सर्व वाचकांना आजपासून सुरू झालेल्या नवीन वर्षांच्या आणि वाचन-संस्कृती वाढण्यासाठीच्या शुभेच्छा.

वाचकहो, आपल्याला हे सदर आवडते, हे आपण आम्हाला अनेक माध्यमांतून कळवत आला आहात. हे सदर अतिशय लोकप्रिय असून ग्रामीण शाळातून रोजच्या प्रार्थनेनंतर हे सदर सार्वजनिकरीत्या वाचले जाते. शिवाय अनेक मुले रोजचे मजकुराचे कात्रण काढून ते चिकट-बुकात चिकटवून ठेवतात. आय.आय.टी. पवईमधील प्रा. श्याम आसोलेकर एकदा मला म्हणाले की, चार वर्षांपूर्वीच्या रसायनशास्त्र विषयावरील सदरातील चार लेख मी कापून माझ्याकडे ठेवले असून माझ्या पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना ते उपयोगी पडतात. वाचकहो, यामुळे आमच्यावर सर्व लेख वैज्ञानिकदृष्टय़ा अचूक असण्याची आणि दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या वाचकांना समजेल अशा सुलभ आणि रोचक भाषेत सदर लिहिण्याची जबाबदारी येऊन पडते.

यंदाच्या वर्षांचे मूलद्रव्ये ऊर्फ मौले हे या विषयावरचे सदरही मागील वर्षांएवढेच लोकप्रिय होईल अशी मला खात्री वाटते.

आपले सर्व आयुष्य मूलद्रव्यांनी लपेटलेले, वेढलेले आहे. हायड्रोजन हे पहिले मूलद्रव्य आहे. त्याशिवाय नायट्रोजन, ऑक्सिजन, लोखंड, सोने, चांदी, जस्त, तांबे अशी आजवर माहीत झालेली एकशे अठरा मूलद्रव्ये आहेत (हायड्रोजन ते ओगॅनिझम). दर वर्षी आम्ही आपल्याला २५५ ते २५६ लेख देतो. या सदराचा मूळ उद्देश विज्ञानाच्या विविध विषयांवर वाचकांना नवी आणि ताजी माहिती मिळावी, त्यांचे कुतूहल जागे व्हावे असा आहे. यंदाच्या लेखात मौलांचा इतिहास, त्याचे संशोधक, त्या मौलांची थोडी तांत्रिक माहिती, त्याचे उपयोग या अंगाने प्रत्येक लेख सजलेला असेल. जी मौले हरघडी आपल्याला लागतात त्यांच्यावर कदाचित चार-पाच लेख असतील तर काही नव्याने सापडलेल्या अथवा शोधलेल्या मौलांवर एकेक लेखही असेल. शिवाय यातून काही मनोरंजक माहितीही मिळेल. उदा. चांदीचा शोध लागण्यापूर्वी जस्ताचा शोध लागल्याने त्याचा उपयोग जेवण्याच्या भांडय़ांसाठी आणि शर्टाच्या गुंडय़ांसाठी करीत. पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठीही त्याचे नळ असत, पण पुढे त्याचे दुष्परिणाम लक्षात आल्याने या वापरातून ते धातू मागे पडले. नेहमीप्रमाणे या सदराचेही शेवटचे काही लेख वाचकांच्या प्रतिक्रियांसाठी असतील.

– अ. पा. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

स्वकीय आणि परकीय

अगदी अलीकडे म्हणजे, ३० सप्टेंबर २०१७च्या वर्तमानपत्रात टॉम अल्टर या बॉलीवूड अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी वाचली. अस्खलित हिदी बोलणाऱ्या गोऱ्या कातडीच्या या साहेबाला अनेक वेळा हिदी सिनेमांत पाहिलंय! त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे माझं कुतूहल चाळवलं गेलं की, टॉम हा एका अमेरिकन मिशनरी दाम्पत्याचा मुलगा. हा मुंबईच्या चित्रपट व्यवसायात का आणि कसा आला असेल? त्यानं चित्रपटसृष्टीत आपलं बस्तान बसवून तो त्यात कसा रमला असेल? त्या वेळी असं लक्षात आलं की, टॉमसारखे अनेक परकीय लोक भारतात येऊन निरनिराळ्या क्षेत्रांत, व्यवसायांत आपली खास ओळख तयार करून इथे रमलेत, नव्हे ते इथलेच झालेत!

अशा परकीयांबद्दल विचार करताना अगदी अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अलेक्झांडरनंतर भारतीय प्रदेशात स्थायिक होऊन इथेच रमणाऱ्यांच्या यादीत साठ-सत्तर नावे सुचली. अशा ‘परकीय’ व्यक्ती आणि समाजांबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने ही लेखमाला दिली आहे.

खरं तर आपण स्वत:ला मूळचे भारतीय म्हणवून घेणारे लोक तरी स्वकीय आहोत की परकीय याचा विचार करायला हवा. आपण म्हणजे आर्य आणि द्रविड हेच खरे या देशाचे मूळ रहिवासी अशी आपली सर्वसाधारण समजूत आहे. परंतु वंशशास्त्र आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी, आर्य आणि द्रविड हेसुद्धा दुसरीकडूनच या प्रदेशात प्राचीन कालखंडात आले असल्याचे सिद्ध केलंय. सुप्रीम कोर्टात चाललेल्या एका खटल्याचा निकाल ५ जानेवारी २०११ रोजी जाहीर करताना न्या. मरकडेय काटजू आणि न्या. ग्यानसुधा मिश्रा यांच्या खंडपीठाने भिल्ल, गोंड, संथाल, तोडस या जमातींना भारतीय प्रदेशातले ‘अ‍ॅबओरिजिन्स’ किंवा आदिवासी, म्हणजेच मूळचे रहिवासी म्हटले आहे.

म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के असलेले या जमातींचे लोक मूळचे भारतीय तर उरलेले ९३ टक्के लोक (यात आर्य, द्रविडही समाविष्ट) हे सर्व परकीय स्थलांतरित! कॅनडा आणि उत्तर अमेरिकेतही ९६ टक्के लोक हे स्थलांतरितच, पण त्यांचे स्थलांतर गेल्या चार-पाच शतकातले तर भारतीय प्रदेशातल्या आर्य द्रविडांचे स्थलांतर गेल्या सहा-सात हजार वर्षांपूर्वीचे! त्यामुळे आर्य-द्रविड हे मूळचे भारतीय रहिवासी असे ग्राह्य़ धरूनच ही लेखमाला लिहिली आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com