14 December 2017

News Flash

डॉ. यू. आर. अनंतमूर्ती (१९९४ )

डॉ. अनंतमूर्ती हे आधुनिक कन्नड साहित्यातील एक तडफदार व्यक्तिमत्त्व.

लोकसत्ता टीम | Updated: August 8, 2017 2:15 AM

१९९४ चा ज्ञानपीठ पुरस्कार कन्नडमधील उत्कृष्ट कथा, कादंबरीकार डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांना भारतीय साहित्यातील १९७४-९३ या कालावधीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.

डॉ. अनंतमूर्ती हे आधुनिक कन्नड साहित्यातील एक तडफदार व्यक्तिमत्त्व. कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध लेखन, समीक्षा अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या ‘संस्कार’ या एकाच कादंबरीने सर्वत्र खळबळ माजवून टाकली. परंपरेच्या शृंखलेत बद्ध झालेल्या दाक्षिणात्य समाजाचे या कादंबरीद्वारे एक स्फोटक आणि स्वतंत्र विचारांना आवाहन करणारे अद्भुत दर्शन घडवले. या कादंबरीचे अनेक भारतीय भाषांत तसेच इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, बल्गेरियन इ. भाषांत अनुवाद झाले आहेत. पट्टाभी रमा रेड्डी यांनी ‘संस्कार’ कादंबरीवर चित्रपटही तयार केला.

डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ मध्ये कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील मेलिगे या छोटय़ाशा गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण या गावातील संस्कृत पाठशाळेमध्ये पारंपरिक पद्धतीने झाले. म्हैसूर विद्यापीठात इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासात एम.ए.ला ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. नंतर १९६६ मध्ये बर्मिगहॅम विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांच्या मनावर गांधीवाद व समाजवादाचा मोठाच ठसा उमटला. समाजसुधारणेसाठी राजकीय चळवळीचा उपयोग केला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांचा राजकारणातही सक्रिय सहभाग होता. ते डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. इंग्लिश वाङ्मय आणि तौलनिक अभ्यास असे त्यांचे अध्ययन – अध्यापनाचे विषय होते. म्हैसूर विद्यापीठात काही वर्षे त्यांनी ध्यापन केले. त्यानंतर केरळमधील कोट्टायमच्या महात्मा गांधी विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. १९७४ मध्ये आयोवा विद्यापीठात निमंत्रित प्राध्यापक म्हणून काम केले. केंद्रीय साहित्य अकादमी  व नॅशनल बुक ट्रस्टचे ते काही काळ अध्यक्ष होते. पुण्यातील चित्रवाणी-चित्रपट संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. ‘रुजूवातु’ या कन्नड वाङ्मयीन त्रमासिकाचे संपादन त्यांनी केले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

प्रकाशाच्या रंगांचे मापन

प्रारण म्हणजे किरण. मग ती जम्बुपार (अल्ट्रा-व्हायोलेट) किरण असोत, दृश्य प्रकाशाची असोत अथवा अवरक्त (इन्फ्रारेड, उष्णतेची) असोत. ह्य़ा सगळ्या किरणांशी तर आपण परिचित आहोतच. ह्य़ा किरणांत असते वस्तूच्या रंगरूपाबाबतची माहिती आणि सोबतच असते प्रखर ऊर्जा. ह्य़ा सगळ्यांचे स्वरूप असते विद्युत-चुंबकीय लहरींचे. स्रोत, बहुधा असतो सूर्य. अर्थातच चंद्र, तारे व अन्य अवकाशीय वस्तूही आपल्याला प्रारण पाठवतच असतात.

हल्ली आपण वैद्यकीय उपयोगांमुळे क्ष-किरणांनाही चांगलेच ओळखतो. ती तर आणखीनच प्रखर असतात. मनुष्याच्या शरीरामध्ये ती केवळ हाडांनीच अडतात.

स्रोतापासून ते लक्ष्यापर्यंत प्रकाशकिरण ऊर्जेच्या स्वरूपात प्रवास करतात. ही ऊर्जा आकृतीत दिल्यानुसार विद्युतचुंबकीय स्पंदनांत नाचत नाचत येत असते. किरणांच्या दिशेने प्रवास करीत, ही ऊर्जा जेव्हा लक्ष्यास भिडते तेव्हा, लक्ष्याची ऊर्जा वाढते आणि किरण लक्ष्यातच विसर्जति होऊन जातात. वाढत्या ऊर्जेमुळे लक्ष्यच मग स्पंदू लागते. त्यातून त्या वस्तूच्या स्वभावाला अनुसरून, नवी किरणे बाहेर पडतात. ती जर आपल्या डोळ्यांत शिरली, तर त्यांनी आणलेल्या ऊर्जेवरून, आपल्याला लक्ष्याच्या रंगाचा बोध होतो. अशा रीतीने रंग कळतो खरा. मात्र तो मोजता कसा येईल?

किरणांतील ऊर्जा विद्युत चुंबकीय स्पंदनांच्या स्वरूपात अभिव्यक्त होत असते. प्रकाशाच्या वाटेवर उभे राहून आपण तो संवेदू लागलो, तर ह्य़ा स्पंदनांचा आवर्तकाल मोजून आपल्याला त्या प्रकाशात असलेल्या ऊर्जेचा म्हणजेच त्याच्या रंगाचा बोध होत असतो.  प्रकाशाच्या वाटेवर आपण एकाच जागी, त्याकडे पाहत उभे राहिलो तर तिथे असे जाणवते की, त्या किरणापायी त्या ठिकाणी विद्युत चुंबकीय स्पंद अनुभवास येतात. त्यांचा आवर्तकाल मोजायचा. त्या आवर्तकालाचा व्यस्तांक म्हणजे त्या किरणाची कंप्रता किंवा वारंवारता. ही स्पंद/ सेकंद ह्य़ा एककांत मोजली जाते. ५२६ ते ६०६ हजार-अब्ज  स्पंद/सेकंद ह्य़ा दरम्यानच्या कंप्रता असलेल्या प्रकाशाचा रंग, कंप्रता संख्येनुरूप विविध रंगछटांचा असतो.

नरेन्द्र गोळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on August 8, 2017 2:15 am

Web Title: dr u r ananthamurthy writer