समजा, तुम्ही एखाद्याला त्याचं वय विचारलंत तर तो ते पटकन सांगू शकेल. फार-फार तर ती व्यक्ती तुम्हाला तिची जन्मतारीख सांगून आजमितीला तिचं वय काय आहे हे गणित करायला मोकळं सोडेल. पण तेच एखाद्या खडकाला त्याचं वय विचारलंत तर तो ते सांगेल का? तुम्ही नाहीच म्हणाल. ते खरंही आहे. तो खडक नाही सांगणार. पण त्या खडकातलं शिसं मात्र तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल.

युरेनियमपासून जी किरणोत्सर्गी शृंखला तयार होते ती शिशाजवळ येऊन थांबते. थोडक्यात युरेनियमचा क्षय होत, मधल्या सगळ्या मूलद्रव्यांचाही क्षय होत, शिसं मात्र साठत जातं. युरेनियम काय किंवा अधलेमधले इतर किरणोत्सर्गी एकस्थ काय, प्रत्येकाचा क्षय होण्याचा वेग निश्चित असतो. त्यामुळं त्यांच्या त्या खडकातल्या मूळ साठय़ाची जी मात्रा असते ती निम्म्यावर येण्यासाठी किती काळ लागेल हे नेमकेपणानं सांगता येतं. यालाच त्या मूलद्रव्याचं ‘हाफ लाइफ’ किंवा अर्धायू म्हणतात. अर्थात मूळ युरेनियमचं सगळ्या पायऱ्या उतरत शिशात रूपांतर होण्यासाठी किती काळ लागेल, याचं गणितही करता येतं.

कोणत्याही क्षणी युरेनियम आणि शिसं यांच्या मात्रेचं एकमेकांशी किती गुणोत्तर आहे, हे मोजलं की मग ते नातं प्रस्थापित होण्यासाठी किती काळ लोटावा लागला, हे समजतं. खडकाचा जन्म झाल्यापासून युरेनियमच्या क्षयाची मालिका सुरू झाली. त्या क्षणी शिशाचा मात्र पत्ता नव्हता. तेव्हा त्या मालिकेतून शिशाचा साठा वाढायला जेवढा काळ लागला तेच त्या खडकाचं वय नाही का झालं?

युरेनियमचे-२३५ आणि २३८ अणुभाराचे दोन किरणोत्सर्गी एकस्थ आहेत. दोन्ही शेवटी शिशात रूपांतरित होतात, पण वेगवेगळ्या मार्गानं. युरेनियम-२३८ चं रूपांतर शिसे-२०६ मध्ये होण्यासाठी साडेचार अब्ज वर्ष लागतात. तर युरेनियम-२३५ हे शिसे-२०७ मध्ये पोहोचेपर्यंत एकाहत्तर कोटी वर्ष उलटतात. या दोन्हींचा मेळ घालणारं गणित केलं की खडकाचं वय सांगता येतं.

ज्या वेळी आपल्या धरतीचा तप्त गोळा थंड होत आजच्या या घन-रूपातील लाडक्या वसुंधरेचा जन्म झाला त्याच वेळी ते खडकही उदय पावले. अर्थात त्यांचं जे वय तेच आपल्या पृथ्वीचंही वय. आणि ते आपल्याला अचूकपणे सांगायला कोण मदत करतं?  शिसेगुरुजींशिवाय दुसरं कोण!

– डॉ. बाळ फोंडके मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org