पुस्तकांच्या दुकानात किंवा वाचनालयात गेलो की विविध आकाराची, विविध मापाची पुस्तके बघायला मिळतात. खरे बघायला गेलो तर सर्वसाधारणपणे पुस्तके असतात चौरस वा आयताकृती; पण लांबी व रुंदी कमी किंवा जास्त असल्यामुळे ती लहान-मोठी दिसतात.

कसे ठरवीत असतील हे पुस्तकांचे आकार किंवा मापे? हे जाणून घेण्यासाठी पुस्तकांची छपाई कशी होते, हे समजणे आवश्यक आहे. आपण पुस्तक वाचतो त्या क्रमाने पुस्तकाची पाने छापली जात नाहीत. एका मोठय़ा कागदावर मजकूर दोन्ही बाजूंवर छापला जातो. नंतर त्या कागदाच्या घडय़ा घालून अपेक्षित पानांचे संच तयार केले जातात. उदा. कागदाची एक घडी घातली तर पुस्तकाची दोन पाने किंवा चार पृष्ठे तयार होतील. असे पूर्ण मजकुराचे संच तयार झाले की, त्यांची एकत्र क्रमानुसार बांधणी केल्यावर मोठय़ा आकाराचे पुस्तक तयार होईल. या आकाराला फोलियो असे म्हणतात. कागदाच्या दोन घडय़ा घातल्या तर पुस्तकाची चार पाने किंवा आठ पृष्ठे तयार होतील. या आकाराला मूळ कागद चार समान भागांत विभागत असल्यामुळे ‘क्वाटरे’ म्हणतात. आणखी तिसरी घडी घातली तर त्याच कागदापासून पुस्तकाची आठ पाने किंवा सोळा पृष्ठे तयार होतील. या आकाराला ‘ऑक्टेवो’ या नावाने संबोधिले जाते. यावरून लक्षात येते की पुस्तकाचा आकार हा मूळ वापरलेल्या कागदाच्या आकारावरून ठरत असतो.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

पुस्तकातील मजकूर क्रमवार येण्यासाठी मूळ कागदावर किती घडय़ा घातल्या तर कशा प्रकारे छपाई व्हायला हवी; याचा विचार करणे आवश्यक आहे. समजा, कागदाची एक घडी घालून चार पृष्ठे तयार होणार असतील तर कागदाच्या एका बाजूला १ व ४ या पृष्ठावर येणाऱ्या मजकुराची छपाई होईल तर मागील बाजूस २ व ३ या पृष्ठावर येणाऱ्या मजकुराची छपाई होईल. म्हणजे घडी घालून बाजू कापल्यावर १ ते ४ पृष्ठे क्रमाने वाचता येतील.

ही झाली पूर्वीची पद्धत! आता कागद तयार करण्याचे व छपाई करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आकाराने खूप मोठा कागद, मोठय़ा भेंडोळ्याच्या स्वरूपात उपलब्ध होऊ  शकतो आणि त्यावर अनेक पानांमधील मजकुराची छपाई पण होऊ  शकते. प्रत्येक पानावरील पाठपोट मजकुराची काळजी घेऊन प्रत्येक पान स्वतंत्रपणे चिटकवून, अनेक पानांचे पुस्तक तयार होते. त्यामुळे मूळ कागदाचा आकार आणि तयार पुस्तकाचा आकार याचा काही संबंध नसतो. तरीही, पुस्तकाच्या आकाराचा उल्लेख करतांना फोलिओ, ‘क्वाटरे’,  ऑक्टेवो हे शब्द आजही वापरले जातात.

– गार्गी लागू  , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : गिरीश कर्नाड : त्यांच्याच शब्दांत..

