काही विशिष्ट रोगांच्या निदानासाठी ‘ईएसआर म्हणजेच ‘एरिथ्रोसाइटसेडिमेंटेशन रेट’ ही रक्ताची चाचणी केली जाते. रोगनिदानासाठी ‘ईएसआर’चाचणी साधारणपणे १९२० च्या सुमारास प्रथम वापरण्यात आल्याचा काही शास्त्रज्ञांचा अंदाज होता. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार ‘ईएसआर’चा शोध १९२० मध्ये नाही तर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीच लागला होता. ही पद्धत शोधून काढण्याचे खरे श्रेय ‘एडमंड फॉस्टिन बिर्नाकी’ या पोलंडमधील शास्त्रज्ञाला जातं.

इ.स. १८६६ साली जन्मलेले बिनार्की हे पोलंडमधील एक ख्यातनाम वैद्यकतज्ज्ञ होते. इ.स. १८९७ मध्ये बिर्नाकी’ यांनी आपल्या शोधाबद्दल माहिती देणारे दोन लेख प्रसिद्ध केले होते. पहिला लेख पोलिश भाषेत ‘गाझेता लेकाष्र्का’ मध्ये आणि दुसरा लेख जर्मन भाषेमधील ‘मेदिझिन्शे वोचेन्सच्रिफ्त’ या वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. हे लेख प्रसिद्ध करण्याआधी वॉरसॉ मेडिकल सोसायटीच्या बठकीत त्यांनी आपल्या ईएसआर विषयीच्या संशोधनाची माहिती आणि निष्कर्ष मांडले होते.

ईएसआर म्हणजे एका कमी व्यासाच्या परीक्षानळीत रक्त घेऊन त्यातल्या लाल रक्तपेशींचा तळाशी बसण्याचा वेग मोजणे. हा ईएसआर रक्तातल्या फायब्रिनोजेनच्या प्रमाणावर अवलंबून असतो आणि व्यक्तीनुसार, तिच्या वयानुसार तो बदलतो. काही विशिष्ट रोगांमध्ये तो वाढतो.

बिर्नाकी यांनी आपल्या लेखांमधून ईएसआरचं वैद्यकीय क्षेत्रातलं महत्त्व पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. १९०६ साली बिर्नाकी यांनी स्वत:च्या ईएसआर काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला होता. त्यांनी याआधी ईएसआर मोजण्यासाठी २० मिमी उंचीच्या नळीचा वापर केला होता. पण ह्य़ा वेळी त्यांनी स्वत: रचना केलेल्या केशनलिकेचा वापर केला. ह्य़ा नळीला त्यांनी ‘मायक्रोसेडिमेंटेटर’ असे संबोधले होते. त्यांनी आपल्या या प्रयोगांमध्ये रक्त गोठू न देणारा द्रव म्हणून सोडियम ऑक्झालेटचा वापर केला होता.  दुर्दैवाने बिर्नाकी यांचा १९११ साली मृत्यू झाला. वयाच्या ४५ व्या वर्षी झालेल्या मृत्यूने त्यांचे हे अत्यंत यशस्वी असणारे संशोधन थांबले. त्यांच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी रॉबर्ट फहारियस या स्वीडिश शास्त्रज्ञाने ईएसआरवर संशोधन केले स्वीडनमधल्याच वेस्टर ग्रेन ह्य़ा शास्त्रज्ञानेदेखील ह्य़ा विषयात अधिक खोलवर संशोधन केले.

– प्रिया लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

अखम्लाक मोहम्मद खान ‘शहरयार’ – उर्दू (२००८)

भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल यशस्वी उर्दू कवी डॉ. शहरयार यांना २००८चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हय़ातील आँवला या गावी एका मुस्लीम रजपूत कुटुंबात १६ जून १९३६ मध्ये जन्मलेले अखलाक मोहम्मद खान ‘शहरयार’ हे बुद्धिवंत कवी मानले जातात. त्यांची कविता कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करीत नाहीत, हे तिचे वैशिष्टय़!

शहरयार यांचे वडील अबू मोहम्मद खान हे पोलीस अधिकारी होते. घरातील वातावरण अतिशय कडक होते.  आपल्याप्रमाणेच मुलाने पोलीस खात्यात काम करावे, अशी वडिलांची इच्छा होती. पण शहरयार यांना लहानपणापासूनच अ‍ॅथलिट व्हावेसे वाटत होते. पोलीस खात्यात जायचे नाही म्हणून त्यांनी घर सोडले, तेव्हा खलील-उर-रहेमान आझमी या प्रख्यात उर्दू कवीचा त्यांना आधार मिळाला.  पुढे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात शिकून एम.ए., पीएच.डी. केली आणि तिथेच उर्दूचे लेक्चरर म्हणून काम सुरू केले.  ‘शेर-ओ-हिकमत’ (कविता आणि तत्त्वज्ञान) या मासिकाचे ते उपसंपादक होते.

१९५५ मध्ये शहरयार यांची पहिली गजल हैदराबाद येथून प्रकाशित होणाऱ्या ‘सबा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. गजल आणि नज्म्म (कविता) या दोन्ही प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. तसेच त्यांची चित्रपटगीतेही विलक्षण गाजली आहेत. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘इस्म-ए-आज़्‍ाम’ १९६५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर एकूण दहा उर्दूतील काव्यसंग्रह, तसेच हिन्दीतील चार काव्यसंग्रह, तीन इंग्रजी अनुवादित संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुशायरात खास मध्यमलयीत काव्यवाचन करणाऱ्या शहरयार यांची प्रवृत्ती शांत, गंभीर होती. पण राजकीय घडामोडींबाबत ते सदैव जागरूक असत. शासनकर्त्यांना जाब विचारण्याचा खंबीरपणाही त्यांच्या कवितेत आहे. तसेच प्रेमाचे रंगही आहेत, पण प्रामुख्याने त्यांची कविता विचारप्रधान आहे. त्यांच्या कवितेतून आधुनिक काळातील माणसाची आध्यात्मिक वेदना आणि मानसिक दु:ख व्यक्त होते आणि मग रोजीरोटीच्या शोधात उत्तर प्रदेशातून आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरची परेशानी, वैताग ‘गमन’ चित्रपटातील शहरयार यांच्या एका गजलेत व्यक्त होते-

‘सीने में जलन, आँखो में तूफान सा क्यूँ है?

इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है?’

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com