इ.स. १६०८मध्ये नेदरलँडमधील चष्मे बनवणाऱ्या हान्स लिपरश्येने दुर्बिणीचा शोध लावला. त्यानंतर एका वर्षांतच, १६०९ साली गॅलिलिओने आकाश पाहण्यासाठी दुर्बीण वापरली आणि खगोलशास्त्रात क्रांती झाली. गॅलिलिओच्या दुर्बिणित, नळीच्या एका बाजूला मोठे बहिर्वक्र भिंग (पदार्थीय) बसवले होते तर दुसऱ्या बाजूला लहान अंतर्वक्र भिंग (नेत्रिका) बसवले होते. पदार्थीय भिंग हे दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश गोळा करत होते, तर नेत्रिकेचे भिंग हे पदार्थीयाद्वारे निर्माण झालेली प्रतिमा मोठी करीत होते. १६११ साली योहान्नस केपलर या जर्मन खगोलज्ञाने केलेल्या सूचनेनुसार, दुर्बिणिच्या नेत्रिकेत अंतर्वक्र भिंगाऐवजी बहिर्वक्र भिंगाच्या वापरास सुरुवात झाली. यामुळे दुर्बिणितून आकाशाचे मोठे क्षेत्र दिसणे शक्य झाले.

इ.स. १६६८ मध्ये आयझॅक न्यूटन यांनी पदार्थीय भिंगाच्या जागी आरसा वापरून दुर्बिणिच्या स्वरूपात महत्त्वाचा बदल केला. पदार्थीय भिंगातून जेव्हा प्रकाश पार होतो, तेव्हा त्या प्रकाशातले विविध रंग वेगळे होऊन प्रतिमा अस्पष्ट होते. पदार्थीय हे जर अंतर्वक्र आरशाचे बनवले तर हा दोष उद्भवत नाही. न्यूटनने तयार केलेल्या दुर्बिणिचा अंतर्वक्र आरसा हा ‘स्पेक्युलम’ नावाच्या तांबे आणि टिन यांच्या मिश्रधातूपासून बनवला होता. इंग्लिश खगोल निरीक्षक विल्यम हर्शलने अठराव्या शतकात बनवलेल्या मोठमोठय़ा दुर्बिणि यासुद्धा स्पेक्युलमपासूनच बनवल्या होत्या. दुर्बिणिचे पदार्थीय जितके मोठे, तितकी अंधूक वस्तू टिपण्याची दुर्बिणिची क्षमता जास्त आणि वस्तूचा दिसणारा तपशीलही अधिक स्पष्ट. त्यामुळेच निरीक्षकांचा कल हा मोठय़ा व्यासाचे पदार्थीय असणाऱ्या दुर्बिणी बांधण्याकडे असतो.

भिंगाच्या दुर्बिणित जरी प्रकाशातले विविध रंग वेगळे होऊन, मिळणाऱ्या प्रतिमेत दोष निर्माण होत असला तरी, जोडिभगे वापरून हा दोष काढून टाकता येतो. अशा भिंगांमुळे प्रकाशकिरणांतील वेगळे झालेले रंग पुन्हा एकत्र होऊन स्वच्छ प्रतिमा मिळवता येते. १८९७ साली बांधलेली अमेरिकेतील यर्क वेधशाळेतील १०२ सेंटिमीटर व्यासाच्या भिंगाची दुर्बीण ही आज वापरात असलेली सर्वात मोठी भिंगाची दुर्बीण आहे.

मात्र आजच्या काळातल्या सर्व महाकाय दुर्बिणि या आरशाच्या दुर्बिणि असून त्या काचेपासूनच बनवलेल्या आहेत. आज वापरात असलेली सर्वात मोठी आरशाची दुर्बीण ही अटलांटिक महासागरातील कॅनरी बेटांवर असून तिच्या आरशाचा व्यास १०.४ मीटर इतका प्रचंड आहे.

–  प्रदीप नायक, मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org