News Flash

कुतूहल: व्हॅनिला फ्लेवर

कुठलाही पदार्थ फक्त तोंडाने खाल्ला जात नाही, तर तो डोळ्यांना सुखद वाटला पाहिजे तसेच त्याच्या सुगंधानेही तो आपल्याला खावासा वाटला पाहिजे.

| August 2, 2014 03:17 am

कुठलाही पदार्थ फक्त तोंडाने खाल्ला जात नाही, तर तो डोळ्यांना सुखद वाटला पाहिजे तसेच त्याच्या सुगंधानेही तो आपल्याला खावासा वाटला पाहिजे. स्वयंपाकघरात कोणता पदार्थ शिजतोय हे त्याच्या सुगंधावरून ओळखला जातो. आणि या सुगंधाने आपली भूक चाळवली जाते. पदार्थाच्या स्वत:च्या सुगंधाव्यतिरिक्त आपण काही पदार्थ सुगंधासाठी म्हणून वापरतो. गोड पदार्थातील वेलची, जायफळचा सुगंध आपल्याला आवडतो. एकंदरच पदार्थ सुगंधित बनवण्याकडे आपला कल असतो. मग ते आइस्क्रीम असो वा केक. अगदी नेहमीचा चहा किंवा कॉफीसुद्धा आपल्याला आलं, जायफळ घालून प्यायला आवडते. विविध सुगंधांसाठी नसíगक पदार्थाचा वापर तर केला जातोच, पण कृत्रिम म्हणजेच काही रसायनांचा वापरदेखील केला जातो. खरं तर ही सुगंधित द्रव्य किंवा पदार्थ मूळ पदार्थाच्या चवीत बदल करतातच असे नाही, पण तरीदेखील पदार्थात ती आवर्जून वापरली जातात.
लहान मुलांच्या विशेष आवडीचा सुगंध म्हणजे व्हॅनिला. व्हॅनिला फ्लेवर आइस्क्रीमध्ये जास्त वापरला जातो. खरं तर व्हॅनिला आइस्क्रीम म्हणजे प्लेन, नुसतं आइस्क्रीम असंच समजलं जातं. इतका हा सुगंध आइस्क्रीमच्या बाबतीत आपल्याला सवयीचा झालेला आहे. व्हॅनिला हे सुगंधित द्रव्य व्हॅनिलाच्या शेंगांपासून तयार करतात. व्हॅनिलातील व्हॅनिलिन म्हणजेच ४ हायड्रॉक्सी-३ मिथॉक्सी बेंझलडीहाइड या रसायनामुळे सुगंध येतो. याव्यतिरिक्त व्हॅनिलामध्ये पिपिरिनॉल असतं.
१८५८ मध्ये गोबले याने सर्वप्रथम व्हॅनिलाच्या शेंगांपासून व्हॅनिलाचा अर्क वेगळा केला. १८७४ पासून व्हॅनिलाचा अर्क दोन प्रकारांत मिळू लागला. खऱ्या व्हॅनिलाच्या शेंगांपासून मिळणारा अर्क म्हणजे खूप रसायनांचे मिश्रण असते. यात अ‍ॅसिटलडीहाइड, अ‍ॅसिटिक आम्ल, हेक्झॉनिक आम्ल, युजेनॉल, मिथाइल सिनामेट, ४ हायड्रॉक्सी बेंझलडीहाइड, आइसोब्युटेरीक आम्ल या रसायनांचा समावेश असतो. कृत्रिम व्हॅनिलाच्या अर्कात इथेनॉलमधील कृत्रिम व्हॅनिलिनचे द्रावण असते. कृत्रिम व्हॅनिलिन तयार करण्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात, पण बहुतेक पदार्थामध्ये वापरले जाणारे व्हॅनिलिन मुख्यत: गॉइकॉलपासून  (Guaiacol) तयार केले जाते.

