रंग, रूप, आकार, वजन, शरीराची ठेवण या गुणांवरून कोंबडय़ांच्या जाती ठरवण्यात येतात. उपयुक्ततेनुसार या जातींचे वर्गीकरण जास्त अंडी देण्याची क्षमता, जलद वाढ, खाद्याचे रूपांतर मांसात करण्याची क्षमता इत्यादी बाबींवर केलेले आहे.
जास्त अंडी देणाऱ्या कोंबडय़ांच्या महत्त्वाच्या दोन जाती आहेत. अ) व्हाइट लेगहॉर्न ब)ब्लॅक मिनॉर्का.
अ) व्हाइट लेगहॉर्न : इटलीतील लेगहॉर्न हे गाव या जातीचे मूळ आहे. या कोंबडय़ा  पांढऱ्याशुभ्र, भारी चपळ व दीड ते पावणेदोन किलो वजनाच्या असतात. यांना खाद्य कमी लागते, पण त्या अंडी जास्त देतात (वर्षांला २८०-३३०). अंडय़ासाठी त्या जगात सर्वोत्कृष्ट आहेत. त्या पांढऱ्या रंगाची अंडी देतात. यांच्या डोक्यावर लाल रंगाचा मोठा तुरा असतो. कानाची पाळी पांढऱ्या रंगाची असते. पायावरील कातडीचा रंग पिवळा असतो. या जातीतून निवड पद्धतीने काही उपजाती व व्यावसायिक सहजाती तयार केलेल्या आहेत. उदा. व्हेनकॉब-३००. व्यावसायिक जातीची निवड आपल्या वातावरणाप्रमाणे तसेच व्यवसाय योग्यतेप्रमाणे करण्यात येते.
ब) ब्लॅक मिनॉर्का : या कोंबडय़ा आकाराने लहान असतात. रंग काळा, तुरा लाल व कानाची पाळी पांढरी असते. त्या पांढरी अंडी देतात. साधारणत: २५०-२८० अंडी वर्षांला त्यांच्यापासून मिळतात.
मांसासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या कोंबडय़ांच्या महत्त्वाच्या जाती आहेत- अ) व्हाइट फ्लाय माऊथ रॉक ब) रेड कॉनिश.
अ) व्हाइट फ्लाय माऊथ रॉक : यांच्या शरीरावर काळे व पांढरे पट्टे असलेले पंख असतात. वजनाने भारी असल्यामुळे मांसासाठी ही जात जगप्रसिद्ध आहे. ब्रॉयलर पक्षी या जातीपासून निर्माण केले आहेत.
ब) रेड कॉनिश : यांचे डोळे मोठे असतात. त्यांचा उपयोग संकरित पक्षी तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर होतो. यामध्ये निळ्या व हिरव्या रंगांचे मिश्रण मुख्यत्वे सापडते. त्यावर तपकिरी रंगाची झालर असते. कानाची पाळी लाल रंगाची असते. मांसासाठी त्या जगात प्रसिद्ध आहेत. नराचे वजन साडेतीन किलो, तर मादीचे अडीच किलो असते. या कोंबडय़ा वर्षांतून फक्त १६०-१८० अंडी देतात.

