ऊर्जा म्हणजे कोणत्याही प्रकारचं कार्य अथवा कृती करण्यासाठी लागणारी शक्ती किंवा क्षमता. सजीव सृष्टीतील अतिसूक्ष्म एकपेशीय जिवाणू ते महाकाय बहुपेशीय वनस्पती व प्राणी आणि या दोन टोकांच्या मधले विविध लहान, मध्यम, मोठय़ा आकारांच्या वनस्पती व प्राणी या साऱ्यांच्या शरीरात, काही दृश्य, तर बहुतेक अदृश्य स्वरूपात काही ना काही कृती, हालचाली रात्रंदिवस सुरूच असतात. या क्रिया अविरतपणे चालवण्यासाठी ऊर्जेची गरज असते. माणसाचे शरीरदेखील याला अपवाद नाही. आपण रात्री झोपतो तेव्हाही शरीरांतर्गत या क्रिया सुरूच असतात.

साधे मानवी हृदयाचेच उदाहरण बघा ना. मातेच्या गर्भात वाढ होत असताना ज्या कुठल्या कालावधीदरम्यान हृदय ‘तयार’ होते तेव्हापासून ते त्या व्यक्तीचा संपूर्ण जीवनकाल संपेपर्यंत या हृदयाची ‘धडधड’ सुरूच असते. त्याला विश्रांती घ्यायला, थोडी उसंत घ्यायला अजिबात परवानगी नाही. ही धडधड सुरू राहणे अत्यावश्यक असते; कारण यामुळेच शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्ताच्या अभिसरणाची क्रिया अखंड सुरू असते.

pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?
infants with spina bifida surgery possible in the mother s womb
आईच्या गर्भातच होणार बाळावर शस्त्रक्रिया; स्पायना बीफिडाग्रस्त मुलांना मिळणार दिलासा

पण मुळातच ही ‘धडधड होते’ म्हणजे नक्की काय होते? तर हृदयाचे स्नायू एका विशिष्ट लयीत, विशिष्ट ठेक्यात आकुंचन-प्रसरण पावत असतात. यासाठी हृदयाचे स्नायू ज्या पेशींचे बनले आहेत, त्या पेशी स्नायूंचे हे कार्य अविरतपणे, न थकता सुरू ठेवण्यासाठी त्यांना सातत्याने ऊर्जेचा पुरवठा करत असतात. या पेशींमध्ये एक अशी सुसज्ज यंत्रणाच अस्तित्वात असते, जी या आकुंचन-प्रसरण क्रियेसाठी लागणारी ऊर्जा ‘तयार’ करत असते. परंतु ‘थर्मोडायनॅमिक्स (उष्मागतिकी)’च्या पहिल्या नियमानुसार, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टदेखील करता येत नाही. ऊर्जेचे रूपांतरण होत असते. आता प्रश्न असा पडतो की, आपल्या हृदयाच्या या चिमुकल्या पेशींना ऊर्जा कोणत्या रूपात मिळते आणि या ऊर्जेचा मूळ स्रोत कोणता?

याचे स्पष्ट आणि थेट उत्तर आहे ते म्हणजे आकाशात तेजाने तळपणारा स्वयंप्रकाशित सूर्य! अतिसूक्ष्म जिवाणूंच्या, त्याचप्रमाणे एकपेशीय वनस्पती व प्राण्यांमध्ये चालणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रिया असोत अथवा बहुपेशीय वनस्पती व प्राण्यांच्या शरीरातील तसेच मानवी शरीरातील सर्वच अवयवांमध्ये, पेशींमध्ये चालणाऱ्या विविध प्रकारच्या चयापचय क्रिया असोत; या सर्वासाठी लागणारी ऊर्जा कोण पुरवते? याचेदेखील उत्तर तेच आहे.. सूर्य! पृथ्वीवरील संपूर्ण सजीवांसाठी ऊर्जेचा एकमेव आदिम स्रोत! या स्रोतापासून मिळालेली ऊर्जा जीवसृष्टीतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी निसर्गाची अत्यंत सक्षम अशी वितरण व्यवस्था आहे.

डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org