डॉ. यश वेलणकर

माणसाची स्मरणशक्ती व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन प्रकारची असते. त्याच्या सवयीने होणाऱ्या साऱ्या कृती अव्यक्त स्मरणशक्तीचा परिणाम असतात. भावनिक प्रतिक्रिया आणि आवडनिवड यांवरही या स्मरणशक्तीचा प्रभाव असतो. एखाद्याला चॉकलेट आइस्क्रीम का आवडते आणि आंब्याचा स्वाद का आवडत नाही, याचे तार्किक कारण सांगता येतेच असे नाही; पण ते अव्यक्त स्मरणशक्तीमध्ये असू शकते. ही स्मरणशक्ती विचार बदलून बदलता येत नाही; कारण ती मुख्यत: भावनिक मेंदू ‘अमीग्डला’ व संपूर्ण शरीर यांमध्ये साठवलेली असते. चिंच वा लिंबू आठवले तरीही काही जणांना लाळस्राव होतो. ही जशी प्रतिक्रिया आहे, तशीच ठरावीक माणसाचे नाव घेतले की एकाला राग येतो, दुसऱ्याला भीती वाटते आणि तिसऱ्या व्यक्तीला प्रेम वाटू शकते. या तिन्ही भावना व्यक्त व अव्यक्त स्मरणशक्तीचा एकत्रित परिणाम असतो.

यातील व्यक्त स्मरणशक्ती विचारांच्या रूपात असल्याने मतपरिवर्तन करून ती बदलता येते; पण अव्यक्त स्मरणशक्ती मात्र सहजासहजी बदलत नाही. त्याचमुळे रागवायचे नाही असे ठरवले असले; तरी ठरावीक प्रसंग घडला, की राग येतोच. तो कमी करायचा असेल तर भावनिक मेंदूत साठवलेली स्मरणशक्ती बदलायला हवी. त्यासाठी साक्षीध्यान उपयोगी ठरते. लक्ष शरीरावर नेऊन शरीरात जाणवणाऱ्या संवेदना कोणतीही प्रतिक्रिया न करता आपण पाहत राहतो, तेव्हा ही स्मरणशक्ती बदलली जाते. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात द्वेष असेल, तर त्या व्यक्तीची आठवण आली तरीही अस्वस्थता येते. त्याच वेळी शरीरात त्रासदायक संवेदना निर्माण होतात. छातीवर किंवा डोक्यात भार येतो, पोटात गोळा येतो. या सूक्ष्म संवेदना ध्यानाचा सराव नसेल तर जाणवतही नाहीत. पण शरीरातील संवेदना जाणण्याचा नियमित सराव केला, की अशा प्रसंगीही शरीरातील सूक्ष्म बदल जाणवतात.

हे बदल त्रासदायक असल्याने भावनिक मेंदू ‘हे नको’ अशी प्रतिक्रिया तत्क्षणी करीत असतो. मात्र प्रतिक्रिया म्हणून असा विचार आला तरी त्याला महत्त्व न देता त्या संवेदना कुठे आहेत आणि कुठे नाहीत, हे उत्सुकतेने पाहायचे. ही उत्सुकता हा निवडलेला प्रतिसाद असतो. अस्वस्थता ही अंध प्रतिक्रिया असते. शरीरावर लक्ष नेऊन संवेदनांचा स्वीकार केल्याने ही अस्वस्थता हळूहळू कमी होते. कारण भावनिक मेंदूतील अव्यक्त स्मरणशक्ती त्यामुळे बदलली जाते.

yashwel@gmail.com