जे देखे रवी.. –   मृच्छकटिक
इसवी सन १४३४ मध्ये इटलीत एक पुसट पण युगप्रवर्तक घटना घडली. आरनोल्फिनी नावाच्या एका यशस्वी व्यापाऱ्याने यान व्हान आइक चित्रकाराला बोलवले आणि त्याला सांगितले की माझ्या आणि माझ्या बायकोचे आमच्या दिवाणखान्यात चित्र काढायचे आहे. चित्रकार कचरला. तो म्हणाला आम्ही देव, देविका, राजे, राजवाडे किंवा धर्मगुरूंची चित्रे काढतो. मेरीच्या चेहऱ्यावरची करुणा आणि येशूचे क्रूसावरचे असहाय्यत्व आणि जगासाठी भोगलेल्या वेदना या गोष्टींची चित्रे काढण्यासाठी मला बोलवले जाते. तेव्हा झालेल्या काल्पनिक संवादात तो व्यापारी म्हणतो ‘मी किंवा माझ्यासारखे देवाधर्माचे करतात किंवा राजाला कर भरतात म्हणून हे राज्य तगते तेव्हा माझे चित्र का नाही? अशा तऱ्हने त्याचे त्याच्या बायकोसकट त्याच्या शोभिवंत घरात दागदागिन्यांसह आणि जमिनीवरचे गालिचे आणि उंची टेबल खुच्र्यासकट एक चित्र काढण्यात आले. तो काळ महत्त्वाचा. कारण असे समजतात की त्याकाळात युरोपचे पुनर्उत्थापन सुरू झाले. पारंपरिक कला चालू राहिल्या, परंतु मनुष्यकेंद्रित कलाकृतीही घडू लागल्या. सुरकुतलेले स्त्रीपुरुष, शिथिल झालेली शरीरे आणि तारवटलेले डोळे चित्रांमधून दिसू लागले. एके काळी भारतात अशीच एक घटना घडली ती घटना म्हणजे मृच्छकटिक नाटक. त्यापूर्वी रामायण आणि महाभारतातल्या कल्पनांवर किंवा घटनांवरच शब्दांची मखर चढत असे. कालिदासाच्या मेघदूतातली यक्ष ही कल्पनाही महाभारतातली. तो यक्ष भले प्रेमात असेल, परंतु त्याच्या वनवासातल्या जागेचे वर्णन करताना ‘ज्या पाण्यात सीतेने स्नान केले त्याचे कुंड जवळच आहे’, असा उल्लेख तो करतो. मृच्छकटिकाची गोष्ट एका लग्न झालेल्या सज्जन मुळात श्रीमंत परंतु अव्यवहारी स्वभावामुळे कंगाल होऊ घातलेल्या माणसाची आहे. तो वसंतसेना नावाच्या एका सुंदर वारांगनेच्या (नगरवधू) प्रेमात पडतो आणि तीही त्याच्याकडे आकृष्ट होते असे दाखवले आहे. त्यात एक खलनायकही आहे. रत्नांच्या थैल्यांची देवाणघेवाण आहे. या थैल्या हरवतात मग सापडतात त्यात समजुती गैर समजुती आहेत. जी व्यक्ती मेली असे वाटते ती मेलेली नसते ते प्रेत कोणाचे तरी भलत्याचेच असते अशी घटना आहे. सर्वात महत्त्वाचे ते नाटक कुणी उच्चपदस्थ सरकारमान्य दरबारी कवीने नव्हे तर शूद्रक अशा बहुजनसमाजीय नावाच्या माणसाने लिहिले आहे. आणि त्यात देवादिक किंवा धर्माचे फारसे स्तोम न माजवता केलेले चित्रण, विनोद, रहस्य, प्रेमप्रकरणे, दरबारी कारस्थाने यांनी ओतप्रोत भरलेले आहे. याच भारतीय नाटकाची परदेशात सर्वात जास्त भाषांतरे झाली आहेत. गंमत अशी की यातली पात्रे संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषा बोलतात. हाही एक अपवादच. भाषेबद्दल पुढील लेखात.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  –  थायरॉईडग्रंथी आजार : वाढती रोगसमस्या
