माणसं समूहात राहतात. समूहाचे बरेच फायदे असतात. एखाद्या शाळेत एखादं मोठं कार्य तडीला न्यायच्या वेळी, चर्चामध्ये सगळ्यांच्या सहमतीनं निर्णय घेतले जातात तेव्हा ते चुकण्याची शक्यता कमी असते. याउलट एखादा नेता सर्वानी मिळून ठरवलेला असतो, तरीही त्यानं घेतलेले एकतर्फी निर्णय, आदेश इत्यादी चुकण्याची शक्यता जास्त असते. यासाठी चच्रेअंती घेतलेला निर्णय केव्हाही फायदेशीर असतो.

लहान समूहांमध्ये जेव्हा चर्चा केली जाते, तेव्हा त्यात प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळते. विचारविनिमय करण्याची आणि नवोदितांना विचारविनिमय ऐकण्याचीदेखील संधी मिळते. अशा प्रकारे सामील होण्यातून प्रत्येकावरच सहभागाचे संस्कार होत असतात. ज्या गोष्टी सर्वाच्या हिताच्या नाहीत, त्या टाळण्याची सुबुद्धी त्यातून निर्माण होते. एकाच गोष्टीला अनेक बाजू असू शकतात, त्यांचे फायदे-तोटे जोखून घेण्याची संधी मिळते. ती मेंदू विकासाच्या दृष्टीने फार आवश्यक असते.

चच्रेमध्ये कोणीही एक वक्ता नसतो, ते व्याख्यान नसतं, तर सर्वानी मिळून बोलायचं असतं. आपलं मत मांडायचं असतं. आपलं मत संपूर्ण गटाच्या विरुद्ध असलं तरीही ते मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. छोटय़ा गटचर्चातून स्वत:मधली अनेक गुणवैशिष्टय़ं प्रकट होत असतात.

‘इतरांची मतं ऐकून घेणं’ या अगदी साध्या गोष्टीतून आपली ऐकण्याची क्षमता वाढते. इतरांची मतं ऐकून स्वत:चं मत तयार करता येतं. आपल्या शब्दांत ते व्यक्त करण्याची क्षमता वाढते. इतरांना आपली बाजू समजावून सांगण्याची क्षमता वाढते. आपल्या विचारांत, विचार मांडण्याच्या क्षमतेमध्ये काही चूक असल्यास ती कळून येते. आपली चूक असल्यास माघार घेणं जमायला पाहिजे, सहजपणे नाकारणं आणि पुढे जाणं आवश्यक आहे, याची जाणीव होते. आपल्यामधले ठळक गुण व दोष कोणते, हे स्वत:लाच कळू लागतं. सुधारण्याची संधी मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यानिमित्तानं विविध विषयांचा अभ्यास आपोआपच होतो. एका विषयावर अनेकांची वेगवेगळी मतं असतात; ती आपल्यापेक्षा निराळी असू शकतात, हे कळतं. त्यामुळे स्वत:मध्ये आपोआपच चांगला बदल होतो. नियोजन, निर्णयक्षमता हे ‘फ्रण्टल लोब’चं काम. त्याच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे.

– डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com