13 July 2020

News Flash

कुतूहल – प्लास्टिकच्या मालाबाबत शंका

प्लास्टिकच्या वस्तू दोन पद्धतीने बनतात. एका पद्धतीला उष्मामृदू (थर्मो प्लास्टिक- गरम केली की मऊ होतात आणि थंड झाली की कठीण होतात,

| May 8, 2014 01:01 am

प्लास्टिकच्या वस्तू दोन पद्धतीने बनतात. एका पद्धतीला उष्मामृदू (थर्मो प्लास्टिक- गरम केली की मऊ होतात आणि थंड झाली की कठीण होतात, तसेच पुन्हा गरम केली की ती मऊ होतात.) म्हणतात तर दुसऱ्याला उष्मादृढ (थर्मोसेटिंग- कायमस्वरूपी कठीण) म्हणतात. उष्मामृदू प्रकारचे प्लास्टिक वारंवार वापरता येते. जुन्या वस्तूंचा भुगा करून तो नवीन पावडरीमध्ये जास्तीत जास्त ५ टक्के वापरला तर चालतो, पण काही लोक ६० ते ७० टक्के जुना माल वापरतात. तर काही १०० टक्के जुना माल वापरतात.
प्लास्टिकच्या वस्तू विकत घेताना त्या जुन्या प्लास्टिकपासून बनवलेल्या नाहीत ना? हे ओळखता यायला हवे. पण ते कसे ओळखणार? प्लास्टिक उद्योगात खूप स्पर्धा वाढत असल्याने कच्चा माल मिळणे मुश्कील होते. अशा वेळी बरेच लोक प्लास्टिकच्या जुन्या वस्तू गोळा करून त्याची पावडर बनवतात व ती नवीन मालाबरोबर मिसळून वस्तू बनवतात. घराघरांतून गोळा केलेल्या जुन्या वस्तूंपासून बनवलेला माल फुटपाथवर विकला जातो. म्हणून वस्तू विकत घेताना त्या फुटपाथवरून विकत घेऊ नयेत. दुकानातून ब्रॅण्डेड माल विकत घ्यावा.
नायलॉन, टेरिलीन आणि रेयॉन हे तीनही मानवनिर्मित धागे आहेत. नायलॉन पॉलिअमाइड या संश्लेषित रेझिनपासून तर, टेरिलीन पॉलिएस्टर या संश्लेषित रेझिनपासून बनवतात. रेयॉन हा पुनर्निर्मित सेल्युलोजचा धागा आहे. मोटारीचे टायर बनवण्यासाठी रेयॉन फार मोठय़ा प्रमाणात वापरतात. प्लास्टिक, सिमेंट आणि रबर इत्यादी माल भरण्यासाठीच्या पिशव्यांसाठी रेयॉनचा उपयोग होतो. टेरिलिन आणि कॉटन यांच्यापासून टेरिकॉटन बनवतात. परदेशात जेथे थंड हवामान असते तेथे टेरिलिन चालू शकते पण भारतासारख्या उष्ण आणि दमट हवामानाच्या देशात नायलॉन आणि टेरिलिनऐवजी टेरिकॉटन अधिक योग्य. कारण टेरिलिन आणि नायलॉन घाम शोषून घेत नाही पण ते काम टेरिकॉटन करते.
टेरिलिन आणि नायलॉन घाम शोषून घेत नसल्याने त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते. नायलॉनच्या कपडय़ाच्या आत सुती कापडाचे अस्तर लावावे. नायलॉनमुळे स्थितिक विद्युत भार निर्माण होतो पण त्यामुळे प्रकृतीला काही धोका नाही.    
अ. पां. देशपांडे, (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – ऋतुसंहार: उन्हाळा
वर्षांऋतूच्या प्रेमात पडून रचलेल्या काव्य आणि पद्यरचना भरपूर आहेत. पाचूच्या, हळदिव्या रंगांची उधळण मन मोहित करते, परंतु कालिदासासारख्या महाकवीला रूक्ष, धूलिग्रस्त ‘प्रचण्डसूर्या’ने परिदग्ध झालेल्या ग्रीष्मामध्ये निसर्गात लपलेलं सौंदर्य आढळतं.
