आपल्या आगळ्यावेगळ्या वास्तुस्थापत्य शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या दीदी कॉन्ट्रॅक्टर या अमेरिकन वास्तुस्थापत्यकार हिमाचल प्रदेशातील धर्मशालाजवळच्या रक्कार या छोटय़ा गावात स्थायिक झालेल्या आहेत. स्थानिक, उपलब्ध नसíगक साहित्यातून म्हणजे सिमेंट, स्टील यांचा वापर न करता केवळ दगड, माती, लाकूड आणि चुना यांचा वापर करून दीदींनी बांधलेल्या वैशिष्टय़पूर्ण अनेक इमारती आज धर्मशाला, सिमलाच्या पंचक्रोशीत लक्ष वेधून घेतात. स्थापत्यशास्त्राचे शिक्षण न घेता स्वतला स्थापत्यकार घडवणाऱ्या या दीदी कॉन्ट्रॅक्टरना वुमन आर्किटेक्ट आणि आर्टस्टिसाठी असलेलं २०१७ सालचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला.

दीदींचा जन्म १९२९ सालचा अमेरिकेतला. वडील जर्मन तर आई अमेरिकन. वडील पहिल्या महायुद्धानंतर निर्वासित म्हणून अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचे मूळ नाव दीदी किनझिंगर. आई- वडील दोघेही उत्तम चित्रकार आणि बहुधा त्यामुळेच त्यांच्या मुलीतही कलाशिक्षणाचे आकर्षण उपजत आले असावे. कोलोराडो विद्यापीठात कलाशिक्षण घेत असतानाच अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या रामजी नारायण या भारतीय विद्यार्थ्यांशी परिचय आणि प्रेम जडले. १९५१ साली विवाह करून दीदी किनझिंगर आता दीदी रामजी नारायण बनून मुंबईला जुहू बीचजवळ घर बांधून राहावयास आल्या. त्या दीदी-रामजी दाम्पत्याचे शेजारी होते पृथ्वीराज कपूर. दीदींनी जे घर बांधले त्याची संरचना, सजावट, तंत्रज्ञान पूर्ण दीदींचंच होतं. पृथ्वीराज कपूरना ते इतकं आवडलं की त्यांनी त्यांच्या पृथ्वी थिएटर्ससाठी इमारत बांधायची होती तिचं काम पूर्णपणे दीदींकडूनच करून घेतलं!

दीदींच्या घराचे वेगळेपण, साधेपणातही आकर्षकता साधण्याचे त्यांचे कसब, सौम्य आल्हाददायक रंगसंगती यामुळे जुहू परिसरातला जाणारा-येणारा ते घर मुद्दाम थांबून न्याहाळत असे. दीदी कोणी प्रशिक्षित आíकटेक्ट नसूनही त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान आणि रंगसंगती यामुळे अनेक नामवंत स्थापत्यविशारद ते घर पाहायला येऊ लागले. दुसऱ्या बाजूने पृथ्वीराज कपूर यांच्यासारखा मोठा लोकसंग्रह असलेल्या माणसाने दीदींचं कोडकौतुक केल्यामुळं त्यांचं नाव मुंबईच्या प्रतिष्ठित वर्तुळात नावाजलं गेलं.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com