प्रबोधन पर्व: महाराष्ट्रातील धर्मसुधारणांचे फलित
‘‘हिंदू धर्मसंस्थेचे आणि जगातील अन्य धर्मसंस्थांचे परिशीलन व समीक्षण करणाऱ्या महाराष्ट्रीय काही थोडय़ा विविक्षित सुशिक्षितांनी धर्मपरिवर्तनवादाचा पाया घातला. या धर्मपरिवर्तनवादाचे दोन प्रवाह भारतात व महाराष्ट्रात वाढू लागले. एक प्रवाह म्हणजे विश्वधर्मविषयक विचारसरणी व दुसरा प्रवाह म्हणजे हिंदुधर्म सुधारणेच्या मूलभूत सिद्धान्ताची मांडणी करणारी विचारसरणी. या दोन्ही विचारसरणी एकमेकींशी गुंतलेल्या व काही बाबतींत एकरूप होत्या.. राजा राममोहन रॉय यांनी विश्वधर्मविषयक विचारसरणी मांडली. हिंदुधर्माचे अधिष्ठानही हाच विश्वधर्म होय असे प्रतिपादून त्यांनी मूर्तिपूजा, बालविवाह, सतीची चाल, जातींचा उच्चनीच भेद यांच्यावर हल्ला सुरू केला.. महाराष्ट्रातील पहिल्या दोन महान समाजसुधारक व धर्मसुधारक व्यक्तींनीही या आंदोलनाचे स्वागत केले. लोकहितवादी व जोतिबा फुले या त्या दोन व्यक्ती होत.. महाराष्ट्राच्या धर्मसुधारणेच्या आंदोलनाला प्रार्थनासमाज व सत्यशोधक समाज यांनी तात्त्विक अधिष्ठान दिले.. ’’
  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी एकोणिसाव्या शतकात प्रबोधनकारांनी सुरू केलेल्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रात धर्मसुधारणांबाबत काय प्रगती झाली, याविषयी लिहितात-
 ‘‘गेल्या दीडशे वर्षांतील धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या आंदोलनामुळे सामाजिक व धार्मिक सुधारणेचे पाऊल पुढे पडत आहे. कायद्याच्या क्षेत्रावर याचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो. कायद्याने सतीची व बालविवाहाची चाल बंद पाडली. कायद्याने विधवाविवाह मान्य जाला. घटस्फोटाचा हक्क स्त्री-पुरुषांना कायद्याने प्राप्त झाला. हिंदू, बौद्ध व जैन यांची आंतरजातीय लग्ने कायदेशीर ठरली. कायद्याने स्त्रियांना संपत्तीचा वारसाहक्क पुरुषांसमान मिळाला. कायद्याने अस्पृश्यता नष्ट झाली व सर्व जाती व धर्म यांचे सहभोजन समाजमान्य झाले. दीडशे वर्षांपूर्वीच्या हिंदुसमाजाच्या रूढी व कायदे व विद्यमान हिंदुसमाजाच्या रूढी व कायदे यांच्यात जमीन-अस्मानाइतकी तफावत पडली. याचे श्रेय भारतातील व महाराष्ट्रातील धर्मपरिवर्तनाच्या आंदोलनाला आहे.

