जर्मनीतील जीएसआय प्रयोगशाळेत नवीन मूलद्रव्य शोधण्याची मोहीम सुरूच होती. सन १९९४ मध्ये सीगर्ड हॉफमॅन यांच्या मार्गदर्शनाखाली पीटर आर्मबस्टर आणि गॉटफ्रिड मुंझनबर्ग यांनी ११० अणुक्रमांक असलेले डर्मस्टॅटिअम हे मूलद्रव्य तयार केले. पण हे मूलद्रव्य सहजासहजी मिळाले नाही. शास्त्रज्ञांना अनेकदा प्रयत्न करावे लागले. यापूर्वी १९८६-८७ मध्ये रशियातील जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेतही डर्मस्टॅटिअम तयार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, पण त्यांना यश मिळाले नाही. १९९४मध्ये पुन्हा त्यांनी प्रयोग करून डर्मस्टॅटिअम-२७३ तयार केले पण प्रयोगाची खात्री नव्हती. त्याच काळात कॅलिफोíनयातील लॉरेन्स बर्कले प्रयोगशाळेतही अल्बर्ट घिओर्सो व त्यांच्या सहकाऱ्यांनी डर्मस्टॅटिअम-२६९ तयार केले, पण प्रयोगाच्या निष्कर्षांची वैज्ञानिकरीत्या खात्री होऊ शकली नाही. केवळ जीएसआय प्रयोगशाळेचे प्रयोग खात्रीशीर असल्याने डर्मस्टॅटिअमच्या शोधाचे श्रेय जीएसआयमधील शास्त्रज्ञांना जाते. म्हणून या शास्त्रज्ञांना अणुक्रमांक ११०च्या मूलद्रव्याला नाव देण्याचा अधिकार मिळाला. जीएसआय प्रयोगशाळेत  बोहरिअम, माइटनेरिअम, राँटजेनिअम व कोपरनिशिअम या मूलद्रव्यांचा शोध लागला म्हणून येथील शास्त्रज्ञांनी ही प्रयोगाशाळा ज्या शहरात आहे त्या डर्मस्टॅड या शहरावरून या मूलद्रव्याचे नाव डर्मस्टॅटिअम असे ठेवले. या मूलद्रव्याचा नामकरण विधी २००३मध्ये डर्मस्टॅड येथेच झाला.

अमेरिकेतील (कॅलिफोíनयातील) शास्त्रज्ञांनी या मूलद्रव्याचे नाव ओटो हान या शास्त्रज्ञाच्या नावावरून हानिअम असे सुचवले होते आणि रशियातील (जेआयएनआरमधील) शास्त्रज्ञांनी  या मूलद्रव्याचे नाव हेन्री बेक्वेरेल या शास्त्रज्ञाच्या नावावरून बेक्वेरेलिअम असे सुचवले होते. मेंडेलीवने सुचविलेल्या नामकरण पद्धतीनुसार याचे नाव इका-प्लॅटिनम तर आयुपॅकने ठरविलेल्या नियमानुसार याचे नाव अनअन्निलिअम असे संबोधण्यात येत होते.

डर्मस्टॅटिअम मिळविण्याकरिता जीएसआय प्रयोगशाळेत शिसे या मूलद्रव्यावर अतिशय वेगवान निकेलचा मारा केला गेला. अतिशय वेगवान म्हणजे हा वेग किती असावा? प्रकाशाच्या वेगाच्या एक दशांश म्हणजेच ३० हजार किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाचा तो निकेलचा अणू होता. पण या अभिक्रियेत कमी अणू मिळाल्याने या शास्त्रज्ञांनी पुनश्च प्रयोग करून डर्मस्टॅटिअमचे नऊ अणू मिळवले. गण १०चा सदस्य असल्याने डर्मस्टॅटिअमचे गुणधर्म प्लॅटिनम, निकेल व पॅलेडिअमप्रमाणे असावेत. हे मूलद्रव्य धातू स्वरूपात असावे व त्याची घनता अंदाजे ३४.८ ग्रॅम प्रति घनसेमी असणे अपेक्षित आहे.

– सुधा सोमणी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org