12 August 2020

News Flash

कुतूहल : निर्जल धुलाई (ड्राय क्लीिनग)

रेशमी कपडे, लोकरीचे उबदार कपडे किंवा सिंथेटिक कपडे आपण घरी न धुता आवर्जून लॉन्ड्रीत ‘निर्जल धुलाई’ म्हणजेच ‘ड्राय क्लीिनग’ला देतो.

| June 3, 2014 12:21 pm

रेशमी कपडे, लोकरीचे उबदार कपडे किंवा सिंथेटिक कपडे आपण घरी न धुता आवर्जून लॉन्ड्रीत ‘निर्जल धुलाई’ म्हणजेच ‘ड्राय क्लीिनग’ला देतो. नेहमीच्या धुलाईमध्ये पाणी आणि साबण वापरला जातो. साबणामुळे रेशमी किंवा लोकरीच्या कपडय़ांचे धागे कमकुवत होऊ शकतात. यासाठी निर्जल धुलाईचा पर्याय निवडला जातो. निर्जल धुलाई म्हणजे पाण्याशिवाय धुलाई.
निर्जल धुलाई या पद्धतीचा शोध म्हणजे एक छोटासा अपघातच होता. एकोणिसाव्या शतकात फ्रान्समधील जीन बाप्टिस्टे जॉली याला त्याच्या मळलेल्या टेबलक्लॉथवर मध्येच एक स्वच्छ भाग दिसला. त्या भागावर त्याच्या नोकराच्या हातून दिव्यातील केरोसिन पडले होते. रंजक द्रव्यासंबंधित काम करीत असलेल्या जॉलीला काय झाले ते कळले आणि त्याने निर्जल धुलाईची पद्धत विकसित केली. या पद्धतीमध्ये पाणी न वापरता पेट्रोलियम पदार्थाचा वापर केला जातो. अगदी सुरुवातीला निर्जल धुलाईसाठी गॅसोलीन, केरोसिन, नॅप्थासारखे ज्वालाग्राही विद्रावक वापरले जात होते. हे कार्बनिक विद्रावक स्वस्त होते, पण ज्वालाग्राही असल्यामुळे त्यांना पर्याय शोधण्यात आले. याऐवजी आता क्लोरीनचा समावेश असलेल्या हायड्रोकार्बन विद्रावकांचा वापर केला जातो. उदा. कार्बन टेट्राक्लोराइड, ट्रायक्लोरोएथिलीन, परक्लोरोएथिलीन इत्यादी. हे विद्रावक बाष्पनशील असतात. त्यामुळे ते कपडय़ावर तसेच राहत नाहीत आणि कपडय़ांना रसायनांचा वास येत नाही.
अमेरिकेत खनिज तेलापासून मिळणाऱ्या विद्रावकांचा, तर जगात इतरत्र ट्रायक्लोरोएथिलीनसारख्या कार्बनी विद्रावकाचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात असे. कार्बन टेट्राक्लोराइडमुळे चेतासंस्था, यकृत, वृक्क या अवयवांना हानी पोहोचते. त्यामुळे आता कार्बन टेट्राक्लोराइडचा निर्जल धुलाईसाठी उपयोग केला जात नाही. सर्वसाधारणपणे निर्जल धुलाईच्या प्रक्रियेमध्ये मळकट कपडे यंत्रातील विद्रावकात बुडवितात. त्यामुळे कपडय़ातील तेल व तेलकट मळ बाहेर पडतो. कपडय़ातील हा सर्व मळ विद्रावकाच्या सतत सान्निध्यामुळे त्यात उतरतो व बाहेर फेकला जातो. यानंतर केंद्रोत्सारण क्रियेने कपडय़ातील विद्रावक बाहेर काढतात. यातूनही उरलेला विद्रावक कपडे गरम भांडय़ात ठेवून काढून टाकतात.
अनघा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई ss  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा : इब्सेनची नोरा
१८७९ साली ‘अ डॉल्स हाऊस’ नावाचं नाटक लिहिणाऱ्या इब्सेनला कदाचित कल्पना नसेल की २००६ साली युनेस्को या नाटकाला ‘सर्वाधिक प्रयोग झालेलं नाटक’ म्हणून जगन्मान्यता देईल. याचं कारण डॉल्स हाऊसमधल्या ‘नोरा’नं बेर्गेनमधल्या (नॉर्वे) घराबाहेर पडताना जोरात आपटलेल्या दरवाजाचे पडसाद शतकभर युरोप-अमेरिकेत उमटत राहिले.