कालिदासांच्या विचक्षण दृष्टीस पडणाऱ्या निसर्गातील ग्रीष्मकालीन करामती ऋतुसंहाराच्या पहिल्या सर्गात अतिशय सुंदरपणे कवीने मांडलेल्या आहेत. कालिदासांना नागरी संस्कृतीमधली भद्र मंडळींच्या प्रासादातील कमनीय बांध्यांच्या ललना दिसतात. अंगांग घर्मबिंदूंनी ओलेचिंब झाल्याने त्या गळ्यातील पुष्पमाला भिरकावून आपली वक्षस्थळे तलम वस्त्राने झाकताना दिसतात. त्यांच्या आसपास वावरणाऱ्या प्रेमिकांच्या मनात प्रीतीभावना उचंबळून येतात. तलम वस्त्राने आभूषित तरुणींचे पाय आळत्याने लालबुंद झालेले असतात. त्यांची कोमल तनू कमरपट्टय़ाने सुशोभित असते. त्या हंसगतीने चालत असताना हळूच राजहंसीप्रमाणे (उन्हाळ्याने) थकून हुंकार देतात.
उन्हाळ्यामधली प्रीतीभावना हळुवारपणे उत्फुल्लित होते. वाळ्याच्या पंख्यामधून झुळझुळणाऱ्या वाऱ्यामुळे आणि चंदनगंधाने विलेपित अंगावरून येणाऱ्या मंद झुळकीमुळे. परंतु, कालिदासांना उन्हाळ्यात फक्त शृंगाररसाचा परिपोष करायचा नसतो. त्यांची नजर अरण्यातल्या विविध पशुपक्ष्यांच्या विकल अवस्थेचा वेध घेते.
 निसर्गामध्ये पशुपक्ष्यांमधील स्वाभाविक वैरभावनेवर उन्हाच्या शुष्कतेचा कसा परिणाम झालाय, त्याचं वर्णन कालिदास रंजकपणे करतात. उन्हाळ्याच्या तडाख्यानं आणि तप्तभूच्या चटक्यानं कावलेला सर्प आपलं तोंड खाली करून वळवळत असतो, कुठे? तर मोराच्या पिसाऱ्याच्या म्हणजे त्याच्याच शत्रूच्या सावलीत! तर अतीव तृष्णेनं व्याकूळ झालेला सिंह धापा टाकत नुसताच पाहत राहतो. त्याची जीभ जबडय़ातून लोंबत असते, आयाळीचे केस थरथरत असतात, पण जवळपास उभ्या असलेल्या हत्तीवर हल्लाही करीत नाहीत. तर तहानेनं तडफडणाऱ्या हत्तींच्या तोंडातून फेस निघत असतो. पाण्याचा शोध घेताना समोरून आलेल्या सिंहाला घाबरण्यालाही ते अतीव उन्हानं विसरून जातात. सूर्याच्या किरणांनी ज्याच्या डोईवरील नागमणी तळपत आहे असा नाग, गरम आहाळा अंगात शोषून घेतो. आपल्या दुभंगलेल्या जिभेच्या साहाय्याने. तो तहानलेला आहे, पण समोरच्या पाणवठय़ावरील बेडकांवर हल्ला करण्याची क्षितीही बाळगत नाहीये. सूर्याचा ताप व स्वत:च्या अंगातील विष यांनीच तो तडफडतो आहे आणि बेडकंही त्याच्या फण्याचा आश्रय घेत आहेत. निष्पर्ण वृक्षावर पक्ष्यांचे थवे म्लानपणे बसलेले आहेत, रानरेडे वेड लागल्यासारखे पाणी शोधत आहेत. लालबुंद फुलाच्या ज्वाळानं- वणव्यानं जमीन जळते आहे.
अशा अनेक श्लोकांतला अत्यंत आवडता श्लोक पुन्हा कालिदासाच्या मर्मग्राही प्रतिभेची ग्वाही देतो.
सितेषु हम्र्येषु निशासु योषितां, सुखप्रसुप्तानि मुखानि चंद्रमा:
विलोक्य नूनं भृशमुत्सुकश्चिरं, निशाक्षये याति हिृयेव पाण्डुताम्
