02 June 2020

News Flash

कुतूहल : एल निन्यो – ला निन्या

‘एल निन्यो’ ही हवामानातली दर तीन ते सात वर्षांच्या अंतराने घडणारी घटना एक चर्चेचा विषय बनलेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘एल निन्यो’ ही हवामानातली दर तीन ते सात वर्षांच्या अंतराने घडणारी घटना एक चर्चेचा विषय बनलेली आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या पेरू या देशातल्या मच्छीमारांना या घटनेची पूर्वीपासून जाणीव होती. एखाद्या वर्षी, दक्षिण गोलार्धातल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत, तिथल्या तीव्र उन्हाळ्यामुळे समुद्राचे तापमान नेहमीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सियस जास्त असते. या वेळी या प्रदेशातले सागरी हवामानही खराब झालेले असते. अशा काळात मासेमारीसुद्धा फार कमी होते. ही घटना ख्रिसमसच्या सुमारास घडत असल्यामुळे मच्छीमारांनी त्याला नाव दिले आहे- ‘एल निन्यो’ (लहान मुलगा, म्हणजेच नवजात येशू ख्रिस्त)! काही वर्षी मात्र तिथल्या हवामानाची स्थिती याच्या अगदी उलट असते. अशा हवामानाला ‘ला निन्या’ (म्हणजे लहान मुलगी) म्हणतात!

सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश हवामानतज्ज्ञ गिल्बर्ट वॉकर याने दक्षिण गोलार्धातील उष्णकटिबंधीय प्रदेशांतल्या सागरी हवामानात होणाऱ्या चढ-उतारांवर सखोल संशोधन केले. हवेच्या दाबात कालानुरूप होणाऱ्या चढ-उतारांना त्याने ‘सदर्न ऑसिलेशन्स’ असे संबोधले. या सदर्न ऑसिलेशन्सचा अभ्यास करताना त्याच्या हे लक्षात आले, की जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इण्डोनेशियाच्या जवळील, प्रशांत महासागराच्या उत्तरेकडील भागात खूप मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडतो, तेव्हा वाऱ्यांचे नेहमीचे स्वरूप बदलून तिथल्या सागराच्या पृष्ठभागावरील हवेचा दाब वाढलेला असतो. मात्र याच काळात प्रशांत महासागरातील दक्षिणेकडे मात्र हवेचा दाब खूपच कमी झालेला असतो. वॉकर याने केलेल्या हवेच्या दाबावरील या संख्याशास्त्रीय अभ्यासात, हवेच्या दाबातील या आंदोलनांचे पडसाद जगभर उमटतात हे दाखवून दिले.

त्यानंतर १९५०-६०च्या दशकात कॅलिफोर्निया विद्यापीठातील जाकोब जर्कनेस या हवामानतज्ज्ञाने सदर्न ऑसिलेशन्सच्या दरम्यानचा कमी दाबाचा काळ हा पेरूच्या सागरी किनाऱ्यावरील वाढणाऱ्या तापमानाशी निगडित असल्याचे दाखवून दिले. यामुळे ‘एल निन्यो’चा सदर्न ऑसिलेशन्सशी असलेला संबंध स्पष्ट झाला. याकोब जर्कनेस याने ‘एल निन्यो’ आणि जागतिक स्तरावरील हवामान यांच्यातील संबंधांवर आधारलेले प्रारूप तयार केले. या प्रारूपामुळे जगाच्या विविध भागांतील आगामी काळातल्या पावसासंबंधीचे आडाखे बांधायला ‘एल निन्यो’ची मदत होऊ  लागली. या सर्व संशोधनावरून ‘एल निन्यो’ आणि ‘ला निन्या’ हे एकाच चक्राचे दोन भाग आहेत हेही सिद्ध झाले.

कॅ. सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2019 12:09 am

Web Title: el nino la nina weather abn 97
Next Stories
1 कुतूहल : व्हॅन अ‍ॅलनचे पट्टे
2 मेंदूशी मैत्री : भाषा समृद्ध का झाल्या?
3 कुतूहल : फसवे करोनियम
Just Now!
X