डॉ. यश वेलणकर

योगातील बंध आणि प्राणायाम यामुळे शरीरात काही बदल होऊन गूढ आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात. मात्र हे अनुभव मेंदूतील काही भागांची उत्तेजना झाल्याने असू शकतात. उद्दियान बंध म्हणजे पोट पूर्ण आत घेऊन काही वेळ राहणे होय. असे बंध आणि त्यानंतर दीर्घ श्वसन यांमुळे पाठीच्या कण्यातील मणके आणि कंबरेतील हाडांची वैशिष्टय़पूर्ण हालचाल होते. या हालचालींमुळे पाठीच्या कण्यात मज्जारज्जूच्या आवरणात असलेल्या द्रवावर दाब पडतो. आपल्या मज्जारज्जूच्या वर तीन आवरणे असतात. त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा द्रव असतो. तो मेंदूच्या आवरणातून मेंदूच्या आतमध्ये पोकळ्या असतात त्यांतून वाहत असतो. एखाद्या रुग्णाला मेंदूच्या आवरणाला जंतुसंसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टर पाठीच्या कण्यातून हाच द्रव काढून त्याची तपासणी करतात. हा द्रव पाठीच्या कण्यातून मेंदूत आणि तेथून पुन्हा पाठीच्या कण्यात असा वाहात असतो. उद्दियान बंध आणि प्राणायाम यामुळे होणाऱ्या हाडांच्या हालचालींनी या द्रवावरचा दाब सूक्ष्म प्रमाणात वाढून तो मेंदूला आतून उत्तेजित करीत असेल. अशा क्रिया नियमितपणे आणि योग्य प्रकारे केल्या तर मेंदूला काही ठरावीक ठिकाणी उत्तेजना मिळू शकत असेल. मेंदूतील टेम्पोरल लोबला सूक्ष्म इलेक्ट्रोडने उत्तेजित केल्यानंतर येणारे अनुभव आणि योग्यांना येणारे अनुभव बरेचसे सारखे असल्याने मेंदूला योगिक क्रियांनी अशी उत्तेजना मिळत असेल, अशी शक्यता आहे. मात्र अद्याप हे सिद्ध झालेले नाही. अशी साधना नियमितपणे करीत असलेल्या योग्यांचा मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाचा आकार सूक्ष्म प्रमाणात वाढलेला संशोधनात दिसला आहे. मेंदूचा हा भाग ज्ञानेंद्रिये घेत असलेल्या माहितीचे ‘हब’ आहे. येथे सर्व संदेश एकत्र येतात. या भागात रचनात्मक बदल दिसून येत असल्याने सामान्य माणसे जाणू शकत नाहीत असे ज्ञान या योग्यांना मिळू शकत असेल अशीही शक्यता आहे.आध्यात्मिक साधनेचा उद्देश ‘मी’ चा लोप करणे हाच असेल तर अशा अनुभवांना महत्त्व दिल्याने ‘मला’ दिव्य दर्शन होते हा विचारच अहंकार वाढवणारा ठरतो. त्यामुळे आध्यात्मिक साधकांनीही त्याला महत्त्व देता नये. स्वत:च्या शरीर मनाकडे साक्षीभावाने पाहता येणे शरीरमनाच्या आरोग्य प्राप्तीसाठी उपयुक्त आहेच; पण आध्यात्मिक प्रगतीसाठीही महत्त्वाचे आहे.

yashwel@gmail.com