14 August 2020

News Flash

कुतूहल : खारफुटी संशोधनाचे जनक..

ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा एक भाग आहे.

जागतिक स्तरावर खारफुटी अभ्यास आणि संशोधनाला मान्यता व गती मिळण्याच्या आधी भारतात यावर एका तरुण संशोधकाने कार्य सुरू केले. साठच्या दशकात वनस्पतीविज्ञानात उच्चशिक्षण घेऊन १९७२ साली पीएच.डी. झालेला हा कर्तबगार व ध्येयवादी युवक पुढच्याच वर्षी एनआयओ अर्थात राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्थेत रुजू झाला. ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा एक भाग आहे. परिषदेच्या तत्कालीन महासंचालकांच्या सांगण्यावरून अज्ञात, भविष्याचा थांग नसलेल्या ‘खारफुटी’सारख्या विषयावर या युवकाने संशोधन सुरू केले. इतकेच नव्हे, तर शंभरहून कमी प्रजातीच्या सर्व गटांतील वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व शरीरविज्ञानदृष्टय़ा ‘मृत’ मानलेल्या या सजीवाला संरक्षण व अपेक्षित प्रतिष्ठा मिळवून देणे हे त्या युवकाच्या आयुष्याचे जणू प्रमुख उद्दिष्टच बनले होते. हे संशोधक म्हणजे-डॉ. अरविंद गजानन उंटवाले!

आपल्या ३५ वर्षांच्या संशोधकीय वाटचालीत डॉ. उंटवाले यांनी ‘समुद्रतण (सीवीड्स) उत्पादन’ यावर एक जागतिक व तीन राष्ट्रीय पेटंट्स मिळवली; देश-विदेशांत खारफुटी संशोधन-संरक्षण विषयात सव्वाशेहून अधिक शोधनिबंध सादर केले; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दलदलीतील या दुर्लक्षित जंगलांचे महत्त्व सामान्य जनतेला पटवून देण्यासाठी, तसेच सर्वाच्या सहभागातून सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी प्रयत्नशील राहिले.

२० देशांतील खारफुटी जंगले अभ्यासण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापन केलेल्या आणि जगातील सर्वोत्कृष्ट अभ्यासकांचा समावेश असलेल्या संशोधन-गटात डॉ. उंटवाले हेदेखील कार्यरत होते. खारफुटीच्या वनस्पतींची जनुकीय जडणघडण अभ्यासून त्यांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन यांचा शास्त्रीय विचार या प्रकल्पातूनच सर्वप्रथम पुढे आला. जागतिक तापमानवाढ व सागरी जलपातळीत होणारी वाढ थोपवण्याचे काम प्रत्यक्षात या वनस्पती करतात, हेदेखील यातून सिद्ध झाले.

मॅनग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडिया (एमएसआय) या संस्थेची स्थापना; गोव्यातील चोराव बेटांवरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याची निर्मिती; मालवण येथील सागरी अभयारण्याची निर्मिती; गोवा, गुजरात व महाराष्ट्रात प्रामुख्याने सातशेहून अधिक हेक्टर क्षेत्रातील खारफुटीची लागवड; ‘खारफुटी रोपवाटिका’ या अत्यंत नावीन्यपूर्ण व खारफुटी संवर्धनासाठी अत्यावश्यक अशा प्रकल्पाची मुहूर्तमेढ व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी; विद्यार्थ्यांमार्फत याविषयीची जनजागृती.. या व अशा अनेक कामांची न संपणारी यादी हे डॉ. उंटवाले यांचे पर्यावरणाला, समाजाला दिलेले अद्वितीय योगदान आहे. ते पाहता, डॉ. उंटवाले यांना दिली गेलेली ‘मॅनग्रोव्ह मॅन ऑफ इंडिया’ ही उपाधी योग्यच ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2020 3:00 am

Web Title: dr arvind untawale mangrove discovery zws 70
Next Stories
1 मनोवेध : देहभान
2 मनोवेध : शरीरात स्मृती
3 कुतूहल : स्टॉकहोम परिषदेने दिलेली तत्त्वे..
Just Now!
X