20 January 2019

News Flash

जे आले ते रमले.. : दुआत्रेचं मल्याळी साहित्य

एखादी भारतीय भाषा प्रचलित पद्धतीने संभाषण करणारा दुआत्रे हा पहिला पाश्चिमात्य.

वास्को-दी-गामाच्या पहिल्या सागरी मोहिमेनंतर पोर्तुगालच्या राजाने भारताच्या आणखी सागरी मोहिमा काढल्या. त्यापैकी तिसऱ्या मोहिमेतून दुआत्रे बारबोसा हा पोर्तुगीज तरुण १५०० साली भारतात आला. त्याने सतरा वर्ष पोर्तुगीजांच्या कोचीन येथील वखारीत कारकुनाची नोकरी केली. या काळात दुआत्रे मल्याळम् भाषेत बोलायला, लिहायला शिकला. एखादी भारतीय भाषा प्रचलित पद्धतीने संभाषण करणारा दुआत्रे हा पहिला पाश्चिमात्य. पोर्तुगालच्या राजाची पोर्तुगीज भाषेत कोचीन आणि कन्नानूरच्या राजासाठी आलेली पत्रं दुआत्रे मल्याळम्मध्ये भाषांतर करून देत असे. पोर्तुगीजांचा केरळमधील गव्हर्नर फ्रान्सिस्को डी अल्बूकर्क याला एकदा कन्नानूरच्या राजाची भेट घ्यायची होती. त्या वेळी दुआत्रेने दुभाषांचे काम उत्तमरीत्या केल्यामुळे गव्हर्नरने दुआत्रेला पोर्तुगीजांचा दुभाषा म्हणूनच नियुक्त केलं.

दुआत्रेने त्याच्या केरळ, गुजरात आणि विजयनगर येथील वास्तव्यात या प्रदेशांमधील सामाजिक परिस्थिती, व्यापार आणि राजकीय घडामोडींबद्दल माहिती देणारं मल्याळम् भाषेत पुस्तक लिहिलंय. पोर्तुगीज लोक त्या काळी विजयनगर साम्राज्याचा उल्लेख किंगडम ऑफ नरसिंहा असा करीत. त्याच्या पुस्तकात विजयनगरच्या साम्राज्यातील संपन्नता आणि मोठय़ा इमारतींचं वर्णन आहे तसंच भटखल बंदरातून चालणाऱ्या मोठय़ा व्यापाराचं वर्णन आहे. त्या गजबजलेल्या बंदरातून लोखंड, मसाल्याचे पदार्थ, औषधं निर्यात होई तर घोडय़ांची आयात होई असंही वर्णन त्यात आहे. गुजराती लोकांची आणि जैनधर्मीय लोकांच्या जीवनशैलीबाबतही दुआत्रेने बरंच लिहिलं आहे. युरोपियन भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाल्यावर साधारणत: इ.स. १६०० नंतर डच, इंग्रज, फ्रेंच यात्रींची वाढ होऊन दक्षिण भारताची व्यापार वृद्धीही झाली.

दुआत्रे बारबोसानंतर सन १५२० मध्ये भारतात आलेला पोर्तुगीज प्रवासी दुिमगुश पाइश बावीस वर्ष दक्षिण भारतात राहून त्याने मल्याळम् भाषेचा अभ्यास केला. त्यानेही मल्याळी लोकांची जीवनशैली स्वीकारून विजयनगर राज्यामधल्या घडामोडींबद्दल बरंच लिहून ठेवलं आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on February 13, 2018 2:04 am

Web Title: duarte malayalam literature