डॉ. श्रुती पानसे

आपल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतात; पण त्या आपण तितक्याशा वापरत नाही. सढळपणे तर नाहीच. त्यातलीच एक क्षमता म्हणजे खरोखरच कौतुकास्पद गोष्टींना मनापासून प्रोत्साहन देणं. कोणत्याही कामाचं पुरेसं (अति नव्हे!) कौतुक होतं, तेव्हा त्या कामाला प्रोत्साहन मिळतं. या प्रोत्साहनामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. काम योग्य दिशेनं पुढे जाण्याची शक्यता वाढते.

– अभ्यास करणारं मूल > योग्य प्रमाणात प्रोत्साहन > योग्य प्रमाणात अभ्यास > यश > आत्मविश्वास.

– अभ्यास करणारं मूल > प्रोत्साहन नाही > अभ्यास > यश > आत्मविश्वास.

– अभ्यास न करणारं मूल > प्रोत्साहन नाही, फक्त टीका > अभ्यासापासून दुरावा > यश नाही > आत्मविश्वास नाही (परिणामी : न्यूनगंड किंवा आक्रमकता).

– अभ्यास न करणारं मूल > प्रोत्साहनपर शब्द > अभ्यास करण्याची शक्यता > यश मिळण्याची शक्यता > आत्मविश्वास वाढीला लागण्याची शक्यता.

– अभ्यास करणारं मूल > अतिकौतुक > फाजील आत्मविश्वास > यश/ अपयश > आत्मविश्वासावर सापेक्ष परिणाम.

..आणि या प्रोत्साहनातून त्यांना त्यांच्यातल्या क्षमतांची जाणीव करून देणं. ही खरोखर जादूई क्षमता आहे; पण आपण याचा फारसा वापर करत नाही.

कोणाच्या चुकांवर बोट ठेवण्यापेक्षा प्रोत्साहनपर शब्द वापरून सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित अपेक्षित परिणाम मिळू शकतात, किमान तशा शक्यता वाढतात. अर्थात, अभ्यास न करणाऱ्या मुलांना प्रोत्साहनपर शब्द वापरणं ही गोष्ट फारच अवघड आहे, असं बहुतेकांना वाटू शकतं. खूप जणांना हे चुकीचंच आहे, असंही वाटू शकतं. आपल्या समाजात हे शक्यच नाही, असं वाटणारेही असतात. कारण हा लांबचा वळसा आहे.

सुरुवातीला असं वाटतं की, काहीच धड होत नाही, सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत; पण हळूहळू परिस्थिती सुधारते. चुकीच्या गोष्टी करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि मुलं आपणहून योग्य मार्ग निवडतात. याचा परिणाम फार चांगला होतो. प्रत्येक वयात एक अहं असतोच. आपली कोणी तरी जाणीव ठेवतं आहे, यातून मिळणारी प्रेरणा महत्त्वाची!

contact@shrutipanse.com