धवलरंगी महालाच्या (चंद्रशाळेत) सुखानं निद्रेचा आस्वाद घेणाऱ्या स्त्रियांच्या मुखकमलाकडे चंद्र रात्रभर आसक्तपणे पाहत राहतो आणि निशान्तसमयी मात्र त्याचा चेहरा (चंद्राचा) शरमेनं फिका पडतो.. उन्हाळा सहन करायला कालिदासाची संगत हवी..
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – महाराष्ट्राच्या मानगुटीचा समंध
त्र्यं. शं. शेजवलकरांनी इतिहासाच्या दुरभिमानाबद्दल १९४० साली म्हटले आहे की – ‘‘महाराष्ट्राला एक जबरदस्त भूत- फार मोठा समंध- बाधत आहे. त्याचें नांव इतिहास. इतिहास माणसाला शहाणा करतो असें बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनवितांना दिसत आहे. जगांतील अनेक आपत्ति आणि अनर्थ इतिहासापासून निर्माण होतांना दिसत आहेत.. सर्व जगाचा, सर्व राष्ट्रांचा, सर्व लोकांचा इतिहास एकसमयावच्छेदेंकरून भस्मसात् होईल तर जगांतील अनेक आपत्ति मुळांतच नष्ट होतील.. पण कोणीच इतिहास जाळण्यास तयार नाहीं! आणि एकाच राष्ट्रानें तो जाळून त्याचा उपयोगहि नाहीं. नि:शस्त्रीकरण हें जसें एका राष्ट्राचें ध्येय होऊं शकणार नाहीं, अहिंसा ही जशी एकाच व्यक्तीनें आचरणांत आणण्यासारखीच नाहीं, तसेंच येथेंहि समजावें.. इतिहास जाळण्यास, दडपण्यास, विकृत करण्यास कोणी तयार नाहीं हें सुद्धां खरें नाहीं. अनेक हुशार डोकेबाज माणसें खरा इतिहास शक्य तेथें जाळून टाकण्यांत- निदान दडपण्यांत, किमान विकृत करण्यांत – गुंतलेलीं- गढलेलीं आहेत. उलटपक्षी इतिहास बनविण्याचे – आपल्या खोलींत बसून गुपचुप मनासारखा बनविण्याचे – कारखाने आज सुरू आहेत. असे कारखाने सुरू आहेत तोंवर नवयुगाची आशा करणें वेडेपणाचें ठरेल.. आज आपल्या महाराष्ट्रांत मराठय़ांचे श्रेष्ठत्व इतिहासानें सिद्ध करूं पाहणाऱ्यांचे अविश्रान्त अविरत प्रयत्न सुरू आहेत.. अशामुळें आज मराठींत पांढऱ्यावर काळें करून लिहिलेल्या इतिहासांपैकी तीनचतुर्थाश भाग एकांगी, अतिशयोक्तिपूर्ण, विपर्यस्त, खोटा आहे असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. याच्यामुळेंच अनर्थाचें बीज रुजत घातलें गेलें आहे.. आणीबाणीच्या प्रसंगीं त्याचें खरें राष्ट्रघातक स्वरूप स्पष्ट निदर्शनास येईल.. या सर्व प्रयत्नांची उत्तरक्रिया झाल्याशिवाय महाराष्ट्राला बरे दिवस दिसण्याची आशा नको! तोंवर इतिहासाच्या क्षीराऐवजीं दुरभिमानाचें काळें कुट्ट नीरच हातीं येणार! तोंवर हा इतिहासाचा समंध बाधतच राहणार! नवयुग पाहिजे असेल तर खरा इतिहास जाणून घ्या. तोच बेकनच्या उक्तीप्रमाणे शहाणपणा शिकवील.’’ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2014 1:01 am

Web Title: doubts about the plastic materials
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 मनमोराचा पिसारा : त्या सहा भावना
2 कुतूहल: सी. टी. स्कॅन
3 कुतूहल: केमोथेरपी
Just Now!
X