मनमोराचा पिसारा: जे. के. रोलिंगची पहिली रहस्य कादंबरी – द ककूज कॉलिंग
मोकळेपणानी सांगायचं तर रहस्य कथा-कादंबऱ्यांची अनभिषिक्त सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती, तिच्या कादंबऱ्या वाचून बरेच दिवस झाले पण मधूनच तिची मानस पात्रं म्हणजे मिस मार्पल आणि हक्र्युल पॉरो यांची आठवण येते. त्या दोघांचा काळ साधारण विसाव्या शतकातला पूर्वार्धातला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामधला. इंग्लंडमधली छोटी खेडी, तिथली माणसं, त्यांचे मत्सरी स्वभाव, हेवेदावे आणि त्यातून उद्भवणारे खून. पॉरो सामान्यत: आंतरराष्ट्रीय पातळीवरील रहस्य उलगडत असे. कादंबऱ्यांचा साचा ठरावीक, अनपेक्षित धक्काही अपेक्षित. मग रहस्यभेद, खुन्यांची कन्फेशन्स इ. बऱ्याच दर्दी मंडळींना या कथा-कादंबऱ्या शाळकरी वाटतात. असो. बट आय मिस् द सेन्सेशन.
त्यामुळे जे. के. रोलिंगने रहस्यमय कादंबरी लेखनासाठी लेखणी किंवा कीबोर्डवरचं बोट उचललंय हे वाचून थोडी हुरहुर वाटली. रॉबर्ट गालब्रेथ या नावानं तिनं ‘द ककूज कॉलिंग’ ही पहिली कादंबरी लिहिली. तिच्या अवघ्या १५०० प्रती खपल्या, मग प्रकाशकानं म्हणे खऱ्या लेखकाचं नाव चुकून ‘लीक’ केलं. आणि कादंबरी हातोहात खपली. लाखावर विक्री गेली.
‘द ककूज कॉलिंग’ ही समकालीन कादंबरी आहे. म्हणजे इथली पात्रं गुगलतात, टेक्स्ट मेसेज पाठवतात. (व्हॉट्सअ‍ॅप करीत नाहीत!) मुख्य पात्र कारमोरॅन स्ट्राइक आणि त्याची सेक्रेटरी रॉबिन. स्ट्राइकचं व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करण्यात रोलिंग बाईनं बरेच शब्द वापरलेत. म्हणजे त्याला कृत्रिम पाय बसवलाय, तो आकारानं थोराड आहे. सिग्रेटी फुंकतो, दारू पितो, त्याच्यावर कर्जाच्या नोटिसा आहेत, इ. गंमत म्हणजे स्ट्राइक हा पोस्टकोल्ड वॉर- अफगाणातील युद्धामधला लष्करी अधिकारी आहे. मशीनगनच्या कानठळ्या, उद्ध्वस्त प्रेतं आणि विलक्षण एकाकीपण याच्या त्याला आठवणी येतात. त्यात कादंबरीतल्या बऱ्याच पात्रांप्रमाणे तो ब्रोकन कुटुंबातून आलाय. आईची व्यसनं, लग्नं, सेलिब्रिटी बापानं सोडून जाणं, सावत्र बहिणींचे संसार अशा आठवणी त्याला सतत येतात. तो त्यात हरवतो आणि अर्थात भानावर येतोदेखील.
कादंबरीच्या सुरुवातीला लुला लॅण्ड्री नावाची सुपरमॉडेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मरते. ती आत्महत्या नसून खून आहे असा दावा करणारा तिचा सावत्र भाऊ स्ट्राइककडे येतो. लुला हे त्या घराण्यातलं दत्तक अपत्य. जॉन हा तिचा मोठा भाऊ आणि चार्ली त्याच्या भावाचा वर्गमित्र. त्या भावाच्या अपघाती मृत्यूची आठवण करून त्यांची बातचीत सुरू होते.
काळाच्या बदललेल्या संदर्भात ‘सीसीटीव्ही’चं फूटेज, डीएनएचे ठसे येतात आणि कादंबरी आजच्या वास्तवात घडते आहे याचे भान येते.
लुला लॅण्ड्री मॉडेल असल्यानं फॅशन डिझायनर्स, मेकप आर्टिस्ट, गायक यांचा वावर भरपूर. त्यांची दुनिया, खोटेपणा, माणूसपणाच्या खाणाखुणा आणि बेगडी वातावरणात जपलेले, बिघडलेले संबंध येतात. त्याचबरोबर केन्सिंग्टन गार्डन भागातल्या श्रीमंत, गर्भश्रीमंत मंडळींचं जगही उलगडत जातं.
कादंबरीची गोष्ट तशी सरळ लाइनशीर आहे आणि रहस्य उलगडण्याची अगाथा ख्रिस्तीसारखी आहे. म्हणजे नातेसंबंधातला गुंता, पोलिसांच्या नजरेस न आलेले महत्त्वाचे संदर्भ, काही बारकावे आणि पात्रांच्या देहबोलीची अत्यंत सकस प्रत्ययदर्शी निरीक्षणं.
रोलिंगच्या भाषेचा डौल कधीकधी अतिशय सहजपणे उलगडतो. उदा. लुला खाली पडत असताना तिच्या मनातल्या काहुराचं वर्णन अतिशय काव्यमय आहे, तर तिच्या मरणप्राय आईच्या खोलीचं वर्णन करताना रोलिंग तिथला अ‍ॅण्टीसेप्टिक वास, कॅमोमिल चहा, शाळेतल्या मुलांचा दूरवरून येणारा आरडाओरडा. अतिशय सूक्ष्मपणे आपल्यासमोर मांडते.
बाकी रोलिंगने ‘रॉबर्ट’ हे पुल्लिंगी नाव धारण केलं असलं तरी तिची काही निरीक्षणं सहज स्त्रीसुलभ आहेत. त्यामुळे टोपणनावातलं रहस्य फार टिकलंच नसतं. पात्रांच्या तोंडी इतके चारअक्षरी शब्द आहेत की शिव्यांची लाखोली. यातला नायक स्ट्राइक रोलिंगच्या ‘सिल्कवर्म’ या नव्या कादंबरीत पुन्हा येतोय.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:17 am

Web Title: curiosity vanilla flavour
टॅग : Curiosity
Next Stories
1 कुतूहल: शुष्क बर्फ
2 कुतूहल: कार्बन कागद
3 कुतूहल: कार्बन फायबर
Just Now!
X