डॉ. सुधांशु कुमार जैन यांचा जन्म ३० जून १९१६ रोजी अमरोह, उत्तर प्रदेश येथे झाला. लहान गाव असल्याने त्या ठिकाणी शिक्षणाची सोय त्या काळात नव्हती. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. १९४७ साली एम.एस्सी. झाल्यावर त्यांना पहिली नोकरी साहाय्यक प्राध्यापक म्हणून मीरत येथे लागली.

वनस्पतिशास्त्रावरील संशोधनकार्यात त्यांना विशेष आवड असल्याने फार थोडे दिवस त्यांनी शिक्षकी पेशा केला. १९४९-१९५१ दरम्यान प्रशिक्षणार्थी म्हणून भारत सरकारच्या इंडियन बॉटनिकल गाइन, कोलकाता येथे आणि नंतर फॉरेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट डेहराडून येथे काम केले. १९५५-५६ दरम्यान त्यांना नॅशनल बॉटनिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊमध्ये सिस्टिमेटिक बॉटनिस्ट म्हणून काम केले. नंतर इकॉनॉमिक बॉटनिस्ट म्हणून अलाहाबाद येथे काम केले.

फादर एच. सांतापाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पश्चिम घाटातील वनस्पतींवर संशोधन केले. १९६५ साली त्यांच्या याच संशोधनासाठी त्यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली.

डॉ. जैन फ्लोरा ऑफ इंडिया न्यू सीरिज आणि इथनोबॉटनी सोसायटीच्या पत्रिकेचे प्रमुख संपादक होते. १९८४ साली बी.एस.आय.मधून निवृत्त झाल्यावर त्यांनी नॅशनल बॉटनिकल रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये इन्व्हायरन्मेंटल फेलोशिपवर काम केले. १९८६ साली त्यांना इमिरेटस सायन्टिस्ट ऑफ सी.एस.आर.चा सन्मान मिळाला. त्यांच्या इथनोबॉटनीच्या संशोधनकार्याचे फलित म्हणजे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘डिक्शनरी ऑफ इंडियन फोक मेडिसीन अ‍ॅड इथनोबॉटनी’ त्यांच्या या पुस्तकाचा उपयोग हळदीचे पेटंट मिळवताना अमेरिकेच्या कोर्टात करण्यात आला.

डॉ. जैन यांच्या प्रयत्नामुळे इथनोबॉटनी हा संशोधनाचा प्रमुख विषय बनला आहे. या विषयासाठी महत्त्वाच्या संस्था निधी उपलब्ध करून देण्यास उत्सुक असतात. १४ ऑगस्ट १९८५ रोजी त्यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ इथनोबॉटनीची स्थापन केली. त्यांनी भारतातील अंदमान-निकोबार येथे भटकंती केली. डॉ. जैन यांना ‘फादर ऑफ इथनोबॉटनी’ इन इंडिया म्हणतात. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. इकॉनॉमिकल बॉटनिस्ट हा अमेरिकेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. आशिया खंडात असा पुरस्कार सर्वप्रथम मिळवण्याचा मान डॉ. जैन यांना मिळाला.

– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

*********************************************

 

मिलानची कला संस्कृती

चौथ्या शतकातील मिलानचा बिशप अ‍ॅम्ब्रोज हा स्थापत्य आणि नगररचना शास्त्रातील जाणकार होता. त्याच्या काळात सान अम्ब्रोजियो, सान नझारो, सान सिम्पलीसियानो ही चर्च बांधली गेली. आजही ही चर्च मोठय़ा दिमाखात उभी आहेत. इ. स. १३८६ ते १५७७ या काळात बांधले गेलेले मिलान कॅथ्रेडल हे जगातले पाचवे मोठे चर्च समजले जाते. हे कॅथ्रेडल गॉथिक वास्तुकलेतील उत्कृष्ट नमुना समजले जाते. १७७४ साली या चर्चच्या सर्वोच्च शिखरावर कळसाच्या जागी बसविलेला माता मेरीचा सोन्याचा मुलामा दिलेला ब्राँझचा पुतळा हे पुढे मिलानचे ग्रामचिन्ह बनले. या ग्रामचिन्हाचे नाव आहे ‘मेडोन्निना’. पिआत्झा देल डोमो या प्रसिद्ध चौकात असलेल्या मिलान कॅथ्रेडलसभोवती बायबलमधील व्यक्तींचे दोन हजारांहून अधिक संगमरवरी पुतळे बसविलेले आहेत. मिलानमध्ये असलेली म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीज हे मिलानचे वैभव समजले जाते. टिशन, लिओनार्दो द िव्हची, रॅफेल, बोटीचेली या कलाकारांच्या कलाकृतींची या कलादालनात रेलचेल आहे. लिओनार्दो द िव्हचीची सर्वात महत्त्वाची कलाकृती ‘द लास्ट सपर’ मिलानचे चर्च सान्ता मारिया डेल ग्राझीच्या एका िभतीवर आहे. हे चित्र काढण्यासाठी लिओनार्दोने वॅक्स पद्धतीचा अवलंब करून नवीन प्रयोग केला. येथे असलेल्या ३६ आर्ट गॅलरीजपकी रिओ मार्कोनी, गॅलरिआ बिआंकोनी, रिपेटो, फ्रान्सेस्का मिनिनी, गॅलरिआ कार्ला सोत्झानी, व्हिआफारिनी या विशेष महत्त्वाच्या आहेत. येथील अ‍ॅम्ब्रोझियाना पॅलेसमध्ये पेंटिंग्जचे असंख्य नमुने आहेत. अनेक प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींव्यतिरिक्त येथे लिओनार्दो याची हस्तलिखिते येथे जतन करून ठेवली आहेत. ला स्काला हे मिलानमधील सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस म्हणजे नाटय़गृह. १७७८ साली स्थापन झालेले हे नाटय़गृह नुवो रेजिओ या नावाने ओळखले जाई. सहा मजल्यांत ३००० प्रेक्षकांना बसण्याची सोय असलेले हे ऑपेरा हाऊस जगातील अव्वल दर्जाच्या नाटय़गृहांपकी एक आहे. मिलानचे रेल्वे स्टेशनसुद्धा एखाद्या राजवाडय़ापेक्षा कमी नाही. संगमरवरी पुतळे, झुंबरे, कारंजांमुळे सुशोभित झालेली ही जागा नक्की रेल्वे स्टेशन आहे की काय अशी शंका येथे नवख्यांना  येते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com