भारताचा गोडय़ा पाण्यातील मत्स्य उत्पादनात जगात दुसरा क्रमांक लागतो. गोडय़ा पाण्यातील मत्स्यव्यवसायाचा दर ६ टक्के एवढा आहे. एकूण मत्स्यव्यवसायाचा दर ४.५ टक्के आहे. खोल समुद्रातील मासेमारीपासून उत्पन्नात थोडी फार वाढ होऊ शकते. परंतु मत्स्यसंवर्धन क्षेत्रात मात्र प्रगतीसाठी मोठय़ा प्रमाणात वाव आहे.
महाराष्ट्रात गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ३ लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र उपलब्ध आहे. आपल्याकडे गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये मत्स्यजिरे हे मत्स्यबीज या आकारापर्यंत संगोपन तलावांमध्ये वाढवले जातात. दुसऱ्या टप्प्यामध्ये मत्स्यबीज हे मत्स्यबोटुकली आकारापर्यंत वाढवतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये मत्स्यबोटुकली बाजारपेठेला योग्य अशा आकारमानापर्यंत वाढवतात. अशा प्रकारच्या गोडय़ा पाण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापकी ८५ टक्के एवढा भाग भारतीय प्रमुख कार्प या जातीच्या माशाच्या संवर्धनापासून मिळतो.
गोडय़ा पाण्यातील मत्स्यसंवर्धन उत्पन्न वाढीकरिता शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बीज योग्य वेळी उपलब्ध होणे आवश्यक आहे. जलाशयामधून अधिकतम मत्स्यउत्पादन मिळण्याकरिता मत्स्यबोटुकली आकाराचे बीज सोडले पाहिजे. परंतु बोटुकलीअभावी मत्स्यशेतकरी जलाशयामध्ये मत्स्यबीजाचे अथवा मत्स्यजीवांचे संवर्धन करतात. मत्स्यबोटुकलींची असणारी प्रचंड मागणी व पुरवठा यांमधील तूट भरून काढण्यासाठी अधिकाधिक मत्स्यबीज केंद्रे व संगोपन तलाव निर्माण होणे आवश्यक आहे.
गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये जम्बो कोळंबी संवर्धन हा एक अधिक आíथक नफा देणारा व्यवसाय आहे. गोडय़ा पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये आंध्र प्रदेश हे एक अग्रेसर राज्य आहे. गोडय़ा पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापकी ८७ टक्के एवढे उत्पन्न फक्त आंध्र प्रदेश राज्यामधून मिळते. गोडय़ा पाण्यातील कोळंबी निर्यातक्षम व अधिक नफा देणारी असल्यामुळे याच्या संवर्धन क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात सतत ऊस शेतीमुळे क्षारपड झालेल्या जमिनीमध्ये कोळंबी संवर्धन व्यवसाय यशस्वीरीत्या केला जात आहे.

जे देखे रवी..      धुतले तांदूळ
मी भ्रष्टाचारावर लंबेचौडे लिहितो आहे. परंतु मी काही धुतल्या तांदळासारखा नाही. जो मुंबईत गाडी चालवतो तो हातसडीच्या तांदळासारखाच असतो. गाडीला कुठे पोचा पडला तर तो नीट करून घेण्यासाठी जी असंख्य गॅरेजेस मुंबईच्या रस्त्यावर आहेत त्यातली नव्याण्णव टक्के बेकायदेशीर आहेत. शिवाय गाडी चालवताना कधीतरी पट्टा लावायचा कंटाळा येतो आणि त्याच दिवशी पकडला गेलो ‘लायसन’ दाखवण्याची प्रक्रिया पार पडल्यावर पोलीस माझ्याकडे बघू लागला तेव्हा म्हणालो ‘पट्टा लाऊन माझ्या खांद्याला खरचटले आहे’ तेव्हा म्हणाला ‘गाडी साइडला घ्या मग म्हणाला उतरा आणि उतरल्यावर हसत हसत म्हणाला ‘शर्ट काढा’. मीही ताणले म्हणालो ‘ट्रॅफिक पोलीस अशी झडती घेऊ शकत नाहीत’ तेव्हा म्हणाला ‘ठीक आहे लायसन्स द्या, दोनशे रुपये भरा पैसे आणि लायसनची पावती घ्या आणि उद्या ठाण्यावर येऊन लायसन घेऊन जा.’ मग मी नमलो आणि म्हणालो ‘अहो मी डॉक्टर आहे आधीच उशीर झाला आहे’. तेव्हा तो म्हणाला ‘हे आधी का नाही सांगितले?’ मग म्हणाला ‘माझ्या मुलाच्या पोटात दुखते आहे काय करू?’ तेव्हा मी म्हटले ‘अहो जंत झाले असतील’ तेव्हा म्हणाला ‘हा तेच असणार’ मी लगेचच बॅग उघडली माझ्या नावाचा कागद काढला त्यावर औषध लिहिले त्याला पन्नास रुपये औषधासाठी दिले तेव्हा तो म्हणाला ‘बघा तुमचेही काम झाले माझेही झाले’.
   या प्रकरणात काय घडले? लाचलुचपत की दानधर्म? ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे. त्यात ते म्हणतात ‘घरात चोरी झाली आणि पैसे गेले तर चोर गरीब होता म्हणून तुमच्या हातून दामधर्म झाला असे समजू नका’. मी ज्या दोन तीन धर्मादाय संस्था चालवल्या तेव्हा ‘किती पाहिजे तेवढे घ्या परंतु माझ्या नावाने पावती फाडू नका असे म्हणणारे अनेक भेटले. याचे कारण त्यांचे पैसे बेकायदेशीर होते. हे दानशूर की गुन्हेगार?’
    टिळक रुग्णालयात एक डॉक्टर होते ते बाहेर पैसे घेतल्याशिवाय शस्त्रक्रिया करीत नसत. मी त्यांना म्हटले तुम्ही असे का कायदे मोडता? ते मला म्हणाले ‘कोणाचे कायदे देवाचे की महानगरपालिकेचे?’ मी पैसे घेऊन शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारतो. ‘तू त्या रूग्णालाच विचार की त्याला पैसे देऊन हायसे वाटले की नाही ते?’ मला एक म्हणाला ‘पैसे खायला ताकद लागते जे पैसे खात नाही त्यातले फारच थोडे महाभाग समाज चांगला चालावा म्हणून तसे करतात. बहुतेक भितात आणि कच खातात आणि वर उलट गर्वाने मिरवतात’.
तो म्हणाला ‘आपण सगळे चोर असतो. काही मोठे काही छोटे एवढाच फरक’
रविन मायदेव थत्ते

