News Flash

मेंदूशी मैत्री : सहानुभूती आणि समानुभूती

काही माणसं स्वत:च्या दु:खाचे कढही आतल्या आत जिरवतात आणि दुसऱ्यांच्या दु:खातही तटस्थ राहतात.

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. श्रुती पानसे

नाटक आणि सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून प्रेक्षकांनाही दु:ख वाटतं. त्यांना रडताना बघून रडायला येतं आणि त्यांना आनंद झाला तर आनंद होतो.  समोर चाललेली दृश्यं वास्तव नाहीत, हे माहीत असूनही असं घडतं. आपल्या ओळखीची व्यक्ती, नातेवाईक, मित्र यांच्यापैकी कोणी दु:खात असेल तरी आपल्याला वाईट वाटतं आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटतो. अन्य व्यक्तीच्या भावनांना अनुरूप आपल्या भावना होत जातात. याचं मेंदूतलं कारण म्हणजे भावना जाणवण्याचं क्षेत्र एकच आहे. त्यामुळे अन्य आणि स्वत: यांच्यात सहानुभूती तर असतेच. पण समानुभूतीदेखील असते. जे समोरच्याला वाटतं, तेच आपल्याला जाणवतं.

काही माणसं स्वत:च्या दु:खाचे कढही आतल्या आत जिरवतात आणि दुसऱ्यांच्या दु:खातही तटस्थ राहतात. तसे भासवण्यात यशस्वी होतात. कारण स्वत:च्या भावनांवर नव्हे; तर त्या भावनांच्या अभिव्यक्तीवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं असतं. नाटक- सिनेमा बघून तर ते ‘आतून हललेले’ इतरांना कधीच दाखवत नाहीत. त्यांना ते मुळीच आवडत नाही.

काही वेळा दुसऱ्यांच्या दु:खात दु:ख वाटेल. पण दुसऱ्यांच्या आनंदात आनंद वाटेलच असं नाही. खरं तर दुसऱ्यांच्या आनंदाने आनंद होतोच. या दोन्ही भावना अतिशय नैसर्गिक आहेत. पण हा आनंद किती क्षण, किती काळ टिकतो, हे या संदर्भात जास्त महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या आनंदामुळे झालेला आनंद दोन क्षणच टिकला तर तो आनंद झाल्याचंही कदाचित कळून येत नाही. लगेचच मत्सराची भावना ती जागा घेते. त्यामुळे आपल्याला आनंदही झाला होता, हेच आपण विसरून जातो. मात्र, ज्या माणसांना प्रामाणिकपणे कधीच सहानुभूती किंवा समानुभूती जाणवत नाही, त्यांच्यामध्ये काहीशी समस्या असू शकते. असं असेल तर ही माणसं स्वत:च्या भावनांकडेही अलिप्तपणे बघत असतील. एकतर त्या भावनांशी संबंधित रसायनांच्या प्रमाणामध्ये घोळ असेल किंवा मग भावनांच्या पलीकडे जाणारं प्रशिक्षण स्वत:ला दिलेलं असेल किंवा मेंदूत कसल्याच भावना उरू नयेत असे भयानक अनुभव लहानपणापासून आलेले असतील आणि त्या भावनांचं काय करायचं अशी दाहक परिस्थिती आली असेल तर संवेदना बोथट होण्याचा मानसिक आजार जडल्याची दाट शक्यता असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:10 am

Web Title: empathy sadness brain feeling abn 97
Next Stories
1 कुतूहल : जड मूलद्रव्ये
2 मेंदूशी मैत्री : दृष्टी
3 कुतूहल : मूलद्रव्यांची शिडी
Just Now!
X