‘ज्ञानपीठ पुरस्कारा’च्या एकेका मानकऱ्यांची सविस्तर ओळख या सदरातून आपण करून घेऊच, पण यानिमित्ताने अभ्यास करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली की, १९६५ पासून सुरू असलेला ज्ञानपीठ पुरस्कार फक्त सात लेखिकांनाच मिळाला आहे. ५१ पैकी सात म्हणजे स्त्रीलेखनाची किती नगण्य दखल घेतली गेली आहे, हे लक्षात येईल.

१९७६ मध्ये बंगाली लेखिका आशापूर्णादेवी यांच्या ‘प्रथम प्रतिश्रुति’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. याचा मराठी अनुवाद प्रसिद्ध आहे. १९८१ मध्ये अमृता प्रीतम या सुप्रसिद्ध पंजाबी लेखिकेच्या ‘कागज के कॅनव्हास’ या काव्यसंग्रहाला प्रदान करण्यात आला. १९८२ मध्ये महादेवी वर्मा या सुप्रसिद्ध हिंदी कवयित्रीला- हिंदी साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल.

१९८९ मध्ये उर्दू लेखिका- कुर्रतुल ऐन हैदर ऊर्फ ऐनी आपा यांना, १९९६ मध्ये पुन्हा एकदा बंगाली समर्थ लेखिका- महाश्वेतादेवी यांना, २००० मध्ये आसामी लेखिका, रामायण अभ्यासक- डॉ. इंदिरा गोस्वामी आणि २०११ मध्ये पुरोगामी, प्रसिद्ध उडिया लेखिका- डॉ. प्रतिभा राय यांना देण्यात आला. या सर्व पुरस्कारप्राप्त लेखिकांच्या साहित्याबद्दल आदर बाळगून, खंत वाटली. इरावती कर्वे,  दुर्गाबाई भागवत इ. मराठी लेखिकांना मिळायला हवा होता हा पुरस्कार.असो.

कोणत्याही भाषेत त्या त्या भाषिक समाजजीवनाचं, रीती, रूढी, परंपरांचं प्रतिबिंब असतं. १९६५ च्या पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळी १९२० ते १९५८ या कालखंडातील साहित्याचा विचार केला होता. याचा अर्थ १९२० ते आजच्या भारताच्या समाजजीवनाचं- एका मोठय़ा, विशाल जीवनपटाचं- दर्शनच ज्ञानपीठाने घडवण्याचं फार मोठं कार्य केलं आहे आणि म्हणूनच या ज्ञानपीठ पुरस्काराचं मोल फार मोठं आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मोजमापनाला हवी योग्य एकके

कुठल्याही प्रकारचे मोजणे ही गणिताची सुरुवात आहे. मोजण्याचे कौशल्य कसे प्रगत झाले असेल? त्यासाठी पहिली पायरी तुलना करण्याची आहे. एकाच वस्तूचे दोन संच असतील तर माणूस त्यातील लहान कुठला, मोठा कुठला हे ओळखायला आधी शिकला असेल. पाच बोरांचा संच दोन बोरांच्या संचापेक्षा मोठा आहे हे लहान मूलदेखील ओळखते. मग चार बोरांचा संच हा दुसऱ्या तशाच चार बोरांच्या संचाएवढा आहे, हे समजले असेल. मग पुढे जाऊन चार बोरे, चार मुले, चार फुले किंवा चार पाने यातील साम्य म्हणजे त्या संचांतील एकास एक संगती हे लक्षात येणे ही जरा अवघड अशी अमूर्त गणिताची पहिली पायरी झाली. बहुधा मिळालेल्या फळांची आपल्या कुटुंबात वाटणी करताना त्याला अशी एकास एक संगती लावून पाहण्याचा फायदा समजला असेल. यातून प्राथमिक संख्याज्ञान चालू झाले असावे. ते सगळ्या प्राचीन संस्कृतींत विकास पावले. याप्रमाणे भिन्न वस्तूंची मोजणी ही संख्याज्ञानाची सुरुवात झाल्यावर या संख्यांचा अभ्यास ही गणिताची सर्वात जुनी शाखा विकास पावू लागली.

आपण संख्यांच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टींचे मापन करीत असतो. दोन बिंदूंच्या मधले अंतर किती ठिकाणी मोजतो पाहा. कुडत्यासाठी माप घेताना खांद्यापासून गुडघ्यापर्यंत अंतर, दोन गावांच्या मधले अंतर अशी अनेक अंतरे आपण विविध एकके वापरून मोजतो. शिवाय जागेचे क्षेत्रफळ मोजताना, कपडे शिवण्यासाठी किती कापड लागेल हे ठरवताना, निराळी एकके वापरावे लागते.

वेळ मोजण्याचा प्रकार वेगळाच. त्यासाठी हवीत घडय़ाळे आणि सेकंद, तास, दिवस, असे एकक. मात्र या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती म्हणजे या सगळ्या मापनांत मोजण्यासाठी वापरलेली एकके वेगवेगळी आहेत. उंची मोजायला किलोग्राम वापरीत नाहीत. आणि वेळ मोजायला मीटर वापरत नाहीत. तर कुठलीही गोष्ट मोजण्यासाठी त्याच प्रकारचा सोयीचा एकक वापरतात.

लांबी मोजण्यासाठी लांबीचा एकक म्हणजे मीटर किंवा सेंटिमीटर, वेळ मोजण्यासाठी सेकंद किंवा तास हे वापरले जातात. म्हणजे त्याच प्रकारच्या प्रमाणित एककाशी तुलना करून मोजणी केली जाते.

डॉ. मंगला नारळीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org