प्रथम पुण्याच्या पेशवे दरबारातील रेसिडेंट आणि पुढे मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरपदी नियुक्त झालेल्या एल्फिन्स्टनने प्रजाहितवादी कारभार करताना लोकांच्या शैक्षणिक प्रसारावर भर दिला. त्याच्या शिक्षणविषयक धोरणाचे मूळ सूत्र असे होते की, लोकांच्या धार्मिक भावना न दुखविता त्यांच्या जीवनात योग्य ती प्रगती करण्यासाठी त्यांच्या मराठी भाषांमध्येच शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन कराव्यात. त्यासाठी त्याने मराठी, गुजरातीमध्ये क्रमिक पुस्तके छापून घेतली.

चिकित्सक बुद्धीच्या एल्फिन्स्टनने आपले काम सांभाळून ‘भारताचा इतिहास’, ‘पूर्वेकडील देशांमध्ये ब्रिटिश सत्तेचा उदय’ इत्यादी ग्रंथ लिहिले. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मुंबई प्रांतात शिक्षण प्रसार करताना लोकांना शहाणे करून सोडण्यापेक्षा ख्रिस्ती करून सोडण्यावर त्यांचा भर अधिक होता. परंतु एल्फिन्स्टनला तर धर्म आणि शिक्षण यांच्यात फारकत करायची होती. १८१३ मध्ये एल्फिन्स्टनच्या शिफारसींवरून मुंबई इलाख्यासाठी १ लक्ष रुपये शिक्षण व्यवस्थेसाठी खर्च करण्याचा ठराव झाला. शिक्षणाची जबाबदारी मिशनऱ्यांकडे न सोपविता सरकारने निराळी योजना करायचेही ठरले. नैतिक आणि भौतिक शास्त्रावरील ग्रंथ स्थानिक भाषेतच तयार करण्याचे काम एल्फिन्स्टनने सुरू केले.

एल्फिन्स्टनच्या पुरस्काराने मुंबईत ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ एज्युकेशन ऑफ पुअर’ ही संस्था स्थापन होऊन देशी भाषांमधून शिक्षणाला आरंभ झाला. तसेच १८२० मध्ये ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी’ ही संस्था त्याने शालोपयोगी पुस्तके तयार करण्यासाठी स्थापन झाली.

१८२२ साली त्याने काही विद्वान ब्रिटिश अधिकारी आणि काही शास्त्री, जाती प्रमुख तसेच कायदा आणि रूढी यांचे जाणकार यांची एक समिती निर्माण करून परस्पर चच्रेतून मुंबई सरकारसाठी २७ कायद्यांची संहिता तयार केली. १८२७ पासून ती अमलातही आणली. ही एल्फिन्स्टनची सर्वश्रेष्ठ कामगिरी समजली जाते. वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी इंग्लंडला परत गेलेला एल्फिन्स्टन आयुष्यभर अविवाहित राहिला. १८५९ मध्ये त्याचे सरे परगण्यात निधन झाले. त्याच्याबद्दल आदर म्हणून लोकांनी पैसे गोळा करून मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेज हे त्याच्या स्मरणार्थ स्थापन केले.

sunitpotnis@rediffmail.com