News Flash

कुतूहल: जेनी

हाताने चालविण्याच्या चरख्याला एकच चाते असे आणि त्यामुळे एका वेळी एकाच सुताची कताई करून एकच बॉबिन बनविता येत असे.

| June 1, 2015 12:43 pm

इ.स. १७४० पर्यंत सूतकताई चरखा वापरून हाताने केली जात असे. हाताने चालविण्याच्या चरख्याला एकच चाते असे आणि त्यामुळे एका वेळी एकाच सुताची कताई करून एकच बॉबिन बनविता येत असे. त्यामुळे चरख्याने सूत काढण्याच्या प्रक्रियेची प्रतिमाणशी उत्पादकता अत्यंत कमी होती. दरम्यानच्या काळात विणाई तंत्रात मोठे बदल होऊन धोटय़ाचा शोध लागला होता. त्यामुळे विणाई यंत्राची म्हणजेच मागाची उत्पादकता आणि त्याला लागणाऱ्या सुताची मागणीही वाढली होती. या दोन्ही कारणांमुळे सूतकताई यंत्राची उत्पादकता वाढविणे अपरिहार्य होते. सूतकताईची उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करत होते. त्याला यश येऊन १७६४ मध्ये इंग्लंडमधील शास्त्रज्ञ जेम्स हारग्रीव्हस याने ‘जेनी’ या कताई यंत्राचा शोध लावला. जेनी हे एक अनेक चात्यांचे सूतकताई यंत्र आहे. सुरुवातीला जेनीला ८ चाती असत आणि पुढे त्यामुळे एकच कामगार एका वेळी ८ चात्यांवर सूत काढू शकत असे. पुढे या यंत्राच्या आधुनिकीकरणाबरोबर चात्यांची संख्या १२० वर जाऊन पोहोचली. जेनीमुळे सूत काढण्यासाठी लागणारे परिश्रम कमी झाले व सूतकताईचा खर्चही कमी झाला.
जेनीमध्ये एका धातूच्या चौकटीवर एका बाजूला ८ चाती बसवलेली असतात. यंत्रावर दुसऱ्या बाजूला  एका तुळईवर वातीच्या बॉबिन बसविलेल्या असतात. चात्यांना एका मोठय़ा चाकाच्या साहाय्याने गती देता येते. हे चाक हाताने फिरविले जाते. या पद्धतीने  एकाच वेळी आठ चाती फिरविता येतात. वाती चात्यांवर नेताना एका दांडीवरून नेल्या जातात. कामगाराच्या डाव्या हाताने ही दांडी वर उचलून वातीस खेच देता येतो. यावेळी जसजशी वात खेचली जाईल, तसतसे चाक हाताने फिरवून थोडा थोडा पीळ दिला जातो. दांडी पूर्णपणे वर गेल्यावर खेच प्रक्रिया पूर्ण होते व त्या वेळी चाक गतीने फिरवून पूर्ण पीळ दिला जातो. त्यानंतर दांडी खाली आणली असता तयार झालेले सूत चात्याशी काटकोनात येते आणि चाकाने चाती फिरविली असता तयार झालेले सूत चात्यावर बसविलेल्या बॉबिनवर गुंडाळले जाते. बॉबिनवर सूत व्यवस्थित गुंडाळण्यासाठी एक छोटी तार वापरून सूत बॉबिनवर वरखाली गुंडाळले जाते.  अशा रीतीने जेनी यंत्रावर सूतकताई केली जाते.

संस्थानांची बखर: राज्यकर्त्यांच्या उपाध्या
भारतीय राज्यकत्रे स्वत:च्या नावामागे विविध उपाध्या किंवा पदव्या लावून घेत. िहदू राज्यकर्त्यांनी राजा, राजे, छत्रपती, वाडियार किंवा ओडियार, राणा, राव, रावत, रावल, ठाकोर, ठाकूर, देशमुख, सरदेसाई, इनामदार, सरंजामदार इत्यादी विशेषणे घेतली.
अधिक प्रतिष्ठेचा म्हणून िहदू शासक आपल्या पदवीला ‘महा’ हा शब्द जोडीत. जसे महाराजा, महाराणा, महाराव इत्यादी. काही राज्यकत्रे आपल्याला जोड उपाध्या लावून घेत. जसे राजाधिराज, महाराजाधिराज, राजा-इ-राजन, राजेबहादूर इत्यादी. अनेक राजघराण्यांतील राजे स्वत:ला वर्मा, वर्मन हे विशेषण लावीत तर शीख राज्यकत्रे स्वत:ला राजा, महाराजा आणि खालच्या श्रेणीचे राज्यकत्रे स्वत:ला सरदार ही उपाधी लावून घेत.
मुस्लीम राज्यकत्रे स्वत:ला बादशाह, सुलतान, निजाम, नवाब, वली, दरबार साहीब, जामसाहीब, दिवाण, मेहतर, मीर इत्यादी उपाध्या लावीत. या सर्व उपाध्यांचा अर्थ जरी ‘राजा’ असा होत असला तरी ब्रिटिशांनी त्यांना राजा आणि त्यांच्या राज्यक्षेत्राला राज्य या अर्थी किंग आणि किंगडम न म्हणता प्रिन्स आणि प्रिन्सली स्टेट असा शब्दप्रयोग केला. त्यांना किंग म्हटले असते तर ते इंग्लंडच्या राजाच्या, सम्राज्ञीच्या पंक्तीत येऊन ब्रिटिशांची प्रतिष्ठा कमी झाली असती! ते टाळणे हा ब्रिटिशांचा यामागे अंतस्थ हेतू होता! काही राज्यकर्त्यांना इंग्लंडचा बादशाह किंवा सम्राज्ञी जसा सुवर्ण राजमुकुट वापरतात त्याप्रमाणे आपणही मुकुट वापरावा असे वाटू लागले. त्याप्रमाणे त्यांनी बनवून घेतलेदेखील; परंतु याची कुणकुण लागताच कंपनी सरकारच्या व्हाइसरॉयने मुकुट परिधान करण्यावर बंदी घातली.
मुकुट परिधान करण्याची लायकी फक्त इंग्लंडच्या राज्यकर्त्यांचीच असल्याची कंपनी सरकारची धारणा होती. भारतीय संस्थानिकांनी मग दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे हिरे-माणकांनी लगडलेल्या, रत्नजडित पगडय़ा वापरणे सुरू केले!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:43 pm

Web Title: curiosity spinning jenny
टॅग : Curiosity
Next Stories
1 सूतनिर्मितीचा इतिहास व उत्क्रांती – २
2 सूतनिर्मितीचा इतिहास व उत्क्रांती- १
3 कुतूहल: सूतनिर्मितीचे तंत्र -२
Just Now!
X