29 October 2020

News Flash

कुतूहल : क्युरिअम

ग्लेन सीबोर्गच्या युरेनिअमोत्तर मूलद्रव्य संशोधन यशाच्या मालिकेतील तिसरे मूलद्रव्य क्युरिअम.

(संग्रहित छायाचित्र)

अनघा वक्टे

ग्लेन सीबोर्गच्या युरेनिअमोत्तर मूलद्रव्य संशोधन यशाच्या मालिकेतील तिसरे मूलद्रव्य क्युरिअम. खरं तर आवर्तसारणीत युरेनिअमोत्तर चौथ्या क्रमांकाचे हे मूलद्रव्य. क्युरिअम चमकदार, चंदेरी रंगाचा कठीण धातू! क्युरिअमची Cm-237 ते Cm-257 अशी १४ समस्थानिके असली तरी त्यातील एकही स्थिर नाही. क्युरिअम तयार करण्यासाठी अणुभट्टीमध्ये युरेनिअम किंवा प्लुटोनिअमवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.

१९४४ मध्ये ग्लेन सीबोर्ग, राल्फ जेम्स आणि अ‍ॅल्बर्ट घिओस्रो यांनी सायक्लोट्रोन या अण्वीय कण त्वरण यंत्राचा वापर करून क्युरिअम तयार केला. सायक्लोट्रोनमध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्राचा वापर करून कणांचा वेग वाढवला जातो. या संशोधनासाठी सीबोर्गने नवीनच शोधलेल्या प्लुटोनिअम-२३९ या समस्थानिकावर अल्फा कणांचा मारा केला. प्रयोगात मिळालेला पदार्थ शिकागो विद्यापीठाच्या धातू प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. या प्रयोगशाळेत क्युरिअमचे अल्प प्रमाण अलग करण्यात आले.

हे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी दुसरे महायुद्ध संपण्याची वाट पाहावी लागली. ११ नोव्हेंबर १९४७ च्या त्या देशातील आकाशवाणीवरील मुलांसाठीच्या एका कार्यक्रमात ग्लेन सीबोर्ग मुख्य अतिथी होते, त्या वेळी त्यांनी आपल्या संशोधनाचा उल्लेख केला; पण औपचारिक घोषणा त्यानंतर पाच दिवसांनी करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम आणि कॅनडा यांच्या पहिले अण्वस्त्र तयार करण्यासाठीच्या मॅनहॅटन या संशोधन प्रकल्पातील हा भाग असल्याने क्युरिअम आणि अमेरिशिअम या मूलद्रव्यांचे संशोधन लगेच जाहीर करण्यात आले नाही.

कोणत्याही विद्युत उपकरणात विद्युत घट म्हणजेच बॅटरीज वापरायच्या म्हटलं तर त्याचं आयुष्य किती आहे, याचा विचार केला जातो. बदलावे लागणारे विद्युत घट किंवा सतत प्रभारित करावे लागणारे विद्युत घट अंतराळासारख्या ठिकाणी वापरता येत नाहीत. अंतराळ सफरीवरील यानांमध्ये विद्युत उपकरणात ऊर्जा पुरविण्यासाठी क्युरिअम विद्युत घट उपयोगात येतात. मानवाला हृदयरोगासाठी वरदान ठरलेल्या पेसमेकरमध्ये विद्युत घट बदलण्याचा आपण विचारच करू शकत नाही. तिथे किरणोत्सारी असला तरी क्युरिअम हा उपयुक्तठरतो.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2018 2:18 am

Web Title: curium transuranic radioactive chemical element
Next Stories
1 जे आले ते रमले.. : चाँग च्यू सेन (साई मदनमोहन कुमार)
2 कुतूहल : अमेरिशिअम
3 कुतूहल- प्लुटोनिअम
Just Now!
X