20 November 2017

News Flash

विद्युतघट आणि विद्युत विभवांतर

या पट्टय़ांच्या आम्लाबाहेरील टोकांना एक एक लहान तांब्याची तार जोडलेली असते.

लोकसत्ता टीम | Updated: September 12, 2017 2:28 AM

रासायनिक शक्ती खर्च करून प्रवाही विद्युत निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे विद्युतघट वापरले जातात.

काचेच्या एका भांडय़ात सौम्य आम्ल घेऊन त्यात तांब्याची एक पट्टी व एक पाऱ्याचा लेप दिलेली जस्ताची पट्टी अध्र्या बुडतील, अशा एकमेकांपासून अलग उभ्या केलेल्या असतात. या पट्टय़ांच्या आम्लाबाहेरील टोकांना एक एक लहान तांब्याची तार जोडलेली असते. ह्या दोन तारांची मोकळी टोके एकमेकांना जोडली की परिपथ पूर्ण होऊन तारेतून वीज वाहू लागते. जस्त व आम्ल यात रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचे विद्युत उर्जेत रुपांतर होते. हाच व्होल्टाचा विद्युतघट. तारांची मोकळी टोके एकमेकांना जोडण्याऐवजी ती एखाद्या लहानशा दिव्याला जोडली की दिवा लागतो.

घटातील द्रवात जस्ताच्या पट्टीपासून तांब्याच्या पट्टीकडेविद्युतप्रवाह चालू होतो व तो तांब्याच्या पट्टीस जोडलेल्या तारेतून जस्ताच्या पट्टीकडे वाहतो. म्हणून तांब्याची पट्टी घटाचा धनध्रुव आणि जस्ताची पट्टी ऋणध्रुव आहे असे म्हणतात.

विद्युतप्रवाह चालू असतो तेव्हा जास्त धनभार असलेला व ऋणभार असलेला अशा दोन पदार्थाच्या विजेच्या पातळ्या भिन्न असतात. एखाद्या बिंदूजवळील विद्युत पातळी म्हणजे विद्युत विभव. धन व ऋण टोकाच्या विद्युत पातळीतील फरक म्हणजेच विभवांतर होय. रक  पद्धतीत विभवांतराचे एकक व्होल्ट आहे. एक कुलोम इतका विद्युतप्रभार एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत विस्थापित होताना जर एक ज्यूल इतके कार्य घडत असेल, तर त्या दोन बिंदूंतील विभवांतर  एक व्होल्ट आहे, असे म्हणतात.

सूक्ष्म व अतिसूक्ष्म विभवांतर व्यक्त करण्यासाठी मिलीव्होल्ट व मायक्रोव्होल्ट ही एकके वापरतात. तर फार मोठे विभवांतर व्यक्त करण्यासाठी किलोव्होल्ट आणि मेगाव्होल्ट या एककांचा वापर करतात.

व्होल्टाचा घट, डॅनिअलचा घट, लेक्लँशेचा घट, कोरडा विद्युतघट यांना प्राथमिक विद्युतघट म्हणतात. लेड अ‍ॅसिड विद्युतघट आणि पुनर्भारित करता येणाऱ्या विद्युतघटांना दुय्यम विद्युतघट असे म्हणतात. निरनिराळ्या घटांचे विभवांतर वेगवेगळे असते.

डॉ. सुनंदा जनार्दन करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

वाग्देवीचे वरदवंत

गिरीश कर्नाड- चित्रपट कारकीर्द- सन्मान

गिरीश कर्नाड यांचा अभिनय म्हटल्यावर आठवतात ते त्यांचे ‘उंबरठा’, ‘मंथन’, ‘इक्बाल’ इ. चित्रपट. चित्रपटांतील अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखन अशा अनेक प्रकारांतून या प्रतिभाशाली कलावंताने भारतीय रंगभूमी व चित्रपटसृष्टीला एक नवी आधुनिक उंची व विस्तार दिला आहे. यू. आर. अनंतमूर्तीच्या ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या कादंबरीवरील ‘संस्कार’ चित्रपटामुळे कर्नाड प्रसिद्धीच्या झोतात आले. या चित्रपटाची पटकथा तर त्यांनी लिहिलीच, पण त्यातील प्राणेशाचार्याची मध्यवर्ती, प्रमुख भूमिकाही केली होती. रसिक आणि समीक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते.

एस. एल. भैरप्पांच्या ‘वंशवृक्ष’ कादंबरीवरील कन्नड चित्रपटही खूप गाजला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना (दिग्दर्शकीय पदार्पणातच) राष्ट्रीय पुरस्कार तसेच कर्नाटक राज्य पुरस्कारही मिळाला. ‘गोधूली’साठी फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड, ‘भूमिका’ चित्रपटाच्या पटकथालेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार तसेच ‘काडु’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती रजतपदकही मिळाले आहे. १९७८ मध्ये त्यांना ‘मंथन’ या हिंदी चित्रपटातील अभिनयासाठी पश्चिम बंगाल पत्रकार संघाकडून पुरस्कार मिळाला, तर १९८३ मध्ये ‘चेलुवि’ला पर्यावरण संरक्षणाच्या आशयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

नाटय़लेखनाबद्दलही कर्नाड यांना साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही काळ ते संगीत नाटक अकादमीचे अध्यक्षही होते.

२००७ मध्ये गिरीश कर्नाड पाकिस्तानात गेले होते. तेव्हा त्यांना कळले की, लाहोर विद्यापीठात इंग्रजी विभागात त्यांची ‘तुघलक’ आणि ‘नागमंडल’ ही नाटके पाठय़पुस्तके म्हणून वापरली जातात. हे कळल्यावर कर्नाडही चकित झाले.

१९७४-७५ मध्ये ते पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन संस्थेचे संचालक होते. विद्यासागर विद्यापीठ, मिदनापूर आणि रॅवनशा विद्यापीठ, भुवनेश्वर यांच्याकडून डी.लिट.ने त्यांचा गौरव करण्यात आला.

भारत सरकारने १९५४ मध्ये ‘पद्मश्री’ आणि १९९४ मध्ये ‘पद्मभूषण’ने त्यांचा सन्मान केला आहे.

त्यांच्या नाटकांचे अनेक भारतीय भाषांत अनुवाद झाले असून, ‘तुघलक’ या नाटकाचे तर हंगेरियन, स्पॅनिश, जर्मन भाषांतही अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. तसेच कर्नाडांनीही काही अनुवाद केले आहेत. महेश एलकुंचवार यांच्या ‘वासांसि जीर्णानी’ व ‘धर्मपुत्र’ या मराठी नाटकांचे कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on September 12, 2017 2:28 am

Web Title: electrical reduction and electrical separator