News Flash

कुतूहल – डॉप्लरचा परिणाम

१८७१ साली जर्मनीच्या हर्मान व्होगेलने सूर्याच्या वर्णपटातला हा फरक नोंदवला.

‘डॉप्लरचा परिणाम’ म्हणजे प्रकाशलहरी किंवा ध्वनिलहरींच्या कंपनसंख्येत स्रोताच्या गतीमुळे भासणारा फरक. ताऱ्यांच्या रंगांचे स्पष्टीकरण देण्यासाठी क्रिस्टियान डॉप्लर या ऑस्ट्रियन प्राध्यापकाने १८४२ साली हा सिद्धांत मांडला. डॉप्लरच्या मते, सर्व ताऱ्यांचा मूळ रंग हा पांढरट-पिवळा असायला हवा. ताऱ्यांच्या स्वत:च्या गतीमुळे त्यांच्याकडून येणाऱ्या प्रकाशाच्या कंपनसंख्येत बदल झालेला भासतो आणि तो रंगीत दिसू लागतो.

प्रकाशलहरींची किंवा ध्वनिलहरींची निरीक्षकाने मोजलेली कंपनसंख्या ही स्रोताच्या निरीक्षकापासूनच्या गतीवर अवलंबून असल्याचे प्रतिपादन डॉप्लरने केले. उदाहरणार्थ, एखादे वाहन जेव्हा निरीक्षकापासून दूर जात असते, तेव्हा निरीक्षकाला वाहनावरील भोंग्याच्या आवाजाची कंपनसंख्या ही त्याच्या खऱ्या कंपनसंख्येपेक्षा कमी झालेली भासते. याउलट, हेच वाहन जेव्हा निरीक्षकाच्या दिशेने येत असते, तेव्हा त्याच्यावरील भोंग्याची कंपनसंख्या वाढल्याचे  निरीक्षकाला भासते. प्रकाशाच्या बाबतीतही हेच घडते. आपल्यापासून दूर  जाणारा तारा हा कमी कंपनसंख्येचा प्रकाश उत्सर्जित करत असलेला भासतो; तर आपल्या दिशेने येणारा तारा हा अधिक कंपनसंख्येचा प्रकाश उत्सर्जित करत असलेला भासतो. डॉप्लरच्या मते, कंपनसंख्येतील या बदलामुळेच ताऱ्याला रंग प्राप्त होतात. डॉप्लरने कंपनसंख्येत होणाऱ्या या बदलाचे गणितही मांडले.

डॉप्लरचा परिणाम सिद्ध करण्यासाठी ख्रिस्तोफ बॅलट या डच संशोधकाने १८४५ साली हॉलंडमधील युट्रेश्ट येथे एक प्रयोग केला. त्याने ट्रम्पेट वादकांचे दोन गट केले. त्यातला एक गट रेल्वेस्थानकात थांबला, तर दुसरा गट रेल्वेगाडीत बसला. दोन्ही गट एकच स्वर वाजवत होते. गाडी स्थानकातून ताशी सुमारे ७० किमी वेगाने निघून गेली. स्थानकावर उभ्या असलेल्या बॅलटला, दोन्ही गटांनी वाजवलेल्या स्वरांत डॉप्लरच्या परिणामानुसार अपेक्षित असलेला फरक आढळला. सूर्य स्वत:भोवती फिरत असल्याने; त्याची एक बाजू आपल्या दिशेने येत असते, तर दुसरी बाजू आपल्यापासून दूर जात असते. त्यामुळे सूर्यबिंबाच्या दोन्ही बाजूंकडील वर्णपटांत डॉप्लर परिणामानुसार फरक असायला हवा. १८७१ साली जर्मनीच्या हर्मान व्होगेलने सूर्याच्या वर्णपटातला हा फरक नोंदवला. या पुराव्यामुळे डॉप्लरचा सिद्धांत प्रकाशाच्या बाबतीतही स्वीकारार्ह ठरला. डॉप्लरच्या मूळ सिद्धांतात अनेक त्रुटी आहेत. तरीही या सिद्धांतामुळे वर्णपटावरून ताऱ्यांची किंवा दीर्घिकांची गती ओळखणे शक्य झाल्याने, हा सिद्धांत अल्पकाळातच अतिशय उपयुक्त ठरला.

 डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 4:13 am

Web Title: doppler effect formula zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : बाबा आणि न्युरॉन्स
2 कुतूहल : सूर्यावरचे मूलद्रव्य
3 मेंदूशी मैत्री : लर्निग स्टाइल्स
Just Now!
X