिंबोळ्या’ या संग्रहात त्यांची सहजसुंदर अभंगरचना आहे.
संजय वझरेकर

जे देखे रवी..   पूर्वरंग
मी अमेरिकेत वृक्ष बघितले आणि मैदाने आणि नीट सांभाळलेली मोकळी कुरणे आणि फुलांचे ताटवे आणि फुलझाडे आणि बगिचे. मी परत आल्यावर सत्तरच्या दशकात आमच्या घराजवळ वृक्षांची वानवा होती. आमच्या सहनिवासाच्या पदपथावर एक उकिरडा होता आणि या सहनिवासात उच्चभ्रू सुशिक्षित नव्हे, विद्याविभूषित मराठी कुटुंबे राहत होती. या पदपथाच्या उकिरडय़ावर ‘ड्रगीज’ म्हणजे चिलीम ओढणारे बसत असत आणि अंधार होई तेव्हा इथे संशयित स्त्रिया उभ्या असत आणि गाडय़ांमध्ये बसून प्रयाण करीत. एका पावसाळ्याच्या तोंडावर मी मनात घेतले आणि स्व-खर्चाने सहनिवासातल्या रस्त्याच्या कडेला आणि या पदपथावर खड्डे पाडून घेतले आणि वाट बघत बसलो. पावसाळा सुरू झाला तसे जे थोडे वृक्ष आसपास अनाहूतपणे वाढले होते त्यांच्या फांद्या कापण्यासाठी महानगरपालिकेच्या गाडय़ा फिरू लागल्या तेव्हा कापलेल्या पांगारा व भेंडा या झाडाच्या कापलेल्या फांद्या मी या खड्डय़ात रोवल्या आणि वर स्व-खर्चाने लालमाती आणून ती भरली. सहनिवासातल्या काही लोकांनी कौतुकाने बघितले, काही लोक निर्विकार राहिले, काहींनी विचारले ही जगतील का? आणि काहींनी नाक मुरडले. पण हे सगळे दुरूनच. पावसाळा संपला तेव्हा ही झाडे जगली असे दिसू लागले आणि पाणी दिल्याशिवाय तरतरून वाढू लागली तेव्हा कौतुकाचा स्तर वाढला. पदपथ सुधारला आणि चिलीमवाले आणि उकिरडा गेला. काही म्हणाले, ‘ही कसली झाडे लावली? यापेक्षा कितीतरी चांगल्या जातीची झाडे असतात.’ मी त्यांना म्हणालो, ‘घेऊन या, मी लावतो.’ कोणीच झाडे आणली नाहीत, तेव्हा माझे काम सोपे झाले. हल्ली ही झाडे आमच्या सहनिवासाच्या इमारतीएवढी उंच झाली आहेत. अर्थात कुरकुर चालूच आहे. एक बाई म्हणाल्या, ‘ही झाडे लावल्यापासून रस्ताच दिसत नाही.’ तेव्हा मी म्हणालो, ‘पण रस्त्यावरचा धूर आणि धूळ येत नाही.’ तेव्हा ‘हो, तेही खरेच!’ असे काही म्हणाल्या नाहीत. एक म्हणाले, या झाडांमुळे सूर्यप्रकाशच नाही आणि दिवसा दिवे लावावे लागतात. गंमत अशी, अनेक सदनिकाधारकांनी खिडक्यांच्या काचांना थोडाफार काळा रंग लावला आहे. पडद्यांचा सोस तर जुनाच आहे आणि नैसर्गिक किंवा पंख्याचा वारा पुरत नाही म्हणून घरे पॅकबंद करून वातानुकूल यंत्रे बाहेर पाण्याचे ठिबक सिंचन करीतच आहेत. झाडे वाढली म्हणजे पाने पडणारच. त्यासाठी उेस्र्२३ चालू केले तर त्यामुळे डास झाले, असा सूर निघाला. हा शोध नवाच आहे. त्या योजनेसाठी महानगरपालिकेने आम्हाला बक्षीस दिले आहे, पण लक्षात कोण घेतो? मीही दुर्लक्ष करतो. आपल्याला पटेल तसे वागणे आणि इतरांकडे दुर्लक्ष करणे हेही गीतेचेच सार आहे.
पुढच्या लेखापासून मूळ कादंबरी.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com