सुनीत पोतनीस- sunitpotnis@rediffmail.com

मासाको या जपानी नृत्यांगना मूळच्या टोकियोच्या. ओडिसी नृत्याच्या वेडाने १९९६ साली त्या भारतात आल्या आणि त्या ओडिसी नृत्यात रमल्या, भारतीयच झाल्या. त्यांचा हा जीवनप्रवास स्तिमित करणारा आहे. कलाकारांच्या घरात जन्मलेल्या मासाको वयाच्या चौथ्या वर्षांपासून नृत्य शिकू लागल्या. पुढे त्यांनी अमेरिकेतल्या मार्था गॅ्रहम डान्स स्कूलमधून पदवी प्राप्त केली आणि त्याबरोबरच बॅले नृत्य, जाझ, हिपहॉप वगरेंत नपुण्य मिळवले.

टोकियोत एका कार्यक्रमात त्यांनी केलुचरण मोहपात्रांच्या नृत्य सादरीकरणाचा व्हिडीओ पाहिला. त्यातील गुरू केलुचरण यांचे ओडिसीतले पदलालित्य आणि ओडिसी नृत्यशैली पाहून मोसाका अगदी भारावून गेल्या. आपल्याला ज्ञात असलेल्या पाश्चिमात्य नृत्यशैलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण असलेली ही ओडिसी नृत्यशैली आपण शिकायचीच, असे मनोमन ठरवून मोसाका ओनो तडक टोकियोतल्या भारतीय दूतावासात गेल्या. ओडिसी मला कुठे शिकायला मिळेल याची चौकशी केली असता तिथल्या अधिकाऱ्यांनी बंगळुरातल्या नृत्यग्रामचे माहितीपत्रक दिले आणि नृत्यग्रामच्या संचालिका प्रोतिमा गौरी बेदींशी त्यांचा संपर्क साधून दिला. बंगळुरमध्ये सर्व शैलींतील नृत्याचे शिक्षण देणारी ‘नृत्यग्राम’ ही कलासंस्था प्रोतिमा गौरी यांनीच स्थापन केली आहे. मोसाकोला त्यांनी नृत्यग्रामात प्रवेश तर दिलाच पण शिवाय शिष्यवृत्तीही दिली.

१९९६ साली नृत्यग्राममध्ये आलेल्या मोसाकोंनी ओडिसी नृत्याचे पहिले धडे प्रोतिमांकडे शिकल्यावर पुढे सुरूपा सेन, विजयनी सतपथी आणि केलुचरण मोहपात्रांकडे पुढचे शिक्षण घेतले. २००१ पासून त्या भुवनेश्वर येथे स्थायिक झाल्या असून ओडिसीच्या व्यावसायिक नृत्यांगना म्हणून नावारूपाला आल्या आहेत. नृत्य आणि योगाभ्यास यांचे शिक्षण देणाऱ्या मोसाकांच्या भुवनेश्वर येथील संस्थेतून मोठा शिष्यगण तयार झालाय. मोसाकांचं भारतीय आणि परदेशी नर्तक, संगीतकारांच्या सहयोगाने भारत, जपान, अमेरिका, सिंगापूर, फ्रान्स वगैरे देशांमध्ये अनेक वेळा नृत्य सादरीकरण झाले आहे. ‘न्यूज वीक’च्या २००८ सालच्या अंकात ‘विविध क्षेत्रांतले १०० उत्कृष्ट जपानी’ या लेखामध्ये मासाको ओनो आणि त्यांच्या मासाको ओनो परफाìमग आर्ट्स (एम.ओ.पी.ए.)चा खास उल्लेख आहे.