‘सर्व शास्त्रांमध्ये उच्चपद भूषविते ते गणितशास्त्र’ असे एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे. त्याचे कारण हेच असावे की दैनंदिन जीवनात व विविध शास्त्रांच्या अभ्यासात गणिताचे अनन्यसाधारण महत्त्व! आज आपण अर्थशास्त्र आणि गणित यांमधील संबंध पाहू. पूर्वी अर्थशास्त्रातील संकल्पना सहसा अतिशय क्लिष्ट व शब्दजंजाळ भाषेत मांडल्या जात. त्यामुळे त्या सर्वसामान्यांना समजण्यास अवघड असत. परंतु विसाव्या शतकाच्या पूर्वार्धानंतर अर्थशास्त्रात गणिती मांडणीचा आणि पद्धतींचा वापर अधिक होऊ लागला व गणितशास्त्राच्या नेमकेपणामुळे अर्थशास्त्रीय संकल्पना समजणे सोपे झाले.

समजा, ‘य’ ही राशी ‘क्ष’ या राशीवर अवलंबून असेल तर तिला गणिती भाषेत ‘क्ष’चे फल (फंक्शन)असे म्हणतात. अर्थशास्त्रात वस्तूंची तसेच सेवांची मागणी ही पुरवठा, खर्च, महसूल, नफा, बचत तसेच त्यांचे दर आणि निर्मितीप्रक्रियेतील निरनिराळे घटक यांवर अवलंबून असते. म्हणजेच त्यांना विविध गणिती फलांनी दाखवणे, आलेख काढणे शक्य असते. फलांची गुणवैशिष्ट्ये त्या आलेखांवरून स्पष्ट होतात. त्यांच्यातील संबंध रेषीय (लिनिअर) किंवा अरेषीय (नॉन-लिनिअर) समीकरणांनी मांडता येतात. त्याशिवाय गणितातील ‘विकलन’ (डिफरन्सिएशन) प्रक्रियेचा वापर अर्थशास्त्रातील मागणी, महसूल, उत्पादन खर्च यांचे परिवर्तन दर तसेच कमाल नफा, किमान खर्च इत्यादी ठरविण्यासाठी करता येतो. दोन चलांमधील परस्परसंबंध आणि त्यावरून माहीत नसलेल्या चलाच्या किमतीचा अंदाज बांधणे वगैरेंसाठी संख्याशास्त्रातील संकल्पना- जशा की सहसंबंध (कोरिलेशन) आणि समाश्रयण (रिग्रेशन) विश्लेषण उपयोगी ठरतात. त्यावरून पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अनुमान घेऊन उपाययोजना आखता येतात.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

नमूद करण्याची बाब म्हणजे स्पर्धात्मक बाजारपेठेत कोणती व्यावसायिक धोरणे केव्हा आणि कशा प्रकारे राबविल्यास किती नफा वा तोटा होईल याची गणिती प्रारूपे मांडणे यापासून खेळशास्त्र किंवा द्यूतसिद्धान्त (गेम थिअरी) या गणिती चौकट बांधणीची सुरुवात झाली. त्यामुळे व्यापारासाठी आर्थिक धोरणे ठरवणे, व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेणे- अशा कित्येक बाबतींत द्यूतसिद्धान्ताचा वापर केला जातो. अनेक अर्थशास्त्रज्ञांना द्यूतसिद्धान्ताचा लक्षणीय वापर केल्याबद्दल अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे, हे विशेष. तरी गणिताचा आणि संख्याशास्त्राचा वापर अर्थशास्त्राच्या उच्च शिक्षणात, संशोधनात आता अपरिहार्य आहे. सामाजिक शास्त्राच्या इतर शाखांच्या तुलनेत अर्थशास्त्रात गणिताचा उपयोग जास्त प्रमाणात होतो असे निरीक्षण आहे. ‘गणिती अर्थशास्त्र’ या स्वतंत्र शाखेतील तज्ज्ञांना भारतीय रिझर्व्ह  बँकेसारख्या वित्तीय धोरणे ठरवणाऱ्या संस्थांत सतत मागणी असते. तरी विद्याथ्र्यांनी गणित किंवा संख्याशास्त्र यासोबत अर्थशास्त्रात उच्च पदवी घेऊन उज्ज्वल कारकीर्द घडवण्याचा विचार करावा. – प्रा. श्यामला जोशी

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org