इ.स. १५९६ सालच्या ऑगस्ट महिन्यातली गोष्ट. डेव्हिड फॅब्रिशियस हा डच हौशी खगोलज्ञ एका ग्रहाच्या मार्गक्रमणाची नोंद करत होता. त्यासाठी तो तिमिगल तारकासमूहातील एक तारा स्थान ओळखण्यासाठी संदर्भ म्हणून वापरत होता. निरीक्षणाच्या काळात या ताऱ्याचे तेज तीन आठवडय़ांत अडीच पटींनी वाढले असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर या ताऱ्याचे तेज कमी होत होत हा तारा अखेर ऑक्टोबर महिन्यात दिसेनासा झाला. १५९७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात हा तारा पुन्हा दिसायला लागला. त्यानंतर अनेक खगोलज्ञांना, तेज कमी-जास्त होणाऱ्या या वैशिष्टय़पूर्ण ताऱ्याने अधूनमधून दर्शन दिले.

जोहान होलवार्दा या डच खगोलज्ञाने १६३८ साली या ताऱ्याच्या तेजस्वितेच्या कमी-जास्त होण्याच्या चक्राचा कालावधी मोजला. हा कालावधी अकरा महिने भरला. निश्चितपणे नोंदला गेलेला, हा पहिलाच तेज बदलणारा म्हणजे ‘रूपविकारी’ तारा ठरला. योहान्नस हेवेलियस या जर्मन खगोलज्ञाने १६४२ साली या ताऱ्याला नाव दिले – मीरा. म्हणजे ‘आश्चर्यजनक.’ आपण शोधलेल्या या ताऱ्याला मिळालेली ही मान्यता पाहण्यास फॅब्रिशियस मात्र हयात नव्हता! या ताऱ्याचे कमाल तेज हे किमान तेजापेक्षा तब्बल पंधराशे पटींनी अधिक असते. या ताऱ्याच्या तेजातील हा मोठा बदल, या ताऱ्याच्या सतत होणाऱ्या आकुंचन-प्रसरणामुळे होत असल्याचा शोध कालांतराने लागला. आज इतर अनेक प्रकारचे रूपविकारी तारे माहीत झाले असले तरी, मीरा ताऱ्याच्या गटातील रूपविकारी तारे हे त्यांच्या तेजस्वितेतील मोठय़ा बदलामुळे वैशिष्टय़पूर्ण ठरले आहेत.

इतिहासकारांत एक मोठी उत्सुकता आहे ती ही की, या तिमिगल तारकासमूहातील मीरा ताऱ्याची नोंद प्राचीन काळी केली गेली आहे का? तो दिसला असण्याची शक्यता काही इतिहासकार व्यक्त करतात. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या हिप्पार्कसने सर्वात पहिला आकाशाचा नकाशा बनवला होता. परंतु हा नकाशा तसेच त्याचे मूळ लेखन कालौघात नष्ट झाल्यामुळे, त्याने स्वत: हा तारा पाहिला होता की नाही, हे प्रत्यक्ष कळण्यास मार्ग नाही. परंतु हिप्पार्कसचा पूर्वसुरी असणारा, इ.स.पूर्व चवथ्या शतकात होऊन गेलेला ग्रीक खगोलज्ञ अराटस याच्या निरीक्षणांवर हिप्पार्कस याने केलेले भाष्य मात्र उपलब्ध आहे. हिप्पार्कसच्या या भाष्यात अराटसने हा तारा बघितल्याचा उल्लेख आहे.

– प्रदीप नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org