आकाशातील जवळच्या ताऱ्यांची अंतरे मोजण्यासाठी पराशय पद्धत वापरली जाते. पराशय म्हणजे निरीक्षणाच्या बदललेल्या स्थानानुसार ताऱ्याच्या स्थानात पडणारा फरक. तारा जितका जवळ, तितका हा पराशय अधिक. दोन ठिकाणांहून निरीक्षण करून ताऱ्याचा पराशय मोजला, की त्यावरून त्या ताऱ्याचे आपल्यापासूनचे अंतर त्रिकोणमितीच्या साहाय्याने काढता येते. यासाठी पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेदरम्यान वेगवेगळ्या वेळी ताऱ्याचे स्थान नोंदवले जाते व त्यावरून ताऱ्याचा पराशय काढला जातो. मात्र अतिदूरच्या ताऱ्यांचा पराशय हा अत्यल्प असल्याने, शंभर प्रकाशवर्षांपेक्षा अधिक अंतरावरच्या ताऱ्यांसाठी ही पद्धत निरुपयोगी ठरते.

सेफिड या प्रकारातील ताऱ्यांचे तेज ठरावीक वारंवारतेने सतत बदलत असते. अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ हेन्रीटा लेव्हिट हिने, आपल्या दीर्घिकेची उपदीर्घिका असणाऱ्या माजेलानिक मेघांतील एका तारकागुच्छातल्या विविध सेफिड ताऱ्यांचा अभ्यास केला. एकाच तारकागुच्छात असल्यामुळे, हे सर्व सेफिड तारे आपल्यापासून जवळपास समान अंतरावर आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ तेजस्वितेची एकमेकांशी थेट तुलना करणे लेव्हिटला शक्य झाले. या ताऱ्यांच्या तेजस्वितेतील बदलाच्या वारंवारतेचा, ताऱ्याच्या मूळ तेजस्वितेशी संबंध असल्याचे तिला आढळले. तारा जितका तेजस्वी, तितका त्याच्या तेजस्वितेतील बदलाच्या चक्राचा कालावधी अधिक. सन १९१२ मध्ये जाहीर झालेल्या या शोधामुळे, कोणत्याही दूरच्या दीर्घिकेतील एखाद्या सेफिड ताऱ्याच्या तेजस्वितेतील बदलाची वारंवारता मोजली की त्यावरून त्याची मूळ तेजस्विता कळू लागली. या मूळ तेजस्वितेची त्या ताऱ्याच्या, पृथ्वीवरून दिसणाऱ्या दृश्य तेजस्वितेशी तुलना केली की, त्या ताऱ्याचे आणि पर्यायाने त्या दीर्घिकेचे आपल्यापासूनचे अंतर कळू लागले.

काही कोटी प्रकाशवर्षांपेक्षा अधिक अंतरावरील दीर्घिका फारच अंधूक असल्याने, अशा दीर्घिकांसाठी ही पद्धतसुद्धा उपयुक्त ठरत नव्हती. मात्र हेही शक्य झाले ते, १९२९ सालच्या एडविन हबल या अमेरिकी शास्त्रज्ञाच्या संशोधनाद्वारे. विश्वाच्या प्रसरणामुळे दूरच्या दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहेत. एडविन हबलच्या संशोधनानुसार, दीर्घिकांचा दूर जाण्याचा वेग हा त्यांच्या आपल्यापासूनच्या अंतरावर अवलंबून असतो. दीर्घिकांचा हा वेग वर्णपटशास्त्रावरून काढता येतो. एखाद्या अतिदूरच्या दीर्घिकेचा आपल्यापासून दूर जाण्याचा वेग एकदा कळला की त्यावरून त्या दीर्घिकेचे आपल्यापासूनचे अंतर हबलचा नियम वापरून काढता येते. हबलच्या या संशोधनामुळे अब्जावधी प्रकाशवर्षे अंतरावरच्या दीर्घिकांचे अंतर काढणेही शक्य झाले.

मृणालिनी नायक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org