21 November 2019

News Flash

डिस्लेक्सिया

डिस्लेक्सिया ही एक वाचनाशी संबंधित समस्या आहे.

डिस्लेक्सिया ही एक वाचनाशी संबंधित समस्या आहे. ज्या मुलांना वाचनात अडथळे आहेत, अशा अनेक मुलांचा अभ्यास केला तेव्हा त्यातले पॅटर्न्‍स लक्षात आले आणि डिस्लेक्सिया या समस्येचा शोध लागला. यावर अनेक संशोधनं झाली. तेव्हा असं लक्षात आलं की ज्यांना अशी समस्या आहे त्यांच्या नजरेसमोर अक्षरं स्थिर होऊ शकत नाहीत. ती नाचल्यासारखी वाटतात. लहानपणी आरशात अक्षरं बघणं हा एक मजेदार छंद असतो. ही अक्षरं आरशात बघतो, तेव्हा ती आपल्याला उलटी दिसतात. मग उलटी अक्षरं काढण्याचा आणि ती अक्षरं आरशात बघून सुलट वाचण्याचा खेळच सुरू होतो. हे जे इतर मुलं गंमत म्हणून करतात, नेमकी तीच समस्या असते डिस्लेक्सिक मुलांची. त्यांना अक्षरं उलटीच दिसतात. आणि म्हणूनच ती मुलं अक्षरं काढतातही उलटीच.

एमन मॅक्ररी, कॅथी प्राईस या संशोधकांनी प्रयोग केले. तेव्हा डिस्लेक्सिक मुलांच्यामध्ये असलेल्या या शैक्षणिक समस्यांचा संबंध मेंदूच्या डाव्या भागातल्या विशिष्ट क्षेत्रांशी असतो, असं लक्षात आलं. डाव्या भागात वाचन आणि बोलण्याची केंद्रं असतात, त्या भागात समस्या असतात.

इंग्लंड, फ्रान्स आणि इटली या देशांमध्ये हे प्रयोग करण्यात आले. या तीनही भाषा वाचताना मेंदूत काय घडलं हे संशोधकांनी बघितलं. सामान्य मुलं वाचन करतात तेव्हा त्यांच्या डाव्या मेंदूतली तीन क्षेत्रं एकमेकांशी जोडून घेऊन काम करत असतात, असं त्यांना दिसलं. मात्र डिस्लेक्सिक मुलं वाचन करत असताना केवळ दोनच क्षेत्रं काम करत असतात. तर तिसरा म्हणजेच या दोघांना जोडणारा भाग मात्र काम करत नसतो, असं नेमकेपणानं लक्षात आलं. तीनही भाषांच्या वाचनाच्या बाबतीत हेच घडलं.

या मुलांना वाचता येत नाही, याचं कारण मेंदूमध्ये आहे याची खात्री पटल्यावर संशोधकांनी पुढचे प्रयोग केले ते या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी. एखादी वस्तू आणि तिचं नाव सतत सांगितलं, सतत लिहून दाखवलं तर मुलांना ते हळूहळू लक्षात राहतं. पुन्हा पुन्हा ते शब्द लिहिले तर लिहायला जमू शकतं. मेंदूच्या डाव्या भागातल्या भाषेच्या केंद्रांना चालना मिळावी असे प्रयत्न सातत्यानं केले तर ही मुलं इतर मुलांसारखीच नीट वाचू-लिहू शकतात हे लक्षात आलं.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on July 3, 2019 12:07 am

Web Title: dyslexia mpg 94
Just Now!
X