25 April 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : वेळमर्यादा!

दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल मुळीच द्यायचा नाही.

(संग्रहित छायाचित्र)

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

‘अमेरिकन अ‍ॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक’ यांनी प्रत्येक वयोगटात किती वेळ मोबाइल हाताळावा, यासाठी वेळमर्यादा आखून दिली आहे. त्यानुसार,

दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल मुळीच द्यायचा नाही.

तीन ते पाच वयाच्या मुलांना एक तासाच्या वर कोणतीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स द्यायची नाहीत.

दहा ते अठरा वर्षांतील मुलांनी केवळ दोन तास वापरला तर हरकत नाही. पण आपल्याला माहितीच आहे की यापेक्षा किती तरी जास्त वेळ मुले मोबाइल हाताळत असतात.

मोठय़ा माणसांनी मोबाइल यापेक्षा थोडा जास्त वेळ हाताळला, त्यावर काही वेळापुरते गेम खेळले तर चालू शकते, असे आढळून आलेले आहे. कारण यामुळे त्यांचे ताणतणाव काहीसे कमी होतात.

काही वेळानंतर सहजपणे मोबाइल बाजूला ठेवून ते आपापल्या कामाला लागू शकतात पण मुलांच्या बाबतीत असे होत नाही. जर त्यांच्या हातून मोबाइल बाजूला करायचा प्रयत्न केला तर मुले खूप चिडचिड करतात. तो बाजूला ठेवायला सांगितल्यावर त्यांना ते जमत नाही. एखादे व्यसन सोडवताना जो त्रास प्रौढांनाही होतो, तीच लक्षणे मोबाइलपासून मुलांना दूर करताना दिसून येतात याचा अर्थ असा की मेंदूने ही सवय घट्टपणे लावून घेतलेली आहे

काही मुलांना मोबाइलची खूप जास्त सवय लागते. याला अनेक मानसिक-भावनिक कारणे असतात. मुलांच्या बाबतीत बोलायचे तर परीक्षेत मिळालेले कमी गुण, सतत आलेले अपयश, आई-बाबांची फार बोलणी खाणे, मित्र-मैत्रिणींबरोबर मैत्रीपूर्ण संबंध नसणे, या कारणामुळे अभ्यासाचा किंवा नेमून दिलेल्या कोणत्याही कामाचा आत्यंतिक कंटाळा, काही करावेसे न वाटणे, घरात किंवा आसपासच्या वातावरणात भांडण, रुसवा-फुगवा अशी नकारात्मकता असली तर मुलांना खऱ्या दुनियेपेक्षा ही खोटी दुनियाच बरी वाटायला लागते.  त्यामुळे या कारणांवर काम करणेही तितकेच महत्त्वाचे असते.

First Published on February 7, 2019 1:17 am

Web Title: effect of mobile on children