– डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मेंदूत विविध कामं करणारी विविध क्षेत्रं असतात. त्यातली मुख्य क्षेत्र अशी – (१) फ्रंटल लोब (२) पराएटल लोब (३) ऑसीपेटल लोब (४) टेम्पोरल लोब. या क्षेत्रांमध्ये न्यूरॉन्स असतात. भाषा, गणित, तापमानाचं ज्ञान, दिशाज्ञान, हालचाल, संगीत, भावना, खेळ, विश्लेषण अशी अनेक कामं चालतात. आयुष्यभराची सर्व कामं ही या चार प्रमुख विभागांत विभागली आहेत. त्यात माहिती भरण्याचं काम आपल्यावर असतं. ते काम आपण सतत करत असतो.

हे कसं घडतं? तर, आपण ज्या ज्या गोष्टी करतो, त्या सर्व अनुभवांचे रूपांतर मेंदूतल्या -न्यूरॉन्सच्या जुळणीत होत असतं. आपण नेहमी एक वाक्य ऐकतो की, ‘शिकलेलं कधी वाया जात नाही’. हे वाक्य पूर्णपणे शास्त्रीय आहे. कारण एखाद्या विषयातलं थोडं जरी शिकलो तरी न्यूरॉन आपापल्या परीने ते लक्षात ठेवतोच. आणि योग्य वेळेला ते बाहेर काढतो. लहानपणी शिकलेलं पोहणं, सायकल चालवणं, एखाद्या गावात, पर्यटनस्थळी फिरायला जाणं, पाढे (पूर्वी पावकी, निमकी, अडीचकीसुद्धा लक्षात राहायची.) अगदी पत्त्यातले बदामसात सारखे खेळही मधल्या काळात कधीही न खेळूनही लक्षात राहतात.

त्यात आपण काय साठवतो, कसं साठवतो, हे सगळं फक्त आपल्यावरच अवलंबून असतं.

आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही छंद असतात. आपल्याला त्यातून आनंद मिळतो. आनंद मिळतो म्हणून पुन्हा त्याच कृती करत राहतो. या कृती अवश्य कराव्यात. छंद जोपासणं ही एक मेंदूपूरक गोष्ट आहे. मात्र त्याबरोबर काही आगळ्यावेगळ्या गोष्टीही करत राहायला हव्यात. विशेषत: ज्या गोष्टी आजवर कधीही केल्या नाहीत त्या!

उदाहरणार्थ, वय काहीही असो- नवी भाषा शिकणं, नवीन कला- नृत्य शिकणं, विविध साहित्यप्रकार वाचून बघणं, अंगमेहनतीची जी जमतील ती कामं शिकणं/ करून बघणं. तंत्रज्ञान शिकणं, आपल्यापेक्षा संपूर्ण वेगळ्या जीवनशैलीच्या व्यक्तींबरोबर वेळ घालवणं, यामुळे मेंदूला नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळते. केवळ त्याच त्या क्षेत्रातले न्यूरॉन्स न जुळता इतरही अनेक क्षेत्रातल्या न्यूरॉन्सना संधी मिळते. जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, तोपर्यंत मेंदूच्या सर्व क्षेत्रांना संधी मिळणार कशी? यासाठीच असं म्हणतात की आपण मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करत नाही.