दिमित्रि मेंडेलिव्ह यांनी १८६९ मध्ये आपल्या आवर्त सारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार स्थान दिलं. बोरॉन व अ‍ॅल्युमिनिअम यांच्यानंतर तिसऱ्या गटात दोन व सिलिकॉननंतर चौथ्या गटात एक अशी तीन मूलद्रव्यं असू शकतात, असं त्यांनी भाकीत केलं. त्या मूलद्रव्यांना त्यांनी इका-बोरॉन (बोरॉनप्रमाणे), इका-अ‍ॅल्युमिनिअम व इका-सिलिकॉन अशी नावं दिली. पुढे १९०० सालापर्यंत या तीनही मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर इका-बोरॉनला स्कँडिअम, इका-अ‍ॅल्युमिनिअमला गॅलिअम व इका-सिलिकॉनला जम्रेनिअम अशी नावं दिली गेली.

सन १८६९मध्येच, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ लार्स फ्रेडरिक निल्सन हे युक्झेनाईट (euxenite) आणि गॅडोलिनाईट (gadolinite) या खनिजांचा अभ्यास करत होते. वर्णपंक्ती तपासताना त्यांना एक नवीन मूलद्रव्य त्यात असल्याचं आढळलं. स्कँडिनेव्हिया येथील खनिजांतून हे मूलद्रव्य मिळालं होतं; म्हणून निल्सन यांनी त्या मूलद्रव्याला नाव दिलं ‘स्कँडिअम.’ ४४.९ अणुभार असलेल्या या मूलद्रव्याचा अणुभार ४४ असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ क्लेव्ह यानी मेंडेलिव्हनी सूचित केलेलं इका-बोरॉन म्हणजेच स्कँडिअम असलं पाहिजे, हे निदर्शनास आणून दिलं.

खनिजांतून स्कँडिअम वेगळं करण्यासाठी निल्सन यांनी बरेच प्रयत्न केले. १० किलोग्रॅम युक्झेनाईटमधून फक्त २ ग्रॅम स्कँडिअम ऑक्साईड मिळवण्यात त्यांना यश आलं खरं, पण शुद्ध स्कँडिअम धातू मिळण्यासाठी १९३७ साल उजाडलं. जर्मन शास्त्रज्ञ फिशर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने उच्चतापमानाला स्कँडिअमक्लोराईडचं विद्युत अपघटन करून शुद्ध स्कँडिअम धातू प्रयोगशाळेत मिळवला. पण मोठय़ा प्रमाणात ९९ टक्के शुद्ध स्कँडिअम धातू प्रथम १९६० साली मिळवता आला.

पृथ्वीवर विपुल प्रमाणात मिळणाऱ्या मूलद्रव्यांच्या यादीत स्कँडिअमचा क्रमांक ३१वा लागतो. पृथ्वीवर स्कँडिअमची खनिजं सर्व पृष्ठभागावर पसरलेली असल्याने ती शोधताना अडचण येते. त्याची जवळपास ८०० खनिजं आहेत. बहुतेक खनिजांमध्ये स्कँडिअम ऑक्साईडच्या आणि फ्लोराईडच्या रूपात असतं.

दरवर्षी सुमारे १० टन स्कँडिअम हे ऑक्साईडच्या स्वरूपात उपउत्पादन म्हणून खनिजांतून वेगळं केलं जातं. मात्र शुद्ध स्कँडिअम अगदीच कमी मिळत असल्याने महागडय़ा धातूंच्या यादीत स्कँडिअमची गणना होते. स्कँडिअम खनिजांपासून वेगळं करण्याची किचकट प्रक्रिया, कमी उत्पादन आणि जास्त किंमत यांमुळे स्कँडिअमचा वापर मर्यादित आहे. तरीही स्कँडिअमचे गुणधर्म लक्षात घेता, त्याची मागणी वाढत चालली आहे. युक्रेन, रशिया आणि चीन हे देश स्कँडिअम निर्मितीत आघाडीवर आहेत.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org