डॉल्स हाऊसमधली ‘नोरा’ ही व्यक्तिरेखा स्त्री हक्काचं प्रतीक म्हणून जगभर ओळखली जाते. इब्सेनला नोरामधली फक्त स्त्री दिसली नाही तर स्वत:चा शोध घेणारा, आत्मसन्मानाची चाड बाळगणारा, ताठ मनाचा माणूस दिसला. ‘नोरा’ ही अशा रीतीनं माणूसपणाची आयकॉन असली तरी नाटकामधील तिची गोष्ट, घुसमट आणि फसवणूक मात्र ‘स्त्री’ म्हणून होते.
डॉल्स हाऊस हे नाटक ठसठशीत व्यक्तिरेखा आणि रंजक प्लॉट म्हणून आकर्षक वाटतं. नॉर्वेमधील मध्यमवर्गीय गृहिणी- ३ मुलांची आई प्रथम बालीशच वाटते. ख्रिसमसची खरेदी, मुलांची देखभाल, नवऱ्याला हवं नको बघणारी नोरा वाटते तितकी थिल्लर नसते. नवऱ्याच्या आजारपणात पैसे संपल्यावर वडिलांची खोटी सही करून बँकेतून पैसे काढते आणि याच धाडसामुळे अडचणीत येते आणि बँकेतल्या त्या व्यक्तीकडून पैशाकरिता वेठीस धरल्याने जेरीस आलेली असते.
पुढे नवऱ्याकडे हे बिंग फुटायच्या वेळी त्याच्यावर बालंट येऊन, त्याच्या इभ्रतीखातर आत्महत्याही करायला तयार होते. आपलं स्वत्त्व देऊन नवऱ्याची मर्जी सांभाळते, नवऱ्याला त्याची कदर नसते. तो तिला कायमच बाव्हलीसारखी वापरतो. पुढे तिचा अपराध उघडकीला आल्यावरही तिच्या नि:स्वार्थीपणाची तो बूज राखत नाही. तिला झिडकारतो. धिक्कार करतो. नवऱ्याच्या अशा वृत्तीने नोरा हतबुद्ध होते. पुरुषी वृत्तीमधून येणाऱ्या दमनाची तिला खात्री पटते आणि त्याच वेळी तिला ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला उपरती होते आणि तो सहीचा कागद फाडून टाकला जातो. नोरावरचं हे बालंट टळल्यावर तिचा नवरा फिरतो आणि तिला आपलंसं करतो.
नोराला त्याचा खोटेपणा उघडकीला येतो. शेवटच्या स्वगतामध्ये नोराला स्वत्त्वाची जाणीव होते. आतापर्यंतचं आपलं आयुष्य वडिलांना केंद्रभागी ठेवून घडलं. मी एक नटवी बाहुली म्हणून वाढत होते, बाहुलीला स्वत:चा चॉइस नसतो. फक्त परस्वाधीन जीवन जगावं लागतं. विवाहानंतर नवऱ्याभोवती फेर धरून मी नाचले, त्यानं मला पिंजऱ्यातली मैना केली, कळसूत्री खेळणं करून टाकलं माझं. ज्या हिरिरीने मी कुटुंबाला वाहून घेतलं त्याची कदर ना नवऱ्यानं केली ना समाजानं. या खुशाल, आनंदी मुखवटय़ामागे माझा खरा चेहरा मलाच आता ओळखता येत नाहीये..
असं म्हणून नोरा नवरा आणि मुलांना सोडून घराबाहेर पडते आणि जाताना मागे वळून न बघता दरवाजा आपटते.
नवऱ्याच्या खोटेपणाचा उबग येऊन, ती जाते. ‘जाऊ नकोस’ असं म्हणणाऱ्या नवऱ्याला कदाचित अद्भुत चमत्कार घडला तरच पुरुषाला स्त्री समजू शकेल हे तिचे अखेरचे उद्गार किंचित आशावादीदेखील!!
