कशी गंमत असते पाहा! एखादा माणूस ज्या तत्त्वाचा पुरस्कार जन्मभर करीत असतो त्याच्या अगदी विरुद्ध असलेल्या गोष्टीशी त्याचे नाव आजन्म जोडले जाणे, हा किती विरोधाभास! ज्या अणूंच्या विध्वंसक प्रयोगाविरुद्ध आइन्स्टाइनने सातत्याने भूमिका घेतली त्याचेच नाव मोठय़ा आदराने शास्त्रज्ञांनी एका नव्या किरणोत्सारी अणूला दिले.

त्याचे असे झाले की १ नोव्हेंबर १९५२ मध्ये अमेरिकेने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटाच्या अवशेषांमध्ये ड्रोनच्या साहाय्याने तपास करताना या नव्या मूलद्रव्याचा शोध लागला. अल्बर्ट घीओर्सो व त्याच्या सहकाऱ्यांनी बर्कले, कॅलिफोíनयामधील प्रयोगशाळेत जेव्हा त्या किरणोत्सारी पदार्थाच्या आम्लिक द्रावणातून या मूलद्रव्याला वेगळे केले, तेव्हा आइन्स्टाइनिअमचे साधारण २०० अणू त्यांच्या हाती लागले. युरेनिअम-२३८ अणूच्या केंद्रकाकडून १५ न्यूट्रॉन्स प्रग्रहण (न्यूट्रॉन्स कॅप्चर) करून त्यातून सात बीटा-कणांचे उत्सर्जन झाले की आइन्स्टाइनिअम अणूची निर्मिती होत होती. किरणोत्सारी असे हे मूलद्रव्य झपाटय़ाने बर्केलिअम व कॅलिफोíनअममध्ये परावíतत होते. इतके की त्यामुळे सुंदर अशी निळी प्रभा या मूलद्रव्याचा अणू फेकत असतो आणि प्रत्येक ग्रॅममधून १००० वॉट इतकी ऊर्जा बाहेर टाकत असतो. याच्या अभ्यासाकरिता अर्ध-आयुष्यकाल ४१७.७ दिवस असलेला त्याचा जास्त स्थिर समस्थानिक आइन्स्टाइनिअम-२५२ उपयोगी ठरला असता पण तो बनविणे अधिकच कठीण आहे. अ‍ॅक्टिनाइड गटातील हे युरेनिअमोत्तर सातवे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार केले असले तरी अत्यल्प प्रमाण आणि झपाटय़ाने विघटन यामुळे त्याचे गुणधर्म जेमतेम माहिती आहेत. तसेच धातू असला तरी मृदू असणारा आणि चंदेरी दिसणारा हा धातू सहजपणे ऑक्सिजन, वाफ, आम्ल यांबरोबर संयुगे करतो मात्र क्षारांचा त्यावर परिणाम होत नाही. आइन्स्टाइनिअमची एकंदर १९ समस्थानिके आहेत. आइन्स्टाइनिअम-२५२ हा सर्वात अधिक अर्ध-आयुष्यकाल असणारा समस्थानिक आहे. अगदी शुद्ध स्वरूपात आइन्स्टाइनिअम हा धातू १९७०मध्ये वेगळा केला गेला.

सर्वात जास्त अणुभार असलेले आणि डोळ्यांना दिसू शकेल इतक्या प्रमाणात बनलेले आइन्स्टाइनिअम-२५३ हे अखेरचे मूलद्रव्य आहे.

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org