गिरीश कर्नाड हे नाटककार म्हणून जितके परिचित आहेत, तितकेच अभिनेते व चित्रपट-दिग्दर्शक म्हणूनही ज्ञात आहेत. या दोन्ही क्षेत्रांबद्दल ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये (२६ मे २०१३) ते म्हणाले होते :  ‘‘चित्रपट क्षेत्रात यश मिळणं सोपं नाही, पण एकदा यश मिळालं की माघार घेणंही कठीण असतं. माझी खरी ओळख ही नाटकच, चित्रपट नाही. मला चित्रपटांमध्ये रस वाटला आणि पुढे मी स्वतहून चित्रपट काढणं— दिग्दर्शित करणं थांबवूनही टाकलं. पण मधल्या काळात माझ्यावर झालेले चित्रपटीय संस्कार महत्त्वाचे आहेत. चित्रपटांमुळं माझी नाटकं अधिक चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकली.  अर्थात, नाटक आणि चित्रपट या दोन्ही स्वतंत्र कला आहेत. नाटक ही प्युअर आर्ट आहे. मला कधी नाटकाचा चित्रपट करावासा वाटला नाही. हे दोन्ही प्रकार मी स्वतंत्रपणेच हाताळले. माझे बहुतेक चित्रपट कादंबरीवर आधारित होते.’’

कर्नाडांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ‘हा पुरस्कार खरं तर तेंडुलकरांना माझ्याआधी मिळायला हवा होता,’ असं ते नम्रतापूर्वक म्हणाले होते. तेंडुलकर यांच्याबद्दल कर्नाड म्हणतात : ‘‘ विजय तेंडुलकरांबद्दल मला आदर आहे. त्यांची अनेक नाटकं मी भाषांतरितही केली आहेत. पण तेंडुलकरांशी माझे बरेच मतभेदही होते. त्यांच्या नाटकांमध्ये संदिग्धता दिसत नसे, हा मुख्य मतभेद. त्यांचं ‘शांतता कोर्ट चालू आहे’ असेल , ‘सखाराम बाइंडर’असेल वा इतर कुठलं. त्यांच्या नाटकांचा शेवट ठरीव तर असायचाच आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वावच न ठेवता ते सगळंच्या सगळं कथानक स्टेजवरच मांडायचं. शिवाय, लेखक म्हणूनही त्यांची सगळीच नाटकं काही मला आवडली नव्हती. उदाहरणार्थ— मला ‘कन्यादान’ आवडलं नाही, ‘कमला’देखील नाही.   याउलट मी सामाजिक विषय कधीच मांडले नाहीत. मी माणसांचे, त्यांच्या मानसिकतेचे प्रश्न मांडले. माझ्या नाटकांमध्ये सत्य हे संदिग्ध असतं.

पण ‘घाशीराम कोतवाल’ आवडलं. ‘घाशीराम कोतवाल’चं यश हे त्याच्या संगीतात आहे. हिंसक प्रसंगाला भक्तिसंगीताचा वापर असं एक वेगळंच समीकरण या नाटकात दिसतं. आपल्याकडं नऊ रस आहेत. मात्र, संगीतात त्यातले चारच रस दिसतात. बीभत्स किंवा भय हे रस भारतीय संगीतातून क्वचितच आविष्कृत होतात. त्यामुळं ‘घाशीराम’साठी भारतीय संगीताचा वापर करणे हे आव्हानात्मक होतं. अर्थात, याचं श्रेय भास्कर चंदावरकरला द्यायला हवं.’’

(संकलित)