हा शेवट पचनी पडणं युरोपला कठीण गेलं. काही ठिकाणी तो बदलूनही घेतला. इब्सेनची नोरा हे मनाला गुंगवणारं कोडं आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाला उंची आहे, खोली आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ मात्र चमत्कारावर अवलंबून आहे. नोराची ही तगमग, निराशा आणि तडफडणारा संताप माणूस म्हणूनही पटतो.. नोरानं मात्र खूप स्त्रियांना धीर दिलाय केवळ तिच्या असण्यानं..
डॉ.राजेंद्र बर्वे –    drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व : नरोटीच्या उपासनेची परमसीमा
‘‘जिवंत तत्त्वाला जडरूप देऊन त्याचीच उपासना करीत बसावयाचे, आणि अशा रीतीने त्याचा मूलहेतू विफल करून टाकावयाचा या मानवाच्या वृत्तीमुळेच जगात आजपर्यंत अनेक थोर महात्मे जददुद्वाराच्या प्रयत्नात खर्ची पडूनही जग आहे तेथेच आहे. बुद्धाची अहिंसा, जीजसची दया, महात्माजींचे सत्य या प्रत्येकाची मानवाने अशी दशा करून टाकली आहे. आज जेथे मार्क्‍सवाद नाही तेथे लोकशाहीची उपासना चालू आहे. पण तेथेही पद्धत हीच आहे; बाह्य़रूपाविषयी माणसे पराकाष्ठेची दक्षता दाखवितात. अंतरात्म्याची त्यांना काळजी नसते. इतकेच नव्हे तर त्यांना त्यांची दखलही नसते. जड सांगाडा म्हणजे लोकशाही अशी त्यांची श्रद्धा असते. निवडणुका, मतदान, लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पॉइंट ऑफ ऑर्डर, कोरम, सभासदांचे हक्क, मतमोजणी, यांविषयी लोक जसे दक्ष असतात तसे सर्व राष्ट्राची जबाबदारी प्रत्येकाने घेणे, समाजहितासाठी अंग झिजविणे, आपणच केलेल्या कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक कारभार निर्मळ राखणे, बुद्धिवादाची जोपासना करणे, प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करणे- इत्यादींविषयी मुळीच नसतात.’’ नोव्हेंबर १९५३ रोजी ‘नरोटीची उपासना’ या लेखात पु. ग. सहस्त्रबुद्धे लिहितात – ‘‘जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मनुष्याच्या या वृत्तीचा प्रत्यय आपणास येतो. सध्याच्या शिक्षणशास्त्राच्या व्यवहारात तर तिचा कळस झालेला दृष्टीस पडतो. अमुक एका पद्धतीनेच पाठ घेतला पाहिजे असा आग्रह या क्षेत्रात असतो. तो इतका की अर्थ न कळला तरी चालेल, विषय न समजला तरी चालेल, पण पद्धत अवलंबिली गेलीच पाहिजे अशी उत्तरे तज्ज्ञ म्हणविल्या जाणाऱ्या शिक्षकांनी दिलेली मी ऐकली आहेत. हा रानटीपणाचा कळस आहे, आणि या रानटीपणावर शिक्कामोर्तब झालेले आहे.. याचा अर्थ असा की अध्यापन ही एक कसरत झाली आहे. ही कर्मकांडातील प्रक्रिया झाली आहे.. निश्चित ज्ञान, जिज्ञासा, चारित्र्य, कर्तृत्व हा जो आत्मा तो बुद्धिपुरस्सर दुर्लक्षिला जावा ही नरोटीच्या उपासनेची अगदी परमसीमा होय.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2014 12:21 pm

Web Title: dry cleaning
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल: कपडय़ांवरील डाग काढण्यासाठीची रसायने
2 कुतूहल: शॉवरजेल आणि बबलबाथ
3 कुतूहल: गोरं करणारा साबण
Just Now!
X