वॉर अँड पीस: लठ्ठपणा व पांडुता : वाढता आजार
दिवसेंदिवस लहान-मोठय़ा शहरात, एकाच वेळी शरीरातील चरबी खूप वाढणे, छाती, पोट, मांडय़ा यांची अनैसर्गिक भरपूर वाढ; व त्याच वेळी रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सात धातूंची निर्मिती आपल्या शरीरात रोजच्या आहारविहारामुळे होत असते. आहारविहारातील संतुलन बिघडले; पाचकाग्नीचे कार्य मंदावले, पण खाण्यापिण्याच्या पदार्थात मेदस्वी पदार्थ वाढले की स्वाभाविकपणेच शरीरात चरबी वाढते.
कफ रसाचा मल आहे. हा मलभाग वाढतो. शरीरात साठणारा हा मलभाग शरीरातून वाहणाऱ्या वाहिन्यांमध्ये साचून राहतो. हा बाहेर काढणे सहजी जमले नाही तर विविध लक्षणे जाणवू लागतात. सुरुवात होते ती आलस्य, गौरव, अरुची ह्य़ा लक्षणांनी नकळत वजन वाढू लागते. पोट, स्तन, गाल, नितंब यावर मेद संचिती होऊ लागते. अधिक ऊठबस करण्याचा कंटाळा येतो. झोप वाढते. भूक विशेष कमी होत नाही. श्रम करताना घाम येतो. क्वचित धाप लागते. दुपारी झोप व विश्रांती याची उगाचच गरज भासते. वयाच्या साठ-पासष्ठीपर्यंत प्रत्येक स्त्री-पुरुषाने दुपारची झोप टाळायलाच हवी.
अशा या खूप लठ्ठ स्त्री-पुरुषांचा अग्नी चांगला असतो. खाण्यापिण्याची ददात नसते. ‘आपला हात जगन्नाथ’ असे स्वयंपाकघर यांच्या ताब्यात असते. नेमके इथे असंतुलित आहार, चरबीयुक्त, प्रोटिनयुक्त, कॅलशियमयुक्त, व्हिटॅमिनयुक्त घेतला जातो. नेहमीचे अन्न पचेल त्यातून चांगला आहाररस बनेल; पुरेसे रक्त बनेल पण चरबी वाढणार नाही याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. मग वजन ७५/८० किलो, एच.बी.मात्र आठ-दहा असे असंतुलन होते. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादि, शंृग, पुष्टीवटी रक्ताचे प्रमाण वाढवितात. त्रिफळा गुग्गुळ, गोक्षुरादि, लाक्षादि, सिंहनाद, आम्लपित्तवटी यामुळे चरबी कमी होते. आळणी, ज्वारीयुक्त आहार, उकडलेल्या भाज्या, गरमगरम पाणी यांना विसरू नये.

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ९ सप्टेंबर
१९१८ > मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे यांचा जन्म. ज्ञानेश्वरीच्या भाषावैशिष्टय़ांवरील प्रबंध, ‘यादवकालीन महाराष्ट्र’ हे पुस्तक, तसेच ‘भाषा : अंत:सूत्रे आणि व्यवहार’ आणि श्रीपतीभट्टाची ‘ज्योतिषरत्नमाला’ व त्यावरील मराठी टीकांचे संपादन, ही त्यांची कामगिरी.
१९७८> मराठीत ग्रंथालयशास्त्रासारख्या किचकट विषयावर व्यासंगपूर्ण लेखन करणारे  वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर यांचे निधन. ‘ग्रंथालयांची व्यवस्था’, ‘ग्रंथवर्गीकरणाची कोलन पद्धत’ तसेच ‘ग्रंथपालाचे आप्त’ ही त्यांची पुस्तके.
१९८० > चरित्रकार व गांधीवादविषयक पुस्तके लिहिणारे दा. न. शिखरे यांचे निधन. ‘मराठीचे पंचप्राण’ या १९५०पर्यंतच्या साहित्याचा परिचय त्यांनी करून दिला होता. गांधीचरित्राखेरीज आगरकर, बजाज, नेहरू यांची चरित्रपुस्तके त्यांनी लिहिली.
१९९१> ‘बगळय़ांची माळ फुले..’ , ‘आज राणी पूर्विची ती प्रीत तू मागू नको’, ‘त्या तरुतळी विसरले गीत’ अशा गीतकाव्यांसह ‘वेलांटी’, ‘दोनुली’, ‘रुद्रवीणा’, ‘मावळते शब्द’ आदी सात काव्यसंग्रह आणि ‘मरणगंध’ हे नाटय़काव्य लिहिणारे कविवर्य वामन रामराव (वा. रा.) कांत यांचे निधन.
संजय वझरेकर