तत्त्वबोध : चैतन्य स्मरण

भोवतालचे नैतिक आणि सामाजिक वातावरण अत्यंत गढूळ असताना सत्त्वशील माणसाला नीती आणि उपासना सांभाळून कसे राहता येईल, असा मुद्दा निघाला असता श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले, ‘‘कालचक्रात असे प्रसंग पूर्वीही वेळोवेळी येऊन गेलेलेच आहेत. रावणाच्या, कंसाच्या, दुयरेधनांच्या राज्यकाळात असाच काळ होता. मारुतीराया सीतामाईंच्या शोधासाठी लंकेला गेले असताना त्या राक्षस नगरीत त्यांना सर्वत्र अनाचार, भ्रष्टाचार आणि दुष्ट वृत्तीचा धुमाकूळ दिसून आला. घरोघरी हा प्रकार पाहून त्यांना शिसारी आली. हिंडता हिंडता त्यांना अचानक एका घरी एकदम शांती आणि समाधान आढळून आले. हे बिभीषणाचे घर असावे, असा कयास करून ते आत गेले. त्यांचा तर्क खरा ठरून बिभीषणाने त्यांचे मोठय़ा प्रेमाने स्वागत केले. तेव्हा बोलता बोलता मारुतीरायांनी प्रश्न केला की, अनाचाराने कोंदटलेल्या या वातावरणात आपण इतक्या सत्त्वशीलपणे कसे राहू शकता? त्यावर बिभीषणानं उत्तर दिले की, ‘‘बत्तीस दातांच्या काटेरी कुंपणात जीभ जशी अलगद वावरते ना, तसे! मी रामनामाला जीभ वाहिल्यामुळे हे जमते.’’ आजच्या काळात जो भगवंत नामाची अशी कास धरून राहील, त्याला सत्त्वशील खास राहाता येईल, असे श्रीमहाराज मोठय़ा खुबीने म्हणाले.

एकदा एका डॉक्टरांना महाराजांनी विचारले की, ‘‘डॉक्टर गावातील हवामान कसे आहे?’’ डॉक्टर त्यावर म्हणाले, ‘‘हवामान उत्तम आहे, पण माणूस जरुरीपेक्षा जास्त खात असल्याने आजारी पडतो. परमेश्वरानं माणसात रवंथ करण्याची सोय ठेवली असती, तर हा आजार झाला नसता.’’

श्रीमहाराज त्यावर म्हणाले, ‘‘देवानं ही सोय ठेवली नाही हेच बरे. ही सोय ठेवली असती तर माणसानं इतकं खाल्लं असतं की इतर प्राण्यांना खाण्यासाठी त्यानं पृथ्वीवर काही शिल्लकच ठेवलं नसतं!’’  मग म्हणाले, ‘‘पण डॉक्टर रवंथ करण्याची अशी एक सोय देवानं माणसात ठेवली आहे की, जिचा योग्य वापर केला गेल्यास मनुष्य नराचा नारायण होऊन जाईल. मनन करणं हा तो वैचारिक रवंथ आहे. रवंथ करणारे प्राणी चारा जसा भराभर खाऊन घेतात तसं पारमार्थिक गोष्टींचं श्रवण माणूस करू शकतो. अशा ऐकलेल्या गोष्टींचं मनन करणं म्हणजे गायी-म्हशी जसं रवंथ करतात तसं आहे. अशा मननाने मनुष्य प्राण्यास भगवद्प्राप्ती अगदी सोपी जाते. मनुष्य त्याचा फायदा करून घेत नाही ही त्याच्या दुर्दैवाची गोष्ट आहे.’’

फळाचा व्यापार करणाऱ्या गृहस्थानं श्रीमहाराजांना प्रश्न केला की, ‘‘प्रापंचिक माणसाचे प्रपंचातील मन आणि प्रापंचिक संताचे प्रपंचातील मन या दोहोंमध्ये काही फरक आहे का?’’ श्रीमहाराज म्हणाले, ‘‘प्रापंचिक माणसाचे प्रपंचातील मन आंब्याच्या कोयीसारखे असते. कोय किती जरी कोळली अगर स्वच्छ करावयाचा प्रयत्न केला तरी थोडा तरी रसाचा अंश शिल्लक राहातो. तद्वत प्रापंचिक माणसाची आसक्ती प्रपंचात राहाते. संतांचे प्रपंचातील मन चिक्कूच्या बीसारखे असते. चिक्कू फोडल्याबरोबर जशी निर्लेप बी बाहेर झटकन पडते तसे संतांचे प्रपंचातील मन निरासक्त असते.’’

– ल. गो. ऊर्फ बापूसाहेब मराठे

(‘आणखी काही विशेष हृद्य आठवणी’ या पुस्तकातून)