थायरॉईड ग्रंथीच्या आजाराचे रुग्ण माझ्या ४० वर्षांच्या रुग्णसेवेपैकी पहिल्या २०-२५ वर्षांत क्वचितच येत.  या रुग्णांना गळा, मान यांच्या गाठी असायच्या. त्याकरिता माझी नेहमीची मेदोजग्रंथीची रक्तवर्धक, ग्रंथीनाशक चिकित्सा व कडक पथ्यपाणी यामुळे रुग्ण तीन-चार महिन्यात ठीक व्हायचे. गेली वीस पंचवीस वर्षे थॉयराईडविषयक अनेकानेक रक्त तपासणी रिपोर्ट घेऊन, जास्त करून महिला रुग्ण येतात. स्थौल्य, आळस, थकवा, चिडचिड, अकारण रागराग, मासिक पाळीच्या तक्रारी, अनपत्यता व क्वचित अत्यंत कृशता अशा लक्षणांचे वर्णन करून, ‘माझ्या थॉयराईडच्या गोळ्या चालू आहेत. फॅमिली डॉक्टरांनी त्या आयुष्यभर घ्यावयास सांगितल्या आहेत,’ अशा सर्वच रुग्णांना ‘आयोडिन’ हे घटकद्रव्य असणाऱ्या गोळ्या तडक बंद करायला सांगतो. त्यांच्या संपूर्ण आजाराचे, विविध लक्षणांचे रक्ताच्या प्रमाणासह अभ्यास करून, लक्षणांनुरूप, अवस्थानुरूप आयुर्वेदिक औषधी उपचार व पथ्यापथ्य सांगतो. वर्षांनुवर्षे थॉयराईडच्या गोळ्या खाऊन कंटाळलेले रुग्ण माझे ऐकतात, ही परम भाग्याची गोष्ट आहे.
सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या एका परम मित्राच्या आईला घरी भेटावयास गेलो. शरीर खूप स्थूल, अंगावर सर्वत्र सुरकुत्या, पुण्यातील थोर डॉक्टरांची रात्री अकरा-बारा वाजताची नियमित अ‍ॅपॉईंटमेंट. एवढे असूनही कायम थॉयराईड गोळ्या हा एकच उपचार! मी औषधाच्या बाटलीचे लेबल बारकाईने वाचले. ‘औषधांचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी-जास्त करावा’असे स्पष्ट असूनही थोर वैद्यकीय चिकित्सक आपले रुग्णांना आयुष्यभर या गोळ्या घ्यावयास सांगतात. या औषधांच्या घटकद्रव्यात बिब्ब्यासारखे तीव्र औषध असते. बिब्बा अपवादप्रसंगी तारतम्याने द्यावयाचा असतो, असा थोर थोर ऋषींचा सांगावा आहे. मित्राच्या आईंच्या थॉयराईड गोळ्या बंद करून, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, लाक्षादि, त्रिफळागुग्गुळ काही काळ देऊन दोन महिन्यात शरीर खूपच हलके, निरामय झाल्याची आठवण अजून ताजी आहे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २२ ऑगस्ट
१८८७ >  इतिहासविषयक पुस्तकांचे लेखक मोरेश्वर रामचंद्र जोशी यांचा जन्म. ‘ऐतिहासिक आख्यायिका’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ’ तसेच ‘पोस्टाच्या तिकिटाची कूळकथा’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९२१ > नाटककार मोरो विनायक शिंगणे यांचे निधन. ‘यशवंत-विजया नाटिका’ हे इंग्रजी नाटकावर आधारित आहे, तर ‘कन्या-विक्रय दुष्परिणाम’ हे नाटक एक पिता धनलोभाने आपल्या मुलीचे लग्न म्हाताऱ्याशी लावतो, या कथानकाचे आहे. (याच कथानकावरील ‘सं. शारदा’ हे १८९९ सालचे नाटक अधिक गाजले)
१९७० > लेखक व मराठी भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे यांचे निधन. ‘यादवकालीन महाराष्ट्र’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तर ‘भाषा : अंत:सूत्र आणि व्यवहार’ तसेच ‘ज्योतिष रत्नमाला (मूळ संस्कृत, मराठी टीकांसह)’ या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले.
१९७१ > कादंबऱ्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे विष्णू बापूजी आंबेकर यांचे निधन. ‘परामर्श’, ‘तरंग आणि तुषार’ हे लेखसंग्रह, तर ‘हरिभाऊ (आपटे) : काळ आणि कर्तृत्व’ हे चरित्र त्यांनी लिहिले.
– संजय वझरेकर