डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

‘सर्व जण सुखी होवोत, सर्वाचे कल्याण होवो’ अशी प्रार्थना सर्व संस्कृतींमध्ये आहे. ती म्हणताना मनात संतोष, प्रेम, कृतज्ञता, करुणा असे भाव काही वेळ धारण करून ठेवणे याला ‘करुणा ध्यान’ म्हणतात. या ध्यानाने मेंदूतील ‘सेरोटोनिन’ वाढते, असे संशोधनात आढळत आहे. सत्त्वावजय चिकित्सेतही या तंत्राचा उपयोग केला जातो. ‘स्वत:च्या शरीर-मनाचा स्वीकार’ हा त्यातील पहिला महत्त्वाचा भाग आहे. इतरांशी अकारण तुलना करून माणसे स्वप्रतिमा डागाळून ठेवतात. मी ठेंगू आहे, कुरूप वा बुद्दू आहे, असे त्यांना वाटत असते.

‘साक्षी ध्यान’ म्हणजे- मनात असे विचार येतात, त्या वेळी त्यांना न नाकारता शरीरावर लक्ष न्यायचे आणि शरीरात जे काही जाणवते त्याचा स्वीकार करायचा. त्या विचारांना बदलण्याचा प्रयत्न न करता, आत्ता मनात हे विचार आहेत अशी नोंद करून त्यांचा शरीरावर होणारा परिणाम साक्षीभाव ठेवून पाहायचा. दिवसभर मनात असे विचार येतील त्या वेळी हे करायचे. मात्र रोज किमान पाच मिनिटे करुणा ध्यानासाठी द्यायची, त्या वेळी आपण सुखद भावना मनात मुद्दाम निर्माण करीत असतो. त्यासाठी श्वासावर लक्ष ठेवायचे आणि आपला मेंदू श्वास समजू शकतो आहे यासाठी त्याला धन्यवाद द्यायचे. अनेक माणसे अशी असतात की, त्यांना श्वासाची हालचाल समजत नाही.

मात्र मेंदूला समजतात अशा अनेक चांगल्या गोष्टी प्रत्येकाच्या शरीर-मनात असतात. शरीरामुळे अनेक सुखांचा अनुभव आपण घेऊ  शकतो. यासाठी शरीराचे आभार मानायचे, त्याचा स्वीकार करायचा, त्यावर प्रेम करायचे. ‘मला माझे शरीर-मन जसे आहे तसे आवडते आहे.. मी आनंदी आहे,’ हा विचार मनात काही वेळ धरून ठेवायचा. ती भावना निर्माण होण्यासाठी आरशात स्वत:चे शरीर पाहतो आहोत अशी कल्पना करायची आणि चेहऱ्यावर हास्य पाहायचे. असे ‘कल्पनादर्शन ध्यान’ केल्याने आपल्या मनात आनंदाची भावना निर्माण होते. शरीरात सुखद संवेदना जाणवू शकतात. त्यांचा आनंद घ्यायचा. चेहऱ्याचे स्नायू शिथिल करायचे. त्यासाठी वरील आणि खालील दातांत अंतर ठेवायचे; असे केले की जबडय़ाचे स्नायू शिथिल होतात. डोक्यापासून पायापर्यंत शरीरातील सर्व अवयवांवर लक्ष नेऊन त्यांचे आभार मानायचे; शरीर-मन अधिकाधिक निरोगी आणि बळकट होत आहे, अशा स्वयंसूचना घ्यायच्या. असे ध्यान रोज केल्याने उदासी कमी होते, स्वप्रतिमा चांगली होते.