डिस्प्रोझिअम हा चमकदार, मृदू, चंदेरी रंगाचा धातू असून त्याच्यावर सामान्य तापमानाला हवेचा परिणाम होत नाही. थंड पाण्यात तो संथगतीने क्रियाशील होतो व आम्लात तत्परतेने विरघळतो. डिस्प्रोझिअमचा चुरा हाताळताना विशेष काळजी घेण्याची गरज असते, कारण ठिणगीशी संपर्क होताच तो पेट घेऊ  शकतो. सामान्यत: आग विझवताना आपण पाण्याचा वापर करतो, पण ही आग पाण्याने विझत नाही. डिस्प्रोझिअमपासून अनेकरंगी क्षार तयार होतात. डिस्प्रोझिअमचे क्षार पाण्यात विरघळतात आणि ते सौम्य प्रमाणात विषारी आहेत. डिस्प्रोझिअम व त्याच्या संयुगांच्या औष्णिक, चुंबकीय व प्रकाशीय गुणधर्मामुळे त्यांचा उपयोग उच्च तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या अनेक वस्तूत दिसून येतो.

लँथनाइड श्रेणीतील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरुपणात बाह्य़ कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची संख्या सारखी असल्यामुळे भौतिक व रासायनिक गुणधर्म समान असले तरी प्रत्येक मूलद्रव्यात आतल्या स्तरातील 4ऋ कक्षेत वाढत जाणाऱ्या एकेका इलेक्ट्रॉनमुळे आजूबाजूची मूलद्रव्ये चुंबकीय गुणधर्मात वैविध्य दाखवतात. अत्यल्प प्रमाणात मिसळलेले डिस्प्रोझिअम धातूच्या गुणधर्मात बदल घडवून आणतो. या वैशिष्टय़ामुळे डिस्प्रोझिअम मुखत्वे मिश्रधातू करण्यासाठी वापरतात. अनेक विद्युत व इलेक्ट्रॉनिक  उपकरणे, डेटा साठवणाऱ्या कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये डिस्प्रोझिअम मिश्रधातू स्वरूपात वापरतात.

मक्र्युरी व्हेपर दिव्यातील प्रकाशीय गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच लेझर किरण, इन्फ्रारेड किरण निर्माण करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो. न्यूट्रॉनला शोषून घेण्याची डिस्प्रोझिअमची क्षमता व दीर्घकाळ न्यूट्रॉन्सचा मारा सोसूनसुद्धा आकारमानात प्रसरण अथवा आकुंचन न होण्याच्या वैशिष्टय़ामुळे डिस्प्रोझिअम ऑक्साइड व निकेल यांच्या मिश्रधातूचा वापर परमाणू भट्टीच्या नियंत्रण कांबीत करतात.

उच्च तापमानाला चुंबकीय गुणधर्मात फरक पडू न देण्याच्या याच्या वैशिष्टय़ामुळे याचा उपयोग मोटार व जनरेटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या चुंबकात केला जातो. विद्युत वाहने व पवन टर्बाइनमध्ये अशा चुंबकाची गरज असल्यामुळे दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे.

डिस्प्रोझिअम १६५ वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी असण्याची शक्यता असल्याने त्यावर संशोधन चालू आहे. खराब झालेल्या सांध्यांच्या उपचारात पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा डिस्प्रोझिअम १६५ जास्त परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org