मोजमापनाचे विशेषत: मोजमापनातील प्रमाणीकरणाचं महत्त्व दृढ करणारे लेख छापून आल्यानंतर, शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेले धडे आजही आठवतात, अशा आशयाची काही पत्रं आली.

काही शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक या लेखांची कात्रणं काढून विज्ञान मंडळांसाठी वापरतात. काही भित्तिपत्रकांसाठी वापरतात. काही शाळांत या सदरांचे वर्गात किंवा प्रार्थनेच्या वेळी सामुदायिक वाचन नियमितपणे होते. काही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कात्रणवह्य़ा तयार केलेल्या आहेत. विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी त्या ठेवल्याही जातात. काही विज्ञानशिक्षक आपल्या अध्यापनात याचा वापर करतात.  हीदेखील या सदराची एक फलनिष्पत्ती आहे.

काही वाचकांनी झालेल्या चुका वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या. काही वाचकांनी टीकाही केली. ती टीका म्हणजे आम्हाला सुधारण्याची संधी समजून त्यापुढील लेख आम्ही अधिक सजगतेने तपासले. काही माहिती चूक आहे, असा युक्तिवाद काही चिकित्सक वाचकांनी केला. दिलेल्या माहितीपेक्षा अधिक अचूक माहिती तुम्ही लिहा; आपण पुढील आठवडय़ातील लेखात ती देऊ. असे आवाहन केल्यानंतर मात्र फारच कमी लोक पुढे आले.

‘कुतूहल’ सदरामुळे प्राचीन मोजमापे, मोजमापनाची आधुनिक साधने, एकके, संबंधित शास्त्रज्ञ, संख्याशास्त्र याबद्दल जिज्ञासा वाढल्याचे काही वाचकांनी कळविले आहे. काही वाचकांनी विज्ञानातील काही संकल्पना-शब्द (उदा. विष्यंदता) नव्याने समजल्या असे आवर्जून कळवले. काही वेळा वाचकांमध्येच आपापसांत संकल्पनांविषयी चर्चा झाल्या. काही वेळा लेखांतील काही शब्दांबद्दल आक्षेप घेतला गेला. काही वाचकांनी चुकीच्या शब्दांचा वापर निदर्शनास आणून दिला. उदा. रिश्टरऐवजी रिक्टर, डेंग्यूऐवजी डेंगी इत्यादी. आम्ही शक्यतो पारिभाषिक शब्दकोशातील प्रमाणभाषा वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे.  बुद्धय़ांक व भावनांक मोजमापनाच्या लेखांवर सर्वात जास्त प्रतिक्रिया आल्या. या बाबींबाबत समाज सजग होत असल्याचे हे लक्षण आहे. प्राणी-पक्षीसंदर्भातील मोजमाप लेखांवर कुतूहल दर्शवणारी पत्रं बऱ्याच वाचकांनी पाठवली.

कुतूहलमधील मोजमापनासंबंधीची माहिती मूलभूत व सोप्या शब्दांत सांगितलेली असल्याने स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे, परंतु वृत्तपत्रातील स्तंभलेखनाला शब्दांच्या मर्यादा येतात. त्यामुळे विस्तृत माहिती व त्याला आवश्यक अनुरूप आकृत्या असे पुस्तक असावे, अशी सूचना काही वाचकांनी केली आहे.  यापूर्वीच्या काही कुतूहल सदरांची विषयवार संकलनं पुस्तकरूपात प्रकाशित झालेली आहेत. योग्य प्रकाशक मिळाल्यास या वर्षीच्या लेखांचाही त्या दृष्टीने नक्की विचार केला जाईल.

मराठी विज्ञान परिषद ही एक स्वयंसेवी संस्था असल्याने संस्थेच्या काही मर्यादा आहेत. आíथक मर्यादांवर काही प्रमाणात मार्ग काढता येऊ शकतो;  परंतु सुयोग्य मनुष्यबळ मिळणे, हे आजकाल अवघड झाले आहे.

– डॉ. जयंत जोशी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

ज्ञानपीठ पुरस्कार : एक दृष्टिक्षेप

मान्यताप्राप्त २२ भारतीय भाषांपैकी, एका भाषेचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. १९६५ ते २०१६ पर्यंत एकूण ५७ जणांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुरुवातीला १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम  कवी गोविंद शंकर कुरुप यांना मिळाला. एक लाख रुपये, वाग्देवीची – सरस्वतीची प्रतिमा आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता हा पुरस्कार ११लाखांचा आहे. १९६७, १९७३, १९९९, २००६, २००९ असा पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला. आतापर्यंत फक्त सातच लेखिकांना हा पुरस्कार मिळाला असून, चार वेळा मराठी भाषेचा सन्मान झाला आहे. १९६५ ते १९८१ पर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार लेखकाच्या एखाद्या साहित्यकृतीला दिला जात होता. १९८२ पासून सर्व साहित्याचा विचार केला जात आहे. १९६५ ते २०१६ या ५२ वर्षांत सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेचा सन्मान झाला असून, कन्नड (८), बंगाली (६), मल्याळम् (५), मराठी, गुजराती, उडिया, उर्दू (४), तेलुगू (३), आसामी, पंजाबी, तमिळ (२) आणि काश्मिरी, कोकणी, संस्कृत (१) अशा प्रकारे सन्मान झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार अनेक कवी, कथा – कादंबरीकारांना मिळाला आहे. पण नाटय़लेखनासंदर्भात  गिरीश कार्नाड (कन्नड – १९९८) यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार ही अपवादात्मक, पण उचित आणि लक्षणीय घटना म्हणायला हवी. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य (आसामी- १९७९) यांना वयाच्या ५५ व्या वर्षी ज्ञानपीठ आणि ३७ व्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला असून, हे दोन्ही पुरस्कार इतक्या कमी वयात अन्य कोणाही भारतीय साहित्यिकास मिळालेले नाहीत.  मास्ति वेंकटेश अय्यंगार (कन्नड – १९७९) यांना वयाच्या ९२ व्या वर्षी  हा पुरस्कार मिळाला होता.

आधुनिक हिन्दी साहित्यात अनेक नवे प्रयोग करणारे ‘अज्ञेय’ – हे हिन्दी नवकवितेचे जनक समजले जातात. हिन्दी भाषेत प्रथमच ‘हायकू’ रचनेचा परिचय करून देण्याचे श्रेय अज्ञेय यांना जाते. खडी बोलीला काव्यात्म भाषा घडविण्याचे श्रेय सुमित्रा नंदन पंत यांना जाते. ‘फिराक’ गोरखपुरी हे उर्दू काव्यात आधुनिक कविता युगाचे प्रतिनिधी मानले जातात. गझल, रुबाईच्या रचनेत प्रथमच त्यांनी हिन्दू पुराणातील संदर्भ आणि क्वचित संस्कृत शब्दावलीचा वापरही केलेला दिसतो.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com