आधुनिक सिंगापूरचा शिल्पकार म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा तेथील अधिकारी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफेल्स याचे नाव घेतले जाते. रॅफेल्सच्या दूरदर्शीपणामुळे आणि कार्यक्षमतेमुळे सिंगापूर हे आग्नेय आशियातील ब्रिटिशांचे मोठे व्यापारी ठाणे म्हणून प्रस्थापित झाले; त्याचबरोबर ते ब्रिटिश राजवटीची आशियातील एक मोठी वसाहत म्हणूनही नावारूपाला आले. सिंगापुरात आता आपण जे काही करणार आहोत ते पुढच्या अनेक शतकांसाठी आपल्या मायदेशाच्या उत्कर्षांचे एक साधन बनून राहणार आहे, याची रॅफेल्सला जाणीव होती.

रॅफेल्स सिंगापुरात आला त्या वेळी तिथली परिस्थिती अत्यंत खराब होती. मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील टोकावर, परंतु बेटाच्या स्वरूपात सिंगापूर होते. मलायच्या जोहोर येथील सुलतानाची त्या वेळी सिंगापूरवर राजवट होती. पण सुलतानाची ही सत्ता नाममात्रच होती. चिनी आणि मलायी लोकांची वस्ती असलेल्या सिंगापुरात तेव्हा मासेमारी आणि किरकोळ शेती हे व्यवसाय होत असत. बहुतांश लोक व्यसनाधीन झालेले होते. रॅफेल्सने तिथल्या सुलतानाला वार्षिक काही रक्कम ठरवून दिली आणि सिंगापूरमध्ये एक बंदर उभारण्यास व ब्रिटिशांची वखार उघडण्यासाठी १८१९ साली लेखी करार करून घेतला.

रॅफेल्सने बंदराचे बांधकाम सुरू केले, त्याचबरोबर सिंगापूरच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम राबवला. भारतातून कुशल, अकुशल मजूर सिंगापुरात आणून त्यांना राहण्यासाठी मोठी गृहसंकुले, शिक्षणाची व्यवस्था केली. बेरोजगारी कमी करण्यासाठी त्याने विविध उत्पादक उद्योग स्थापन केले. हे करतानाच भारतातून त्याने सैनिकांची एक तुकडीही संरक्षणासाठी नेली. सिंगापूरचे पूर्ण प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणात आले. रॅफेल्स आणि त्यानंतर सिंगापूरच्या गव्हर्नरपदी आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने सिंगापूरचा विकास केला. त्यांनी बांधलेल्या उत्तम दर्जाच्या बंदरामुळे ब्रिटिशांचा आग्नेय आशियातला व्यापार भरभराटीला येऊन सिंगापूर ही ब्रिटिशांची एक महत्त्वाची वसाहत (क्राऊन कॉलनी) बनली. १ एप्रिल १८६७ रोजी ब्रिटिश सरकारने सिंगापूरच्या या ‘क्राऊन कॉलनी’ला विशेष दर्जा देऊन, त्याची शासकीय व्यवस्था लंडन येथील त्यांच्या ‘कलोनियल ऑफिस’कडे सुपूर्द केली. १८६७ साली स्थापन झालेली ही सिंगापूरची संपन्न ब्रिटिश वसाहत पुढची ७५ वर्षे, म्हणजे १९४२ पर्यंत टिकली.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com